वरिष्ठ – कनिष्ठ अदलाबदल !
म्हटलं तर तसं कोणाचंच आयुष्य सरळ रेषेत जात नाही ! चढ उतार असतात. कधी कधी तर आश्चर्यकारक गोष्टी घडतात.
राजकारणात तर अशा गोष्टी सतत घडत असतात !
1998 साली अटल बिहारी वाजपेयी 1996 नंतर भारताचे पुन्हा पंतप्रधान झाले. त्यांनी प्रख्यात अणु शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांची त्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नेमणूक केली. त्यामुळे अब्दुल कलाम वाजपेयी यांना सर म्हणून संबोधित असत.
मात्र, 2002 साली डॉ. कलाम हे भारताचे राष्ट्रपती झाले !साहजिकच अटल बिहारी वाजपेयी त्यांना सर म्हणू लागले !
1980 च्या दशकात प्रणव मुखर्जी हे भारताचे अर्थमंत्री झाले. त्यांनी विद्वान अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांची ‘ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ‘ चे गव्हर्नर म्हणून नेमणूक केली. साहजिकच मुखर्जी हे डॉ. मनमोहन सिंग यांचे वरिष्ठ झाले; आणि सिंग मुखर्जी यांना सर म्हणू लागले. मात्र, 2004 साली डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान झाले; आणि प्रणव मुखर्जी त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थ मंत्री झाले !
त्यामुळे, प्रणव मुखर्जी यांना मनमोहन सिंग यांचा सर म्हणून उल्लेख करावा लागत असे !
स्वातंत्र्यपूर्व काळात कृ. रा. पाटील म्हणून एक नामवंत I.C.S. अधिकारी होते. त्यांनी सनदी सेवेचा राजीनामा देऊन स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला; आणि ते लवकरच मध्य प्रदेशचे मंत्री झाले. त्यामुळे कृ. रा. पाटील हे त्यांच्या सहकारी सनदी अधिकाऱ्यांचे वरिष्ठ झाले; आणि त्यांचे पूर्वीचे सहकारी त्यांच्याबद्दल आकस बाळगू लागले.
स. गो. बर्वे हे ही मुलकी सेवेत सनदी अधिकारी ( I.C.S. ) होते. ते खात्याचे सचिव असल्यामुळे मंत्रीगण त्यांचे वरिष्ठ असत. पण 1962 साली त्यांनी मुलकी सेवेचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला; आणि निवडणूक लढवून ते मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री झाले. साहजिकच बहुतेक सर्व मंत्र्यांच्यावर त्यांना अर्थमंत्री म्हणून अधिकार प्राप्त झाला. ते एखाद्या सहकारी मंत्र्याला ( हा पूर्वी त्यांचा वरिष्ठ असे. ) चर्चेला बोलावू लागले की या मंत्र्यांना राग येत असे !
तसेच, ते सचिव असताना सेवेत ज्येष्ठ असलेले अन्य सचिव त्यांचे वरिष्ठ होते. पण बर्वे मंत्री झाल्यावर ते कुठल्याही सचिवाला चर्चेला त्यांच्या केबिन मध्ये बोलवू लागले. ही गोष्ट त्या सचिवांना झोंबत असे !
याचे सुंदर वर्णन प्रथम सचिव आणि नंतर राज्यपाल झालेल्या राम प्रधान यांनी त्यांच्या ‘ माझी बांधिलकी – महाराष्ट्र राज्य ‘ या ‘ ग्रंथाली ‘ प्रकाशित पुस्तकात केलं आहे !
2000 साली छत्तीसगड राज्याची निर्मिती झाली. तेथे भारतीय प्रशासन सेवेत असलेले अजित जोगी राजकारणात उतरले आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री झाले ! तेथेही हाच प्रकार वारंवार घडू लागला ! पण जोगी हे सोनिया गांधींच्या निकटवर्ती माणसांपैकी एक असल्यामुळे या सर्व लोकांना हात चोळीत बसावे लागे !
राज्य शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले प्रख्यात विनोदी लेखक प्रा. भा. ल. महाबळ हे B. E. झाल्यावर, 1960 च्या दशकात, माटुंग्याच्या V.J.T.I. या अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये प्राध्यापक झाले. विद्यापीठातील अन्य शाखांत प्राध्यापक होण्यासाठी पदव्युत्तर अर्हता अनिवार्य होती. मात्र अभियांत्रिकी शाखेत B. E. पदवी घेतलेली व्यक्ती प्राध्यापक होऊन शिकवू शकत असे.
