अखेर पितृभूमीकडे…
‘ लोकसत्ता ‘ दैनिकात तीन तपांपेक्षा जास्त काळ कार्यरत असणाऱ्या लता राजे यांचं इंग्लिश पुस्तकांचं वाचन अफाट होतं; आणि त्याला विषयाचं बंधन नव्हतं. आपल्या सहकाऱ्यांच्यांतले चांगले गुण ओळखून त्यांना उत्तेजन देणाऱ्या चतुरस्त्र संपादक माधव गडकरी यांनी त्यांना या आधारावर जगात घडलेल्या संस्मरणीय आणि मनोरंजक घटनांची दखल घेऊन एक साप्ताहिक सदर लिहावयास 1986 साली सुचवलं. त्याचं नाव ‘ परिक्रमा ‘.
पहिल्याच लेखापासून हे सदर लोकप्रिय झालं.
1991 पर्यंत एकही खंड न पडता हे सदर सलग चाललं.
त्यांतील लेखांचे चार खंड प्रकाशित झाले आहेत.
त्यांतील एका खंडात आलेली ही एक हृदयस्पर्शी कथा !
1962 साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष केनेडी यांनी व्हिएतनाम या आशियायी देशात लष्करी हस्तक्षेप केला. ही त्यांची घोडचूक होती. अमेरिका आणि व्हिएतनाम यांचं युद्ध सुरु झालं. ते 1975 साली संपलं.
अमेरिकन सैनिक अमेरिकेत माघारी परतले.
युद्ध संपलं.
पण त्यानं एका जुन्याच समस्येला नव्यानं जन्म दिला.
कुठल्याही युद्धाचे जे अनेक दुष्परिणाम होतात, त्यांपैकी एक म्हणजे सैनिक आणि स्थानिक स्त्रिया, मुली यांचे ‘ संबंध ‘ होऊन त्यांतून संतती जन्माला येणं. हा अपरिहार्य परिणाम होता.
येथेही अमेरिकन सैनिक आणि व्हिएतनामी मुली / स्त्रिया यांच्यांत ‘ संबंध ‘ होऊन सुमारे अर्धा लाख मुलं – मुली व्हिएतनाम मध्ये जन्माला आली.
यांना ‘ अमेरेशियन ‘ असं म्हटलं जाऊ लागलं.
या पैकी काहींना आपल्या वडिलांचं नावच माहिती नव्हतं. ज्यांना ते माहित होतं, त्या पैकी काही जण ते लावीतही होती ! पण त्यामुळे अधिकच गोंधळ झाला ! जी मुलं वडिलांच्या चेहेऱ्यावर गेली होती त्यांना त्रास सहन करावा लागतच होता. अशा मुलांच्या आयांचा सर्रास ‘ बाजार बसव्या ‘ म्हणून हेटाळणीपूर्वक उल्लेख होऊ लागला. मात्र, जी मुलं आईची चेहेरेपट्टी घेऊन जन्माला आली ती आणि त्यांच्या आया या हेटाळणीतून बचावल्या !
व्हिएतनामनं वडलांच्या चेहेऱ्यावर गेलेल्या मुलांना सरळ सरळ नाकारलं.
व्हिएतनामी लोकांचं मानसशास्त्र वेगळंच आहे. त्यांना एकवेळ गुन्हेगार मोकाट सुटले तरी चालतील; पण अमेरिकेची कोणतीही चीज त्यांना चालत नाही !
सतत होणाऱ्या उपेक्षेतून ही मुलं वाया जाऊ लागली. काही उन्मार्गी झाली. यांना शिक्षण घेता येत नव्हतं. स्थानिक समाजात वावरता येत नव्हतं. कामधंदा करता येत नव्हता. अर्थार्जन करता येत नव्हतं. त्यामुळे रोजच्या दोन्ही वेळच्या खाण्या – पिण्याचे प्रश्न सतत उभे राहिले.
त्यांचं जिणं त्यांना असह्य होऊ लागलं. त्यामुळे ती मुलं अक्षरश: काहीही करू लागली !
त्यातून एकच मार्ग होता. या मुलांना अमेरिकेत पाठवणं.
पण अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यांत राजनैतिक संबंध उरले नव्हते. त्यामुळे व्हिएतनामला अमेरिकेशी थेट संपर्क साधून विनंती करता येत नव्हती. मग व्हिएतनामनं प्रथम खलित्यांवर खलिते पाठवले आणि प्रश्नाला वाचा फोडली. अमेरिका तशी त्यांना दाद देईना. म्हणून अन्य राष्ट्रांना मध्यस्थी घालून ही मुलं अमेरिकेनं स्वीकारावी म्हणून व्हिएतनामी शासनानं जोरदार प्रयत्न सुरु केले.
‘ ही तुमची मुलं आम्हाला नको आहेत. ती तुमची परत न्या ‘ म्हणून व्हिएतनामनं अमेरिकेवर विविध मार्गांनी दबाव आणायला सुरवात केली.
अखेर अमेरिकन काँग्रेसमध्ये साधक बाधक चर्चा झाली; आणि अमेरिकन काँग्रेस व राष्ट्राध्यक्ष रेगन यांनी या मुलांना अमेरिकेत आणायचा असा निर्णय घेतला !
