Wednesday, September 17, 2025
Homeलेखअवती भवती : 29

अवती भवती : 29

मराठी – अमराठी

नुकतंच सर्वोच्च न्यायालयानं मुंबईतील अमराठी व्यावसायिकांना दुकानांवर मराठी पाट्या न लावण्याच्या वृत्तीबद्दल फटकारून दोन महिन्यांत मराठी पाट्या लावाव्यात असा आदेश दिला. त्यावरून या विषयाचा घेतलेला हा आढावा.

2014 मे पूर्वी दूरदर्शनवरच्या विविध मराठी बातम्यांच्या वाहिन्यांत दररोज राजकारण अथवा तत्सम विषयावर एक चर्चा असे॰ त्यात किती तरी वेळा या विषयावर मुंबईतल्या अमराठी व्यक्तींना बोलावले जाते॰ अगदी कधीतरी त्यांच्या पैकी कोणी तरी मराठीत बोलणारे आढळत॰ नाहीतर ते इंग्लिश अथवा हिंदीतच बोलतात॰ 4 – 4 दशके महाराष्ट्रात राहून ते मराठी शिकू इच्छित नाहीत॰

आपल्याकडे मराठी विषय न घेता शालान्त परीक्षा उत्तीर्ण होता येते, हे एकदा मला ‘ लोकसत्ता ‘ चे तत्कालिन संपादक माधव गडकरींनी सांगितले॰ त्यावेळेस मला आपल्या शालान्त परीक्षा बोर्डाची अत्यंत कीव आणि चीड आली !

2010 साली पुण्यात मराठी साहित्य सम्मेलन भरले होते॰ त्याच्या समारोपाला अमिताभ बच्चनला बोलावले होते॰ त्याने उत्कृष्ट भाषण केले, यात शंकाच नाही; पण ते हिंदीत॰ फक्त, उपकार केल्यासारखे एक वाक्य तो मराठीत बोलला॰ त्यावर आपल्या जमलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला ! हाच अमिताभ नोकरी निमित्ताने केवळ तीन वर्षे कलकत्त्याला होता; तेव्हा त्या काळात तो सफाईदारपणे बंगाली लिहू / बोलू लागल्याचे त्यानेच सांगितले आहे; शिवाय, बंगाली नाटकांत भूमिका करण्याइतके प्राविण्य त्यानं बंगाली भाषेवर मिळवलं होतं !

मात्र 1968 पासून ज्या शहरात तो राहिला; जेथे त्याला मान – सन्मान, कीर्ती, पैसा आणि किती तरी गोष्टी प्राप्त झाल्या, त्या राज्याची भाषा त्याला शिकावीशी वाटत नाही; या पेक्षा आपल्याला या लोकांनी मराठी शिकले नाही तरी चालते, या बद्दलची आपली अनास्था जास्त दु:खदायक आहे॰ त्या मानाने बिहारच्या ज॰ द॰ चे एक आमदार आहेत॰ ते बिहारीच आहेत॰ पण कित्येक वर्षे मुंबईत राहिल्याने मराठी छान बोलतात॰

राज ठाकरे यांनी बिहारी लोकांविरुद्ध आंदोलन छेडले तेव्हा ते ‘ आय॰ बी॰ एन॰ लोकमत ‘ वाहिनीवर चर्चेसाठी आले होते, ते अस्खलित मराठीत बोलले॰ कॉंङ्ग्रेसचे कृपाशंकर पण आवर्जून मराठी वाहिनीवर मराठीत बोलतात॰ त्यांचा एक मुद्दा मला आवडतो॰ अधून मधून कानडी लोकांनी बेळगावच्या मराठी लोकांवर अन्याय केला की होणार्‍या चर्चेत ते मुद्दाम सांगतात की बेळगावला निदर्शन करण्यासाठी सत्याग्रही पाठवणार असलात तर मी एक सत्त्याग्रही म्हणून जायला तयार आहे॰

आमीर खानने लिमये नावाच्या शिक्षकाची खास शिकवणी लावून मराठी शिकावयास सुरवात केली होती॰ त्याने त्याच्या स्वभावाप्रमाणे त्यावेळेस ती गोष्ट गंभीरतेने घेतली होती; असे त्या लिमयांनी दूरदर्शनवरच्या साडे नऊच्या बातम्यांत सांगितले होते॰ नंतर ‘ पाणी फौंडेशन ‘ च्या कार्यक्रमात तो चांगलं मराठी बोलत असे.