त्यांचे सुरेश गजेंद्रगडकर म्हणून एक विद्यार्थी होते. हे ही लेखक झाले. गजेंद्रगडकर हे प्रथम B. E. आणि लगोलग M. E. झाले. ते ही V.J.T.I. मध्येच प्राध्यापक म्हणून दाखल झाले; आणि प्रा. भा. ल. महाबळ या आपल्या गुरुंचे सहकारी झाले !
काही वर्षांनी मुंबई विद्यापीठानं अभियांत्रिकी शाखेतही महाविद्यालयात शिकवण्यासाठी पदव्युत्तर अर्हता अनिवार्य केली. साहजिकच B. E. होऊन शिकवत असलेल्या लोकांना योग्य ती वेतन श्रेणी मिळवण्यासाठी M. E. उत्तीर्ण होणं अपरिहार्य झालं.
त्यामुळे त्या काळात कित्येक लोक, जे B. E. होऊन शिकवत होते, त्यांनी M. E. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.
त्यांत हे प्रा. भा. ल. महाबळ होते.
सुरेश गजेन्द्रगडकर हे M. E. होऊन बरीच वर्षे शिकवत असल्यामुळे ते M. E. अभ्यासक्रमाला शिकवण्यासाठी पात्र झाले होते.
त्यामुळे प्रा. महाबळ हे आपल्याच विद्यार्थ्याचे शिष्य झाले !
जाता जाता….
1980 च्या दशकात अर्थमंत्री प्रणव मुखर्जी हे डॉ. मनमोहन सिंग यांचे वरिष्ठ होते, आणि 2004 साली मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यावर ते मुखर्जी यांची वरिष्ठ झाले; याचा उल्लेख वर आलाच आहे. तसंच राजस्थानच्या एका संस्थानाचे भूतपूर्व संस्थानिक नटवरसिंग हे स्वातंत्र्यानंतर संघ लोकराज्य आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय विदेश सेवेत ( Indian Foreign Service ) दाखल झाले. साहजिकच, ते मनमोहन सिंग यांचे सनदी अधिकारी म्हणून सहकारी झाले.
नंतर ते ही राजकारणात उतरून खासदार आणि केंद्रीय मंत्री झाले.
ते डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दर आठवड्याच्या सभेत डॉ. मनमोहन सिंग आले की, अन्य मंत्री उठून उभे राहात आणि मनमोहन सिंग यांना अभिवादन करत. मात्र, प्रणव मुखर्जी हे त्यांचे भूतपूर्व वरिष्ठ आणि नटवर सिंग हे त्यांचे भूतपूर्व सहकारी मात्र उठून उभे राहत नसत.
लगेच, या दोघांना समज देण्यात आली; आणि मग ते मंत्रिमंडळाच्या सभेत मनमोहन सिंग आल्यावर उभे राहून त्यांना अभिवादन करत.
डॉ. मनमोहन सिंग यांचे प्रसिद्धी सचिव संजय मारू यांनी ‘ Accidental Prime Minister ‘ या पुस्तकात हा प्रसंग नोंदवला आहे !
स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेले आणि स्वतंत्र भारतात पश्चिम बंगलाचे पहिले मुख्यमंत्री डॉ. बिधनचंद्र रॉय हे पं. नेहरू यांच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठे होते. ते नेहरुंना जवाहर असे एकेरी संबोधित असत.
ते प. बंगालचे पहिले मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी पंतप्रधान नेहरू यांना पाठवलेल्या पहिल्याच शासकीय पत्रात ‘ प्रिय जवाहर ‘ ( My Dear Jawahar ) अशी सुरवात करून लिहिलेलं पत्र तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी वाचलं. स्वतंत्र भारतात सुसंस्कृत चालीरीती सुरु व्हाव्यात म्हणून कळकळ असलेल्या पटेलांनी ताबडतोब डॉ. रॉय यांना शासकीय पत्रात अशी वैयक्तिक सलगी दाखवणं बरे नव्हे, अशी तंबी दिली !
स्वत: सरदार पटेल हे पं. नेहरूंपेक्षा 14 वर्षांनी मोठे होते !
गम्मत…..
या नटवर सिंगांनी आत्मचरित्र लिहिलं आहे; त्याचं नाव ‘ One Life Is Not Enough ‘ असं आहे !
2004 नंतर 8 वर्षांनी 2012 साली प्रणव मुखर्जी हे भारताचे राष्ट्रपती झाले.
… आणि परत डॉ. मनमोहन सिंग यांचे वरिष्ठ झाले !
वर्तुळ पुरे झाले !

— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800