माझे हजर जबाब !
या शीर्षकाला अहंभावाचा रुक्ष वास येतोय, याची मला कल्पना आहे. पण लेखातील माझा अहंभाव वाटणाऱ्या भागाकडे दुर्लक्ष करून त्याचा आस्वाद घ्यावा ही, विनंती !
पत्र्याचे छोटे डबे बनवणाऱ्या एका कंपनीत मी काम करत होतो. टूथ पावडर, टाल्कम पावडर, यांचे अंडाकृती, गोल छोटे डबे आम्ही बनवत असू. आम्हाला ‘ Ponds ‘ नावाच्या एका प्रख्यात कंपनीची टाल्कम पावडरच्या 400 ग्रामच्या एक लाख डब्यांची ऑर्डर मिळाली. या डब्याची उंची जवळ जवळ 250 मिलीमीटर ( मि. मी. — दहा इंच ) होती.
मात्र, महत्त्वाचा प्रश्न हा होता की, असे उंच डबे बनवणारी यंत्रणा आमच्यापाशी नव्हती. ऑर्डर तर मोठी होतीच; पण ‘ Ponds ‘ सारख्या सर्वात मोठं नाव असणाऱ्या कंपनीशी आमचं नाव जोडलं जाणार होतं. ही ऑर्डर गमावून चालणार नव्हतं. मग असे डबे बनवणाऱ्या दुसऱ्या छोट्या उद्योजकाकडून ते डबे बनवून घ्यायचं, असं ठरलं.
असा उद्योजक शोधण्याची जबाबदारी माझ्यावर आली. असा एक मध्यम वयीन मुस्लीम उद्योजक मी शोधला. तो हे डबे बनवू शकत होता. त्याची उत्पादन प्रक्रिया, क्षमता, डबे प्याक करण्याची आणि साठवण्याची क्षमता, स्वच्छता आणि अन्य बाबींची मी खात्री करून घेऊन तसा अहवाल मी माझ्या कंपनीत दिला.
आमच्या संचालकांना तो पसंत पडल्यामुळे प्रत्येक डब्याची निर्मिती किंमत ठरवण्यासाठी त्याला आम्ही आमच्या कंपनीत बोलावलं. येताना त्याला तसे बनवलेले 2 – 3 नमुन्याचे डबे आणण्यास बजावले होते.
मात्र, तो येताना त्याच्याकडे 250 मि.मी.उंचीचे डबे तयार नसल्यामुळे 125 मि. मी. उंचीचे डबे घेऊन आला. बाकी सर्व सारखेच होते. फक्त उंची निम्मी होती. पण आमच्या संचालकांनी त्यांना 250 मि.मी. उंचीचेच डबे नमुना म्हणून बघण्याचा हट्ट धरला.
तो चूक नव्हता. त्याचं म्हणणं इतकंच होतं की, उंची सोडली तर बाकी सर्व समान होतं; त्यामुळे कल्पना यायला काहीच हरकत नव्हती.
तो ही हटून बसला. शेवटी संचालक मला म्हणाले की काय तुम्ही माणूस शोधलाय ? असे डबे निर्माण करणारा दुसरा उद्योजक शोधा.
माझ्या पोटात गोळा आला !
कारण पुन्हा सर्व प्रक्रिया पहिल्यापासून सुरु करा. ते त्रासदायक होतंच. शिवाय, वेळ खाऊ होतं. यात ती ऑर्डर गमावण्याचा धोका होता.
अखेरीस, मो थोडं विनोदानं आणि थोडं वैतागून म्हणालो की, मियांजी, आमच्या हिंदू लोकांत धाकटी बहिण बघून मोठ्या बहिणीला होकार देत नाहीत. जिच्याशी लग्न करायचंय, तिलाच बघून आम्ही होकार / नकार देतो !
वातावरण सैल झालं !
