आणखी हुकलेल्या भेटी !
प्रख्यात हिंदी चित्रपट गीतकार शैलेंद्रच्या हुकलेल्या भेटीचा हा वृत्तांत.
मी 1960 च्या दशकात मुंबईतील VJTI या नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. मी महाविद्यालयाच्या वसतीगृहातच राहत होतो. मुंबईत कुठल्या चित्रपटगृहात कुठला जुना आणि लोकप्रिय चित्रपट लागलेला असून तेथे स्वस्तात कसं जायचं, हे मला ठाऊक असल्यामुळे वसतीगृहातील अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांशी माझी चांगलीच मैत्री असे.
जबलपूरचा सुदर्शन पाली हा त्यापैकी एक.
हा अभियांत्रिकी अभ्यासक्रम करत असूनही याला काव्यात अतिशय रुची होती; शिवाय हा स्वत: कविताही करत असे. कसं काय कोणास ठाऊक; पण याचं, त्या वेळचे अत्यंत लोकप्रिय चित्रपट गीतकार शैलेन्द्र यांच्याकडे जाणं येणं असे. त्यांच्या भेटीच्या गोष्टी तो आम्हाला रंगवून सांगत असे.
जवळ जवळ सर्वच तरुणांना चित्रपट आणि चित्रपट सृष्टीचं आकर्षण असतेच; आणि असा एखादा त्यांच्यांत वावरणारा परिचित असेल तर सांगायलाच नको ! मला तर लहानपणापासून चित्रपट आणि चित्रपट सृष्टी यांची आवड होती.मी तर त्याच्या गोष्टी मनापासून ऐके.त्यामुळेच माझी पालीशी मैत्री टिकून होती.
एके दिवशी मी कवि शैलेन्द्रवर एक लेख वाचला. त्या लेखात शैलेन्द्रच्या काव्य शैलीचं ‘Plain Narration Of Truth‘ असं वर्णन केलं होतं. ते मला अतिशय आवडलं; आणि नंतर पालीची भेट झाल्यावर त्याला मी ते सांगितलं.ते वर्णन ऐकून पाली अतिशय प्रभावित झाला; आणि म्हणाला की हे त्यांच्या काव्याचं चपखल आणि समर्पक वर्णन आहे. शिवाय, तो म्हणाला की, तो त्याच्या शैलेंद्रशी होणाऱ्या पुढच्या भेटीत हे वर्णन त्यांना मी तुझ्या नावासह अवश्य सांगेल.मी ते ऐकून खूष झालो नसतो तरच नवल !
मात्र, मला हे ही माहित होतं की, पाली काही शैलेंद्र यांना वारंवार भेटणारा नव्हता; आणि नंतर काही दिवसांनी होणाऱ्या भेटीत हे वर्णन त्याला आठवलं पाहिजे; आणि त्यानं ते त्यांना सांगितलंही पाहिजे.
एकंदरीत मला तर हे अशक्यच वाटत होतं !
पण काय आश्चर्य ?काही दिवसांनी पाली मला भेटला आणि म्हणाला की, मित्रा, मी तू सांगितलेलं ‘Plain Narration of Truth‘ हे वर्णन शैलेंद्रजींना सांगितलं. त्यांना ते अतिशय आवडलं. त्यांनी तुझी चवकशी केली. तुला या सर्व गोष्टींची आवड आहे, हे कळल्यावर तर ते म्हणाले की, एक दिवस त्याला घेऊन ये. मला तर सीमेचा आनंद झाला !
पण ते दिवस तसे विविध अडचणींचे होते.मला जशा अडचणी होत्या, त्या पेक्षा जास्त अडचणी खुद्द शैलेंद्र यांना होत्या. ते त्या वेळेस ‘तीसरी कसम‘ या चित्रपटाची निर्मिती करत होते. ती त्यांची पहिलीच चित्रपट निर्मिती असल्यामुळे आणि कवि मनाचा हा माणूस ‘व्यवहार जाणत नसल्यामुळे‘ आर्थिक आणि त्यामुळे अन्य अडचणींत सापडला होता. सर्व गोष्टी हाताबाहेर जात असल्यामुळे त्यांच्यावरचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला होता; आणि त्यांचं मद्यपान वाढत चाललं होतं. त्यामुळे त्यांची प्रकृतीही ढासळत चालली होती. म्हणून त्यांनी सुदर्शन पालीला ‘तीसरी कसम‘ ची निर्मिती पूर्ण झाली की, मला घेऊन यायला सांगितलं होतं.
