नवे मित्र, नवी मैत्री
सुमारे 4 वर्षांपूर्वी सन्मित्र सुभाष बोरसे याच्यामुळे अमळनेरस्थित विजय कुडे याच्याशी ओळख झाली.’ स्टेट बँके ‘ तून निवृत्त झालेला साहित्य, कविता, हिंदी चित्रपट गीतप्रेमी, जातिवंत रसिक आणि नामवंत कवि प्रा. गणेश कुडे यांचा विजय हा मुलगा. हा गावोगावी’ मराठी भावगीतांची वाटचाल ‘ कार्यक्रम करत असतो. याचे शेकड्यांनी कार्यक्रम झाले आहेत. हा कार्यक्रमापूर्वी सं. दि. कमलाकर भागवत याची माहिती विचारण्यासाठी म्हणून माझ्याकडे आला; आणि कायमचा मित्र झाला !
विजयनं विषयाचं बंधन नसलेला ‘नर्मदे हर’ या नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप स्थापन केला आहे. त्यात त्यानं मलाही सामील करून घेतलं. त्यामुळे त्याच ग्रुपवर असलेल्या दीपक वाणी या धुळ्याच्या दुसऱ्या समानधर्मा दोस्ताचा परिचय झाला.
हे कुडे आणि वाणी अधून मधून तिकडे येण्याचा आणि तिकडच्या रसिकांना भेटण्याचा मला आग्रह करत होते. पण प्रामुख्यानं ‘कोरोना’ मुळे आपण सर्वचजण आपापल्या घरी, गावी जखडले गेलो होतो. मात्र, काही महिन्यांपूर्वी ही बंधने दूर झाली; आणि मग गेल्या आठवड्यात हा संकल्पित दौरा पार पडला.
प्रत्यक्ष भेट झालेली नसूनही दीपक वाणी नं मला त्याच्या घरी उतरण्याचं निमंत्रण दिलं. राज्य परिवहन मंडळाच्या धुळे बस स्थानकावर तो त्याचं वाहन घेऊन स्वागतासाठी आला.
त्याच्या 2007 साली बांधलेल्या आधुनिक, सुसज्ज बंगल्यात त्यानं माझी स्वतंत्र खोली देऊन सोय केली. 54 – 55 वर्षांचा दीपक वाणी हा देखणा, जबरदस्त चित्रपट गीत प्रेमी, लहान वयात वडिलांच्या निधनामुळे अंगावर पडलेल्या आणि समर्थपणे पेललेला, मेहनती, उत्साही आणि अतिशय अतिथ्यशील तरुण ! मी पहिल्यांदाच भेटत असूनही, त्याची वागणूक आणि बोलणं मात्र, आमची कित्येक वर्षांची ओळख असल्यासारखं. त्यामुळे माझा संकोच त्वरित दूर झाला.
त्यानंही त्याच्या ‘आठवणीतील गाणी‘ या Whatsapps ग्रुपमध्ये मला सामील करून घेतलं. शिवाय, वैयक्तिकरित्या ही तो माझ्याशी संपर्क करतो.
मला विविध विषयांची आवड आहे; बऱ्याच गोष्टींची बऱ्यापैकी माहिती आहे. वाचन, प्रवास आणि भेटलेल्या छोट्या – मोठ्या व्यक्ती यामुळे माझ्याकडे माहितीपूर्ण आणि मनोरंजक गोष्टींचा चांगला साठा आहे. तो मी संधी साधून या दोन्ही ग्रुप्स वर सादर करत असतो.
दीपकला स्वत:ला अशा गोष्टींची प्रचंड आवड असल्यामुळे तो मला रा. प. मं. च्या धुळे स्थानकावर उतरवून घेण्यासाठी, स्वत:चं वाहन घेऊन आला तेव्हा पहिल्या 2 – 3 मिनिटांतच अशा गोष्टींचा सिलसिला सुरु झाला !नंतर त्याच्या आधुनिक आणि प्रशस्त बंगल्यात आल्यावरही हे सत्र चालूच राहिले.
धुळे जिल्ह्याला पूर्वी पश्चिम खानदेश म्हणत असत, धुळे शहराचं शहर नियोजन आणि आखणी, ‘भारतरत्न’ डॉ. विश्वेशरय्या यांनी केली आहे, धुळे हे रूळ वाटेच्या (रेल्वेच्या) मुख्य मार्गावर येत नसल्यामुळे शहराचा झालेला धीमा विकास, धुळे जिल्ह्यातील आदिवासींचा केलेला वेगळा नंदुरबार जिल्हा, या जिल्ह्याला एका बाजूनं गुजरात आणि दुसऱ्या बाजूनं लागलेलं मध्य प्रदेश ही राज्ये, ‘सत्कार्योत्तेजक सभा‘, श्री समर्थ वाग्देवता मंदिर, शंकर श्रीकृष्ण देव, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, उद्योजक प्रताप शेठ, चित्रपट गायिका राजश्री शहा, Calculus मधील ‘Limit’ आणि ‘Integration’ च्या मनोरंजक कथा अशा अनेक विषयांवर आमच्या गप्पा झाल्या.