त्या उद्योजकानं दुसऱ्या दिवशी सकाळीच तसे नमुने घेऊन यायचं कबूल केलं !
किंमत ठरली. ऑर्डर पक्की झाली !
मी त्या वेळेस नासिकला राहत होतो. साधारण दर 20 –- 21 दिवसांनी मी राज्य परिवाहन महामंडळाच्या ( एस. टी. ) गाड्यांनी मी मुंबईला येत असे. नासिक – मुंबई तिकीट 9 रुपये 50 पैसे होतं. वाटेत कसारा येथे गाडी चहासाठी थांबत असे. तेथल्या उपाहार गृहात 1 रुपयाला चविष्ट चहा मिळत असे. तो मी हमखास घेत असे. सुट्या पैशांची चणचण असल्यामुळे बरोबर एक रुपया दिला की, उभयपक्षी सोयीचं पडे.
एका फेरीत माझ्याकडे बरोबर फक्त 50 पैशाचं नाणं होतं. बाकी मोठ्या किमतीच्या नोटा होत्या. मी वाहकाला दहा रुपयांची नोट देऊन उरलेले 50 पैसे मला कसारा येण्यापूर्वी देण्याची विनंती केली. कारण प्रत्येक प्रवासी वाहकाला दहा रुपयांची नोट देत असे. इतक्या प्रवाशांना प्रत्येकी 50 पैसे सुटे परत देणं वाहकाला त्वरित जमत नसे. मुंबई येईपर्यंत तो ते पैसे परत करत असे.
कसारा जवळ आलं तरी वाहक मला 50 पैसे देण्याचं नाव काढेना. मी एक दोनदा आठवण केली. त्याच्या लक्षात होतं. पण त्याच्याकडे सुटे 50 पैसे नव्हते. तिसऱ्या वेळेस मात्र, मी आठवण केल्यावर तो मला मोठ्यानं म्हणाला की, साहेब, राहू द्यात की 50 पैसे माझ्याकडे. मी तुमच्या नावानं त्यांचा चहा पिईन.
चालेल ना ?
काही प्रवासे हसले !
माझे हक्काचे पैसे असून वाहक मला असं उपहासात्मक आणि अपमानास्पद बोलला, त्याचा मला राग आला.
मी त्वरित सर्व प्रवाशांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात म्हणालो ( तसा माझा आवाज मोठाच आहे ! ) की, माझ्या पैशानं चहा प्यायचा असेल तर तो 50 पैशांचा साधा चहा पिऊ नका. मी आणखीन 50 पैसे देतो. 1 रुपयाचा स्पेशल चहा प्या !
सर्व प्रवासी हसले !
वाहक उमदा होता. त्याच्या लक्षात मी 50 पैशांचा तगादा का लावत होतो, ते बहुधा लक्षात आलं. तो लगेच म्हणाला की, आज माझ्यातर्फे तुम्हाला चहा पाजतो ! आमची दोस्तीच झाली !
मी माटुंग्याच्या VJTI या शिक्षणसंस्थेत शिकत असताना माझी मैत्रीण पुण्याला शिकत होती. ती मुंबईच्या वक्तृत्व स्पर्धांत नियमितपणे भाग घेत असे, आम्ही पत्र राखी भाऊ बहिण होतो. आम्ही एकमेकांना एक दोनदाच भेटलो होत. ती मुंबईला येत असे, त्या वेळेस दादर स्थानकावर तिला उतरवून घेऊन, दुपारचं ( स्वस्त राईस प्लेट मिळणाऱ्या भोजनालयात ! ) भोजन करून इच्छित महाविद्यालयात पोचवणे, आणि स्पर्धा संपली की, तिला सायंकाळच्या पुण्याच्या गाडीत बसवून देणं अशी कामे मी ( उत्साहानं ! ) करत असे.
