कांही योगायोग !
काही गमती !
आमच्या महाडच्या संगीत दिग्दर्शक कमलाकर भागवतच्या दोन जुळ्या सख्ख्या बहिणींची ही कथा ..
त्यांची नावे दामिनी आणि भामिनी. आम्ही त्यांना दामी – भामी म्हणत असू ! त्या इतक्या सारख्या दिसायच्या की आम्ही एका गल्लीत राहून, आणि जवळजवळ त्यांना दररोज बघूनही त्यातली दामी कुठली आणि भामी कुठली हे आम्हाला कळत नसे. भामीचे लग्न झाले, त्यामुळे त्यांना वेगळे ओळखण्याची खूण मिळाली! मग तिला आम्ही मिसेस पाटणकर म्हणू लागलो.
राम मराठ्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नात ती भेटली. तिने मला ओळखले; आणि ती म्हणाली, प्रकाश, मला ओळखलेस ना ? मी भामिनी. मी म्हटले ते नको सांगूस. तू मिसेस पाटणकर का मिसेस खाडिलकर ? ते सांग !
ती अर्थातच हसली !
ती राम मराठे यांच्या मुलांची मामी !
दुसर्या जुळ्या बहिणीचे लग्न कोल्हापूरच्या प्रसिद्ध गायिका इंदिराबाई खाडिलकर यांच्या मुलाशी झाले. ही नाट्याचार्य आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांची नात सून. सध्याचे मराठीतील लोकप्रिय गायक भाऊ बहिण त्यागराज खाडिलकर आणि अमृता नातू हे या दामीचे पुतणे. माझे भिवंडीच्या ‘ लोकमान्य टिळक ‘ वाचनालयात भाषण होते. त्यावेळेस मला तेथील ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता कर्व्यांनी महाडच्या आरएसएस कार्यकर्ता वसंत भागवतांचा फोन नंबर माझ्याकडे मागितला होता. हे वसंत भागवत या कमलाकर भागवतचे सख्खे मोठे बंधु.
या दोन बहिणी दोन नामवंत घराण्याशी जोडल्या गेल्या; तसेच शशी मेहता याच्या कुटुंबातही काहीसे असेच झाले आहे. याची मोठी वहिनी ज्योत्स्ना ( या नावातील दोन्ही अक्षरे जोडाक्षरे आहेत ! ) ही मोहन धारियांची सख्खी बहिण. या ज्योत्स्ना धारियाचे दुसरे मोठे भाऊ गोपिनाथ. हे मॅट्रिक झाल्यावर 1940 / 41 च्या सुमारास निपाणीला गेले; आणि तेथे ‘तंबाखू सम्राट’ देवचंद शहांकडे मुनीम म्हणून काम करू लागले. लवकरच ते स्वत: मोठे तंबाखू व्यापारी झाले. ते सतत 41 वर्षे निपाणीचे नगराध्यक्ष होते.
स्वत: शशीची पत्नी उषा ही संगमनेरच्या नाना साहेब पिंगळे या ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्याची कन्या; आणि दुसरी वहिनी माजी गृहराज्य मंत्री अरुण मेहता याची पत्नी लीला; ही नाटककार सुरेश खरेची सख्खी मावस बहिण.
हिचे आजोबा नागपूरच्या शंकराचार्य आणि तत्कालीन मध्य भारताचे पंतप्रधान डॉ॰ ना. भा॰.खर्यांचे सख्खे भाऊ.(पारतंत्र्यात मुख्य मंत्र्याला पंतप्रधान म्हणत असत! ) या डॉ. ना. भा. खर्यांनी महात्मा गांधींशी ‘पंगा‘ घेतला; त्यामुळे पंतप्रधान पदाचा त्यांना त्याग करवा लागला !
आमच्या बरोबर 1960 च्या दशकात, VJTI च्या वसतीगृहामध्ये सावद्याचा एस. व्ही. पाटील होता. त्याचेही वडील, गोपीनाथ धारिया यांच्याप्रमाणेच सावद्याचे 1940 पासून नगराध्यक्ष होते. नंतर आम्ही शिकत असतांना या पाटीलचा मोठा भाऊ सावद्याचा उपनगराध्यक्ष झाला !