‘तीसरी कसम‘ पूर्ण झाला.पण रेंगाळलेल्या या चित्रपटाला वितरक मिळे ना ! मात्र, त्याच दिवसांत ‘तीसरी कसम‘ चित्रपटाला राष्ट्रपतींचं सुवर्ण पदक जाहीर झालं ! आणि वितरक शैलेंद्रला भेटायला येऊ लागले !
1966 च्या डिसेंबर मध्ये माझी परीक्षा झाली; आणि मी कर्नाटकात शहाबादला, माझ्या मोठ्या बंधुंच्या गावी निर्माणीतील सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी (Factory Training) जायला निघालो.
मी माझ्या तिकिटाचं आरक्षण करण्यासाठी जात असतानाच मला पाली भेटला. त्याला शैलेन्द्र यांना माझ्या शुभेच्छा पोचवण्यास सांगितल्या. तो म्हणाला की, ते खूप खुषीत आहेत. वितरणाचं निश्चित झाल्यावर त्यांनी भेटायला बोलावलं आहे.
पण मी त्याला सांगितलं की, मी उद्याच कर्नाटकात शहाबादला निर्माणीच्या प्रशिक्षणासाठी (Factory Training) आहे; आणि 6 महिन्यांनी थेट जूनमध्येच मी परत येईन. मग आपण त्यांना भेटायला जाऊ या.
मी शहाबादला पोचलो; आणि 1 – 2 दिवसांत कवि शैलेंद्र यांच्या अनपेक्षित निधनाची बातमी आली ! ती तारीख होती 14 डिसेंबर 1966 ! 14 डिसेंबर हा, ज्या राज कपूरनं त्यांना चित्रपट सृष्टीत आणलं, त्या राज कपूरचा वाढ दिवस होता !
अशाच प्रकारे माझी मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील लक्षणीय अभिनेता यशवंत दत्त याच्याशीही भेट हुकली; आणि त्याचंही दुसऱ्या दिवशी निधन झालं !
1997 च्या सप्टेंबर — ऑक्टोबर मध्ये माझी कर्क रोगग्रस्त पत्नी लीना जवळ जवळ अखेरच्या टप्प्यात पोचली होती. आम्ही एकेक दिवस ढकलता होतो. मी सायंकाळी कामावरून आलो की, कोठेही जात नसे. तिच्याशी गप्पा मारत असे.
एके दिवशी डोंबिवलीतील हौशी नाट्य अभिनेत्री भारती ताम्हणकर हिनं मला सायंकाळी दूरध्वनीवरून सांगितले की, ते सादर करणार असलेल्या वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘ नटसम्राट ‘ या नाटकाचा मुहूर्त काही वेळातच होणार आहे. मुहुर्तासाठी ज्येष्ठ अभिनेते यशवंत दत्त आले आहेत. ते मुहुर्ताच्या बरेच आधी आलेले आहेत. इथे त्यांच्याशी कोणी गप्पा मारू शकेल अशी व्यक्ती नाही. तर तुम्ही कसंही करून इथे हॉलवर या.
परिस्थिती अशी होती की, मी घरून बाहेर पडू शकत नव्हतो. मी दिलगिरी व्यक्त केली.
भारतीला मी न येऊ शकत असल्याचं कारण माहित होतं.
पण परत सुमारे पाऊन तासानं तिनं माझ्याशी संपर्क साधला; आणि मी यावं अशी गळच घातली. ती म्हणाली की येथे कोणीही त्यांच्याशी गप्पा मारू शकेल असं नाही, तुम्ही याच. आमच्या घरात त्यावेळेस महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाला असलेली माझी 19 वर्षांची मुलगी अदिती होती. तिच्यावर मी घर सोडून जाऊ शकत नव्हतो. येऊ शकत नसल्याबद्दल मी परत दिलगिरी व्यक्त केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी कामावर गेलो; आणि रोजच्या प्रमाणे सायंकाळी 0630 – 0645 ला परत आलो.