यांतील काही गोष्टी मला माहित होत्या.
दीपकनं शंकर देव स्थापित ‘सत्कार्योत्तेजक सभा‘ मला दाखवली. धुळे आणि महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी ही संस्था आहे. येथे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या ग्रंथांच्या, (त्यांत ‘रामायण‘ ही आहे) हस्त लिखित प्रती आहेत. रामदास स्वामी, त्यांचा पट्ट शिष्य कल्याणस्वामी, त्यानं लिहून घेतलेली हे ग्रंथ, त्याचं टपोरे आणि सुबक अक्षर, प्रत्येक कागदावर केलेली आखीव रेखीव आखणी, या प्रतीचं करत असलेले ‘डिजिटायजेशन‘ अशा थक्क करणाऱ्या गोष्टी पाहिल्या. हे कार्य निरलसपणे करणारे यांची भेट झाली. त्यांच्याबरोबर सुमारे 2 तास घालवल्यामुळे किती तरी गोष्टी समजल्या.
स्वत: शंकर श्रीकृष्ण देव यांचं चरित्रही विस्मय वाटावा असंच आहे.
दीपक जेमतेम दहा वर्षांचा असताना त्याच्या डॉक्टर असलेल्या वडिलांचं अकाली निधन झालं. त्यांची प्रक्टिस जोरात होती. पण ते गरिबांना मोफत अगर अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा पुरवत असल्यामुळे त्यांच्या पश्चात त्याच्या कुटुंबीयांची ओढाताण झाली. त्यामुळे चौथी / पाचवीपासूनच दीपकनं शिकवण्या करून आर्थिक स्वावलम्बनाला सुरवात केली. ‘Earn & Learn’💐 करत त्यानं अभियांत्रिकेची पदविका प्राप्त केली. मात्र, तो अत्यंत बुद्धिमान असल्यामुळे आणि शिकवणं त्याच्या रक्तातच असल्यामुळे त्याला शिकवण्या मिळत गेल्या. त्यानं स्वत:च्या वर्गातील मुलाचीही शिकवणी घेतली होती !
चित्रपट कथा वाटावी अशी त्याची विवाह कथा आहे. त्याची पत्नी त्रिपुरा राज्यातील; आणि पत्रमैत्रीमुळे मैत्रीला सुरवात होऊन त्याची परिणीती विवाहात झाली ! सुमारे 3 वर्षे पत्रमैत्री असूनही लग्नाच्या केवळ 3 दिवसच आधी त्या दोघांनी एकमेकांना पाहिले !
ही सर्व कथा दीपकच्या तोंडून ऐकण्यात खूप मजा येते !
त्याची पत्नी स्मृति दासगुप्ता ही MA आहे; आणि अकरावी बारावीच्या मुलांना ती अर्थ आणि राज्य शास्त्र शिकवत असे. ठेंगणी आणि मितभाषी असलेली स्मृति ही आता मराठी बोलू शकते. ती ही अतिथ्यशील आणि प्रेमळ आहे. तिनं पर भाषिक असूनही याच्या सर्व नातेवाईकांशी अल्पावधीत जुळवून घेतलं.
दीपकची मोठी मुलगी हिला के. जी. मध्ये दाखल करायची वेळ आली, तेव्हा या पती पत्नींनी धुळ्यातील त्या ‘शाळा’ पाहिल्यावर नैराश्य येऊन स्वत:ची प्री प्रायमरी शाळा स्थापन करण्याचं निर्णय घेतला; आणि तो अमलात आणला. आता पाहिलीपूर्वीची चार वर्षांची प्री प्रायमरी शाळा ते दोघे स्वत:च्या बंगल्यात चालवतात. 6 वर्षांपर्यंत मुलाला लिहायला न शिकवता वाचायला शिकवणं आणि अन्य गोष्टींत त्यांना रस / कुतूहल निर्माण करणं; या तत्त्वांनुसार त्यानं या 4 वर्षांचं नियोजन केलं आहे. बहुतेक सर्वच मुलं मुली अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद देतात, असं त्याचं निरीक्षण आहे.
रविवारी 8 तारखेला धुळेस्थितच सन्मित्र गिरीश चौक यांना बरोबर घेऊन धुळ्यापासून केवळ 34–35 कि. मी. अंतरावर असलेल्या अमळनेरला, दीपकच्या गाडीनं आम्ही गेलो.
तेथे दिवसभर साहित्यिक वातावरणात डुंबत होतो !
सोमवारी सकाळी 9 तारखेला मी धुळे – कल्याण बसनं डोम्बिवलीला परतलो !
शुक्रवार दुपारपासून सोमवार सकाळ पर्यंत आम्ही न थकता गप्पा मारत होतो !
या गप्पा ध्वनिमुद्रित करायला त्याला सुचलं नाही, म्हणून तो हळहळला !
नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात काही सन्माननीय मित्रांची भेट झाली, काहींची नव्यानं दोस्ती झाली.
या पेक्षा नवीन वर्षाची सुरवात चांगल्या तऱ्हेने होऊ शकते का !

– लेखन : प्रकाश चान्दे. डोंबिवली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800