वर्तमान काळातील अवयवदान चळवळीच्या प्रचार-प्रसाराची आवश्यकता व महत्व लक्षात घेऊन देगलूर येथील वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाचे प्राचार्य व इतिहास विभाग प्रमुख डॉ. विजय कुलकर्णी यांनी पदवी स्तरावरील इतिहासाच्या अभ्यासक्रमात अवयवदान चळवळीचा घटक समाविष्ट केला जावा असा प्रस्ताव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या इतिहास अभ्यास मंडळाकडे सादर केला. इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदाशिव दंदे तसेच मंडळातील सर्व सदस्यांनी या प्रस्तावावर सकारात्मक विचार करून प्रस्तावाला मान्यता दिली व तृतीय वर्षातील “महाराष्ट्रातील समाजसुधारक व प्रबोधन चळवळ” या पेपरमध्ये हा घटक समाविष्ट केला.
नांदेड येथील जेष्ठ पत्रकार श्री माधव अटकोरे यांनी अवयवदान या विषयावर इ. स. २०१७ पासून व्यापक प्रमाणात जनजागृती सुरू केली असून याच विषयावर त्यांनी अवयवदान : पार्थिवाचे देणे या ग्रंथाचे संशोधनात्मक व अभ्यासपूर्ण पद्धतीने लिखाण केलेले आहे.
अवयवदान चळवळ ही जनमानसात अधिकाधिक प्रमाणात रुजली जावी, चळवळ गतिमान व्हावी या निरपेक्ष उद्देशाने श्री अटकोरे यांनी या ग्रंथाच्या तब्बल अडीच हजार पेक्षा अधिक प्रती विविध मंत्री, प्रशासकीय अधिकारी, मान्यवर व्यक्ती, ग्रंथालये, शाळा महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था इत्यादी ठिकाणी आदरपूर्वक व मोफत वाटप केलेल्या आहेत.
नांदेडच्या साक्ष प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या ग्रंथाला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने इतिहास विषयाच्या नूतन अभ्यासक्रमातील तृतीय वर्षाच्या, “महाराष्ट्रातील समाजसुधारक व प्रबोधन चळवळ” या पेपरसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता दिलेली आहे.
स्वातंत्र्यासारख्या मानवीय मूल्यांसाठी हैदराबाद मुक्तीसंग्रामात अग्रभागी राहिलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या परोपकार व मानवतावादी विचारांचा आदर्शच जणू विद्यापीठाने या निमित्ताने जोपासला असून अवयवदाना सारख्या महत्वपूर्ण घटकाला इतिहासाच्या अभ्यासक्रमातून मान्यता देणारे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ म्हणून नोंद होईल, अशी भावना ग्रंथाचे लेखक व ज्येष्ठ पत्रकार श्री अटकोरे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
अवयवदान या घटकाचा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव ठेवणारे प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी व ग्रंथ लेखक श्री माधव अटकोरे या दोघांनीही मृत्यूनंतरच्या अवयवदानासाठीचे सपत्नीक संमतीपत्र (फॉर्म नं 5) यापूर्वीच नांदेडच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सादर केलेले आहे. ग्रंथलेखक श्री अटकोरे यांनी इतिहास अभ्यासक्रमात उपरोक्त ग्रंथाचा संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश केल्यामुळे विद्यापीठातील सर्व उच्चपदस्थ मान्यवरांचे आभार मानले.
– टीम एनएसटी 9869484800