सात वाजता दूरदर्शन वाहिनीवरच्या मराठी बातम्या ऐकू लागलो !
ठळक बातम्यांत दुसरीच बातमी यशवंत दत्त याच्या निधनाची होती !
ती बातमी ऐकून माझा विश्वासच बसेना ! नंतर सविस्तर बातमी सांगताना आदल्या दिवशी डोंबिवलीत त्यांच्या हस्ते झालेला ‘ नट सम्राट ‘ या नाटकाचा मुहूर्त आणि त्या नंतर त्यांना आलेला हृदय विकाराचा तीव्र झटका, आणि त्यातच त्याचं झालेलं निधन; हे वृत्त सांगितले.
31 वर्षांपूर्वी गीतकार शैलेंद्र याची भेट होण्याची शक्यता निर्माण झाली; पण त्यांचं निधन झालं होतं !
असाच आणखी एक प्रसंग !
नासिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात भरीव कार्य करणारे काँग्रेस पक्षाचे आमदार आणि मंत्री दिवंगत विनायकराव पाटील यांची भेट होण्याची शक्यता निर्माण झाली होती; पण त्यांचंही निधन झालं !
विनायकराव पाटलांनी त्यांच्या आयुष्यातील विविध आठवणींचं ‘ गेले लिहायचे राहून … ‘ हे पुस्तक लिहिलं आहे.त्यांत एक हृदयद्रावक प्रसंग आहे.
1967 ची निवडणूक विनायकराव लढत होते. त्या वेळेस प्रचार करताना, त्यांना दिलीपकुमार अभिनित ‘ आझाद ‘ ( 1955 ) मधील कव्वाली गायक रघुनाथ जाधव नासिकजवळच्या ओझर गावी योगायोगानं भेटला. त्याला परत चित्रपटात गायन करण्याची संधी मिळण्याचा योग आला होता. पण तो पर्यंत त्याचा विपन्नावस्थेत मृत्यू झाला होता.
ही आठवण मी वाचल्यावर मी विनायकराव पाटील यांना विरोपपत्र ( e mail ) पाठवले. त्यात मला आवडलेल्या या प्रसंगाचा उल्लेख केला; शिवाय, त्या पुस्तकात तपशिलाच्या दोन तीन त्रुटी होत्या; त्या ही त्यांच्या निदर्शनास आणल्या.
विनायकरावांना माझं विरोपपत्र आवडलं आणि त्यांनी त्वरित उत्तर पाठवून, नासिकला मी आल्यावर त्यांना भेटावं असं सुचवलं.
माझी वर्षातून किमान एक तरी फेरी नासिकला असतेच. त्या प्रमाणे मी त्यांना नासिकला आल्यावर भेटण्याचं आश्वासन दिलं.
ही गोष्ट साधारण 2020 च्या ऑगस्ट – सप्टेंबर मधील.त्या वेळेस ‘ कोरोना ‘ नं थैमान घातलं होतं !त्यामुळे सर्व वातावरण निवळल्यावर मी नासिकला जायचं आणि तेथे गेल्यावर विनायकराव पाटलांना भेटण्याचं ठरवलं. पण आणखी 5 – 6 महिन्यांतच विनायकराव पाटील यांचं निधन झालं !
काय म्हणावं या गोष्टीला !

– लेखन : प्रकाश चान्दे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
प्रकाश चांदे यांचा आणखी काही हुकलं हा लेख म्हणजे आज नाही नंतर भेटू आणि नंतरच्या हूकलेल्या भेटी म्हणजे सर्व सामान्यांच्या आयुष्यातील नेहमीचा प्रसंग, तिसरं काही नसून नियतीचा खेळ आहे. पण यामुळे संधी असुनही आपल्या प्रिय व्यक्तीच्या भेटीगाठी नाल्यांची शल्य असतं.