अर्थात, ती जरी राखी बहिण होती, तरी मी तिला भेटायला जाताना गर्ल फ्रेंडला भेटायला जाताना जावं तसा नीट नेटक्या कपड्यात जात असे. त्यावेळेस माझ्याकडे एकच शर्ट प्यांटची चांगली जोडी होती. अर्थात, दर वेळेस मी तीच परिधान करत असे.
एकदा मात्र, लागोपाठ दोन शनिवारी ती स्पर्धांना आली.
अर्थात, मी मागच्याच शनिवारी परिधान केलेली शर्ट प्यांटची तीच जोडी परिधान केली होती. भोजन करताना ती आपुलकीनं म्हणाली की, तुझ्याकडे कपड्यांची एकच जोडी आहे का रे ?
ती असं का विचारत आहे, हे माझ्या लक्षात येउनही, तिनं असा प्रश्न का विचारला असा प्रश्न मी तिला केला. त्यावर ती म्हणाली की मागच्या शनिवारी तू हीच कपड्यांची जोडी परिधान केली होतीस. मी आश्चर्यचकित होत म्हटलं, की मी हीच जोडी परिधान केली होती ? माझ्या लक्षात नाही.
ती ठामपणे होय म्हणाली. ‘ या रंगांची आवड असल्यामुळे मी असे सहा शर्ट प्यांट शिवून घेतले आहेत ‘, मी समय सूचकता दाखवून तिला उत्तर दिलं.
त्या काळात 99 % विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अशी बेतास बात असल्यामुळे तिला त्यातल्या करुणेपोटी आलेल्या विनोदानं वाईटंच वाटलं !
आपल्या ग्रुपमध्ये एखादी व्यक्ती स्पष्टवक्ता असते. ती कोणाच्याही पाठीवर कधी कधी अप्रिय वक्तव्य करते. कधी कधी तर ते आपल्याबद्दलच असतं. माझ्या कानावर जर असं वक्तव्य आलं तर, ते वक्तव्य माझ्या तोंडावर ती व्यक्ती बोलत नाही; तो पर्यंत मी त्या वक्तव्याची दखल घेत नाही.
क्वचित आम्हा उभयतांना परिचित असणारी व्यक्ती मला त्या बद्दल काय वाटते, अथवा मी तिला काय उत्तर दिलं; या बद्दल खोदून खोदून प्रश्न करते. माझ्या तोंडावर ती व्यक्ती जो पर्यंत बोलत नाही, तो पर्यंत मी अशा वक्तव्याची दखल घेत नाही; असं सागंतो.
त्या व्यक्तीची उत्सुकता तर ताणलेली असते. तिचा माझ्या उत्तरावर विश्वास बसतोच असं नाही. तिनं अगदीच माझा पिच्छा पुरवला तर मी तिला सांगतो की माझ्यावर विश्वास बसत नाही ना; मग हा घ्या तिचा नंबर, आणि तिला विचारा की मी तिला काय बोललो ते.
असं अनपेक्षित उत्तर माझ्याकडून आल्यावर ती व्यक्ती गडबडते !
मी तिला आणखी गडबडवण्यासाठी म्हणतो की, माझा नंबर तर तुमच्याकडे आहेच. ती व्यक्ती काय म्हणाली, हे मला फोन करून सांगायला मात्र विसरू नका !
बहुधा ती व्यक्ती काय समजायचे ते समजते !
जाता जाता :
हे प्रसंग माझ्या समयसूचकतेसाठी लिहिलेले नाहीत. अशा समर्पक प्रतिक्रिया अचूक वेळेवर दिल्या गेल्या तर नंतरचे अनावश्यक संभाषण टाळते; असाच माझा अनुभव आहे.
आपणही अशा समयसूचक प्रतिक्रिया योग्य वेळी दिल्या असणारच. त्या आठवून पहा !
सुरवातीला म्हटल्या प्रमाणे याला येत असलेल्या माझ्या अहंभावाकडे कृपया दुर्लक्ष करावे !
— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800