रेगन म्हणाले ‘ काळी, गोरी कशीही ती मुलं असोत; ती अमेरिकन सैनिकांची मुलं आहेत. व्हिएतनाममध्ये रक्त सांडणाऱ्या, प्रसंगी प्राणास मुकलेल्या माझ्या अमेरिकन सैनिकांची ती निशाणी आहे !
अमेरिका त्यांना निश्चित सन्मान देईल ! ‘
ठराव झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत त्या मुलांची नोंदणी करण्यात आली. या मुलांना फक्त व्हिएतनामी भाषा येत होती. ती अत्यंत गरीब होती. तेव्हा इंग्रजी भाषा, अमेरिकन रीती रिवाज त्यांना विशिष्ट वय उलटण्यापूर्वीच अवगत व्हावेत म्हणून त्यांच्या स्थलान्तरांचे आदेश त्वरेने काढण्यात आले.
1988 च्या मार्चमध्ये 30,000 ‘ अमेरेशियन ‘ मुलांचा एक समूह व्हिएतनाम सोडून अमेरिकेकडे रवाना झाला ! सहानुभूती म्हणून कित्येक मुलांच्या आया होत्या, त्यांचाही अमेरिकेनं यांत समावेश केला !
अमेरिकेतील समाज कल्याण संस्था, अमेरिकन शासनाचं समाज कल्याण खातं, ‘ फोर्ड ‘, ‘ रॉकफेलर ‘ सारख्या धनिकांचे निधी, गावोगावची चर्चेस, मदर तेरेसांची अमेरिकेतील मिशन्स यांनी आपले दरवाजे उदार अंत:करणानं उघडले.
… आणि यांचं स्वागत केलं !
जाता जाता :
व्हिएतनामवर अशी वेळ दुसऱ्यांदा आली होती.
1945 ते 54 या काळात इंडो चायना युद्धाच्या वेळी फ्रेंच सैनिक आणि व्हिएतनामी स्त्रिया यांच्या जवळीकीतून 3,000 मुले जन्माला आली होती. त्यांना स्थानिक व्हिएतनामी लोकांनी खड्यासारखं वगळलं होतं. त्याही वेळेस फ्रेंच शासनावर व्हिएतनामी शासनानं दबाव आणला; त्यामुळे त्या मुलांना फ्रेंच शासनानं खास हुकुमान्वये फ्रान्समध्ये नेऊन फ्रेंच नागरिकत्व दिलं होतं.
1945 मध्ये अमेरिकेनं जपान वर अणुबॉम्ब टाकल्यावर जपानमध्ये काही मोजके अमेरिकन सैनिक तळ देऊन होते. तेथेही अशी समस्या उद्भवली असती. पण त्यावेळचा अमेरिकेचा धोरणी, दूरदर्शी आणि चाणाक्ष सैन्यप्रमुख जनरल डग्लर मॅकआर्थर यानं कौशल्यानं परिस्थिती हाताळली होती.
जपान मधील अमेरिकन सैनिकांसाठी त्यांच्या मित्र मैत्रिणी, कुटुंबीय अधून मधून जपानला पाठवण्याची व्यवस्था तो नियमितपणे करीत असे. तसेच, विशिष्ट मुदती नंतर प्रत्येक सैनिकाला सक्तीनं तो मायदेशी सुटीवर पाठवत असे. सर्वात कळस म्हणजे, अविवाहित अमेरिकन सैनिक आणि जपानी मुलगी यांच्यांत ‘ तसं काही ‘ आढळलं तर हा जनरल त्यांना सरळ विवाह करायला भाग पाडत असे !
पण जनरल डग्लसला जे जमलं ते व्हिएतनामी युद्धाच्या वेळेस अमेरिकेत जनरल असलेल्या मॅक्स्वेल टेलरला जमलं नाही !
खंत :
ही ‘ अमेरेशियन ‘ मुलं अमेरिकेत गेली 1988 च्या मार्च महिन्यात. त्या वेळेस ती 20 – 25 वर्षांची असावीत. नंतर सुमारे 2010 / 11 च्या सुमारास लता राजे यांचा हा लेख परत वाचताना माझ्या असं लक्षात आलं की ही मुलं आता चाळीस किंवा त्या पेक्षा जास्त वयाची झाली असावीत.
या पैकी कुणी आत्मचरित्र लिहून आपले अनुभव नोंदवले असले तर, ते वाचनीय असतील. सध्या इंग्लिश पुस्तकांचं अफाट वाचन असणाऱ्यांच्यांत ‘ लोकसत्ता ‘चे संपादक गिरीश कुबेर आहेत. म्हणून मी त्यांना विरोपपत्र ( e mail ) लिहिलं की असं एखादं पुस्तक आपल्या वाचनात निश्चित आलं असणार. आपण कृपया त्या पुस्तकाचं नाव आणि अन्य तपशील कळवू शकाल का ?
पण गिरीश कुबेर यांनी त्या विरोपपत्राची दखलही घेतली नाही !
— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800