आपण ज्याला योगायोग म्हणतो अशा घटना सर्वत्र घडत असतातच.
‘रिझर्व बँके‘चे पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख ICS होऊन भारतात आले; आणि उमरावतीला (त्या वेळेस अमरावतीला उमरावती म्हणत असत.) सहाय्यक जिल्हाधिकारी झाले.
त्या काळात अमरावतीला सीकेपी कुटुंबे भरपूर होती. त्यांतील एक नामवंत कुटुंब म्हणजे जयवंत वकील. हे अतिशय सधन आणि बुद्धिमान होते; आणि सर्वजण देखणेही होते.या जयवन्तांची सुंदर आणि बुद्धिमान, तरुण मुलगी कुसुमावती हिचे लग्न सी. डीं.शी व्हावे, अशी सर्वच जयवंत कुटुंबीयांची इच्छा होती. पण तिने महाविद्यालयात असतानाच कवि आ. रा. देशपांडे (नंतर कवि अनिल,‘ अजुनी रुसूनी आहे ’ चे कवि !) यांच्याशी प्रेमलग्न जमवले. त्यामुळे सी.डीं शी तिचे लग्न होऊ शकले नाही.
पण नंतर सी. डींच्या धाकट्या भावाशी, रामशी कुसुमावतीच्या धाकट्या बहिणीचे लग्न ठरले !
हे राम देशमुख नंतर RBI मध्ये खूपच मोठ्या हुद्दयावर कार्यरत होते॰
माजी गृहराज्य मंत्री अरुण मेहताचे काहीसे असेच झाले.त्याच्या मोठ्या भावाशी, शशी मेहताशी अरुणची पत्नी लीला हिचा मोठा भाऊ डॉ॰ बाळ खरे याची मैत्री होती.पण लग्न या दोघांनी जमवले.
कवि अनिल आणि कुसुमावती हे दोघेही पती – पत्नी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले.असे हे एकच जोडपे आहे. (अनिल – 1958 मालवण; आणि कुसुमावती – 1961 ग्वाल्हेर) मात्र, आत्तापर्यंत केवळ पाचच स्त्रिया मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या आहेत. कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत (कर्हाड – 1975), शांता शेळके (आळंदी – 1996), विजया राजाध्यक्ष (इंदूर – 2001) आणि अरुणा ढेरे (यवतमाळ – 2019).
पु. भा.भावे, अरविन्द गोखले, व्यंकटेश माडगूळकर आणि गंगाधर गाडगीळ हे चौघेजण नव कथेचे अध्वर्यु ! (‘शांताराम ‘ — प्रा. के. ज. पुरोहित यांनाही पाचवा शिलेदार मानले जाते…) यांतले अरविन्द गोखले सोडले तर ‘शांतारामां l सकट सर्वजण सा.स. चे अध्यक्ष झाले. भावे (पुणे – 1977); गाडगीळ (रायपूर – 1981 डिसेंबर). या एका वर्षात दोन साहित्य सम्मेलने झाली. पहिले 1981 फेब्रुवारी अकोला येथे (अध्यक्ष गो.नि दांडेकर ); आणि शांताराम (अमरावती — 1992).
तसेच, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, शंकर पाटील आणि व. पु. काळे हे मराठीतील अत्यंत गाजलेले कथाकथन कार. या चौघांपैकी, व. पु. काळे सोडून, तिघेही सा. स.चे अध्यक्ष झाले. व्यंकटेश माडगूळकर (अंबाजोगाई – 1983), शंकर पाटील (नांदेड – 1985) आणि द.मा.मिरासदार (परळी वैजनाथ – 1998). पण कदाचित, या तिघांपेक्षा किती तरी पटीने लोकप्रिय असलेले व. पु.काळे हे मात्र अध्यक्ष होऊ शकले नाहीत !
तसेच, ग. दि. माडगूळकर (यवतमाळ – 1973) आणि व्यं. दि. माडगूळकर ही एकच भावा भावांची जोडी अध्यक्ष झाली आहे.
असे हे काही योगायोग, काही जमती गमती !
– लेखन : प्रकाश चान्दे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800