हिंदी चित्रपट नायक विवेक ओबेरॉयला मराठी उत्तम समजते; आणि तो मराठी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके नित्यनेमाने बघत असतो॰

हृषीकेश मुखर्जी यांच्यासारखे अमराठी चित्रपट निर्माते दूरदर्शनवरच्या मराठी बातम्या आवर्जून ऐकायचे. मुंबईत होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धा ही मुद्दाम बघायचे. त्यांतून त्यांना अभिनेते / अभिनेत्री यांचा शोध घेता यायचा. त्या वेळेस मुंबई दूरदर्शनवर मराठी बातम्या वाचणाऱ्या स्मिता पाटीलची निवड अशीच झालेली आहे.

अटल बिहारी वाजपेयी हे ग्वाल्हेरला होते; त्यामुळे त्यांना मराठी चांगले कळत असे. तसे त्यांनी मनोहर जोशींच्या ‘ सीट क्र॰ B 1 ‘ पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना नमूद केले आहे॰ ते पंतप्रधान नव्हते तेव्हा मुंबईला आले की ते सुधीर फडक्यांबरोबर आवर्जून दादरच्या ‘ शिवाजी मंदिर ‘ला जाऊन मराठी नाटके बघत असत॰

1976 साली नरसिंह राव हे भारताचे परराष्ट्र मंत्री होते. 1977 साली अटलबिहारी वाजपेयी भारताचे परराष्ट्र मंत्री झाले. तेव्हा मराठीवर मराठी इतकेच प्रेम करणाऱ्या दोन अमराठी व्यक्ती परराष्ट्र मंत्री झाल्या, म्हणून दिवंगत वि. आ. बुवांनी ‘ महाराष्ट्र टाईम्स ‘ मध्ये खास पत्र लिहून या दोघांचे कौतुक केलं होतं.

प्रकाश अकोलकरच्या शिवसेनेवरच्या पुस्तक प्रकाशनाला आलेल्या राजदीप सरदेसाईने 1997 साली हिंदीत भाषण केले होते॰ मात्र, नंतर तो ‘ IBN लोकमत ‘ वाहिनीवर आला तर आवर्जून मराठी बोलत असे॰ यु॰ पी॰ एस॰ मदान म्हणून शीख IAS अधिकारी महाराष्ट्र केडरमध्ये आहेत॰ ते 1993 मध्ये कल्याण महापालिकेचे आयुक्त होते॰ त्यावेळेस डोंबिवली येथे विभागीय मराठी साहित्य सम्मेलन भरले होते॰ प्रा॰ द॰ मा॰ मिरासदार त्याचे अध्यक्ष होते॰ त्या सम्मेलनाचे स्वागताध्यक्ष या नात्याने मदान यांनी अस्खलित मराठीत नमुनेदार आणि विचारगर्भ भाषण केले होते॰

भारतात कित्येक नामवंत बहुभाषी होते; आहेत॰ त्यांच्यामध्ये दिवंगत प्रा॰ रा॰ भि॰ जोशी हे एक होते॰ त्यांचा जन्म हैदराबादचा; म्हणून त्यांना उर्दू आणि तेलुगू येत असे॰ मराठी तर मातृभाषाच॰ नंतर ते कन्नडही शिकले॰ कारण त्या वेळच्या हैदराबाद संस्थानात गुलबर्गा, रायचूर, बेल्लारी असे 4 कन्नड भाषक जिल्हे होते॰ त्यावेळेस आता मराठवाडा म्हणून ओळखला जाणारा 5 जिल्ह्यांचा ‘ मोगलाई ‘ भाग हैदराबाद संस्थानातच होता.
रा॰ भि॰ इंग्लिश बरोबरच लॅटिन आणि फ्रेंच शिकले॰ मुंबईत आल्यावर ते एका वर्तमानपत्राचे फिरते प्रतिनिधी म्हणून काही दिवस काम करत होते॰ त्या वेळेस त्यांना गुजरातेत जावे लागत असे॰ त्यामुळे ते गुजराती शिकले॰ यथावकाश बंगालीही त्यांनी अवगत केली॰ अशा तर्‍हेने ते अनेक भाषांचे जाणकार होते॰

ते महाडच्या ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालया ‘चे प्राचार्य असतांना सायकल वरून भारतात भ्रमण करणारा एक बंगाली मुस्लिम माणूस महाडला आला होता॰ त्याचे त्यांनी महाविद्यालयात भाषण ठेवले होते॰ त्याची ओळख करून देतांना त्यांनी सफाईदार उर्दूत स्वागत केले॰ नंतर चहापानाच्या वेळेस ते त्याच्याशी बंगालीतही संवाद साधत होते; हे बघून सर्व प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थीवर्ग चकित झाला होता !

असेच बहुभाषी माजी पंतप्रधान पी॰ व्ही॰ नरसिंह राव होते॰ 2003 साली कराड येथे भरलेल्या साहित्य सम्मेलनात त्यांनी उद्घाटक म्हणून चांगल्या मराठीत भाषण केले होते॰ ते हैदराबादेत राहत असल्यामुळे त्यांना उत्तम मराठी येत असे. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील ‘ फर्गसन ‘ महाविद्यालयात झाले होते.

त्यांच्यामुळेच कुसुमाग्रजांना मराठीतील दुसरा ‘ ज्ञानपीठ पुरस्कार ‘ मिळाला. हे प्रा. बाळ गाडगीळ यांनी त्यांच्या ‘ वळचणीचे पाणी ‘ या आत्मकथनात सविस्तर लिहून ठेवलं आहे. त्यांनी ह॰ ना॰ आपटे यांच्या ‘ पण लक्षात कोण घेतो ? ‘ या कादंबरीचे तेलुगू मध्ये भाषांतर केले आहे॰

1969 – 70 च्या सुमारास वि॰ आ॰ बुवांचे हैदराबाद मध्ये ‘ विवेकवर्धिनी ‘ संस्थेत ‘ मराठी माणसांचे दोष ‘ या विषयावर विनोदी व्याख्यान झाले॰ त्या वेळेस मुख्य मंत्री असलेले नरसिंह राव एक प्रेक्षक म्हणून व्याख्यानाला हजर होते॰ बुवांचे भाषण ऐकून त्यांना स्फूर्ती आली; आणि त्यांनी सभेच्या अध्यक्षांचे भाषण झाल्यावर त्यांच्याकडे भाषण करण्याची परवानगी मागितली॰ सभेचे संकेत मोडून त्यांना परवानगी दिली गेली॰ मग त्यांनी शुद्ध मराठीत तेलुगू माणसाचे दोष या विषयावर बुवांइतकेच खुसखुषीत भाषेत भाषण केले ! या भाषणाची आठवण बुवा खूप वेळा काढत॰

हे राव भारतीय आणि परदेशी अशा 12 – 13 भाषा जाणत होते॰ विनोबा भावे हे ही 15 – 16 भाषा उत्तम रीतीने जाणत असत॰

जाता जाता…..

स्वातंत्र्य मिळाल्यावर एका सभेत सी॰ डी॰ देशमुखांनी मराठीत भाषणाला सुरवात केली॰ काही लोकांनी हिन्दी हिन्दी असा ओरडा सुरू केला॰ त्यावर बहुभाषी असलेल्या सी॰ डींनी मी भारतातल्या कोठच्याही भाषेत भाषण करण्यास तयार आहे; पण आज कोठल्याही परिस्थितीत मी इंग्लिशमध्ये भाषण करणार नाही, असे समय सूचकतेने सांगितले॰ सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला !

प्रकाश चांदे.

— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं