Monday, July 14, 2025
Homeलेखअविनाश पाठक : हक्काचा माणूस

अविनाश पाठक : हक्काचा माणूस

कुठल्याही व्यवसायात, क्षेत्रात, नाते संबंधात एक तरी “हक्काचा माणूस” असतो की, ज्याच्यावर आपला पूर्ण भरोसा असतो. या माणसाला फोन जरी केला तरी आपले काम नक्की होईल, अशी आपल्याला खात्रीच वाटत असते. मला, माझ्या दूरदर्शनच्या नोकरीपासून भेटलेला असाच एक हक्काचा माणूस म्हणजे नागपूरचे, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेले श्री अविनाश पाठक होत. आज त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे, त्या निमित्ताने त्यांच्या सोबतच्या दोस्तान्याची ही कथा……

अविनाश पाठक या नावाशी माझा परिचय झाला तो साधारणपणे 1986 च्या दरम्यान. त्यावेळी मुंबई दूरदर्शन मध्ये मी नोकरीला लागलो. नागपूर विभागातील काहीही कव्हरेज हवे असेल तर अविनाश पाठकला विचारा असे वरिष्ठ अधिकारी सांगायचे. त्यामुळे अविनाश पाठक हे दूरदर्शनचे नागपुरातील नैमित्तिक प्रतिनिधी (स्त्रिंजर) आहेत हे मला लक्षात आले.

एक दोनदा त्यांच्याशी फोनवर बोलण्याचाही योग आला होता. कधीतरी दूरदर्शनला आल्यावर त्यांची भेटही झाली होती. माझा सहकारी प्रदीप भिडे, अवधूत पारळकर या मंडळींची आणि अविनाश पाठकांची विशेष मैत्री होती. त्यामुळे माझाही पाठकांशी संपर्क वाढला. नंतर काही कारणांनी अविनाश पाठकांनी दूरदर्शनचे काम थांबवले.

दरम्यानच्या काळात मी दूरदर्शन सोडून महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क खात्यात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नियुक्त झालो. तेव्हापासून आणि विशेषत: २००३ ते २००८ या काळात मी उपसंचालक, वृत्त विभाग म्हणून कार्यरत असताना नागपूर अधिवेशनात अविनाश पाठक यांची नियमित भेट होऊ लागली. या काळात अविनाश पाठक या व्यक्तिमत्वाचा मला जवळून अभ्यास करता आला.

फक्त विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमधल्या पत्रकारांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि जवळीक असलेले हे व्यक्तिमत्व असल्याचे मला जाणवले. त्यावेळी त्यांचे वय 35-36 असावे. मात्र महाराष्ट्रातल्या विशेषतः विदर्भातल्या राजकारणाचा त्यांचा चांगलाच अभ्यास होता. अनेकदा अनेक संदर्भ ते अगदी काल घडल्यासारखे सांगायचे. अनेक मोठ्या आणि नवोदित राजकारण्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. तिथे पक्षभेद नव्हता. जशी त्यांची मैत्री दत्ता मेघेंशी किंवा प्रमोद शेडेंशी, तशीच मैत्री नितीन गडकरी आणि विनोद गुडधे पाटलांचीही होती. सोबतच्या सर्व पत्रकारांना आणि अधिकार्‍यांनासुद्धा कोणतेही संदर्भ द्यायला ते कायम तयार असायचे, याचा मला वेळोवेळी खूप फायदा व्हायचा.

अधिवेशन काळात मुंबईचे पत्रकार आणि माहिती खात्यातील अधिकारी यांच्यासाठी नागपुरातील सुयोग नावाच्या इमारतीत निवास व्यवस्था केली असायची. तिथे अविनाश पाठकांची नियमित चक्कर असायची. अनेक पत्रकारांना नागपुरात कुठे जायचे असले की अविनाश पाठक त्यांच्या स्कुटरवर न्यायला तयार असायचे.

नंतर जशजशी मैत्री वाढत गेली तसे तसे अविनाश पाठकांबाबत अधिक माहिती मिळत गेली. एकूणच मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचे मोठे झालेले अविनाश पाठक हे जुन्या भाषेत बोलायचे तर भरल्या घरात वाढले होते. घरी आई वडील, तीन बहिणी त्याशिवाय येणार्‍या पै-पाहुण्यांचा सततचा राबता, यामुळे सर्वांशी जुळवून घेत आयुष्य जगण्याचे बाळकडूच त्यांना मिळाले होते. शालेय जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आल्यावर सर्वांशी जुळवून घेण्याचा हा त्यांचा गुण कामी आला. त्यातून त्यांनी व्यापक जनसंपर्क जमवला. महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नागपूर युवक केंद्र, राष्ट्रीय युवक आघाडी अशा विविध गतीविधींमध्ये ते सक्रिय होते.

महाविद्यालयीन जीवनातच लेखनाचा आणि पत्रकारितेचा छंद अविनाश पाठकांना लागला होता. त्यांचे वडील विष्णुपंत पाठक हे कृषी विद्यापीठात छायाचित्रण विभागाचे प्रमुख होते. वडिलांजवळच छायाचित्रणाचे प्राथमिक धडे घेत महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नागपूरच्या वृत्तपत्रांसाठी फोटोग्रॉफी सुरु केली. त्यांची पत्रकारिता इथूनच खरी विकसित झाली.

आयुष्यातील जवळजवळ २० वर्ष इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये काम केल्यावर १९९५ च्या दरम्यान पाठक मुद्रित माध्यमांमध्ये आले. त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन आणि पत्रकारिता केली. दै. पुढारी कोल्हापूर, दै. गावकरी नाशिक, दै. नवशक्ती मुंबई अशा प्रमुख वृत्तपत्रांमध्ये त्यांनी विदर्भाचे विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. त्यांच्या धारदार लेखणीने त्यांनी अनेक मान्यवरांचे बुरखे फाडण्याचे काम केले. वृत्तपत्रातील स्तंभ लेखक म्हणून त्यांचे नाव चांगलेच गाजले.

अविनाश पाठक यांनी २००२ ते २०११ या कालखंडात “रामटेकच्या गडावरून” या नियतकालिकाचे प्रकाशन केले. त्यांचा दिवाळी अंक हा महाराष्ट्रात दर्जेदार म्हणून गाजत असतो. या अंकाने प्रतिष्ठित असे २५ पुरस्कार मिळविले आहेत. त्यावरुन अंकाच्या दर्जाची कल्पना येते.

नियतकालिक संपादनासोबत अविनाश पाठक यांची विविध विषयांवरील 14 पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. त्यात एक कादंबरी, दोन राजकीय कथासंग्रह, पाच ललित लेखसंग्रह, एक संपादित पुस्तक अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे.

देशातील संपुआ सरकार उलथून टाकण्याला कारणीभूत ठरलेल्या कोळसा घोटाळ्यावर अविनाश पाठक यांनी लिहिलेले “काळ्या कोळशाची काळी कहाणी” हे पुस्तक विशेष गाजले आहे.

सध्या अविनाश पाठक ‘पंचनामा’ या न्यूज पोर्टेलचे संपादन करीत आहेत. तर मी न्यूज स्टोरी टुडे या पोर्टलचे संपादन करीत आहे.
एकाच व्यवसायात असल्यामुळे आम्ही खरे तर एकमेकांचे “स्पर्धक” आहोत. पण ही स्पर्धा निकोप आहे. त्यामुळे एकमेकांना काही गरज लागली तर आम्ही ती हक्काने मागत असतो आणि करीतही असतो. तिथे काहीही आपपर भाव नसतो.

अविनाश पाठक यांची ‘घ्या समजून राजे हो’ ही राजकीय दिग्गजांना चिमटे घेणारी लेखमालिका समाज माध्यमांवर चांगलीच गाजते आहे. त्याशिवाय ‘पंचनामा’ या त्यांच्या युट्युब चॅनेलवर प्रसारित होत असलेले राजकीय विषयांवरील व्हिडिओ देखील चर्चेचा विषय ठरत असतात.

सध्या ते दै. नवशक्ती मुंबई, दै. श्रमिक एकजूट नांदेड, दै. गावकरी नाशिक, दै. बितंबातमी, ठाणे या वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करीत असून रत्नागिरी येथून प्रसारित होणार्‍या साप्ताहिक बलवंतचे संपादकीय सल्लागारही आहेत.

अविनाश पाठक यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवले आहे. एक सामाजिक कार्यकर्ता, एक चांगला वक्ता आणि सिद्धहस्त लेखक म्हणून आजही ते कार्यरत आहेत. रोटरी, अखिल भारतीय साहित्य परिषद, भारत विकास परिषद, राजाराम वाचनालय, जगदंबा देवस्थान समिती अशा विविध संस्थांमध्ये ते सक्रिय आहेत. फक्त राजकीयच नव्हे तर सर्वच क्षेत्रात त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

बहुविध व्यक्तिमत्वाचे धनी असलेले अविनाश पाठक आज, दि.२१ मे २०२२ रोजी वयाची ६७ वर्षे पूर्ण करून ६८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या या वाटचालीत आणि यशात वहिनी सौ. अनुरुपा आणि बी. टेक. झालेली कन्या दिव्येशा हिचाही महत्त्वाचा वाटा आहे.

अविनाश जी पत्नी आणि मुलीसह

अविनाशजींना वाढदिवसानिमित्त आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 💐🎂

देवेंद्र भुजबळ

– लेखन : देवेंद्र भुजबळ.
निवृत्त माहिती संचालक
तथा संपादक, न्यूज स्टोरी टुडे. मुंबई.
☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. श्री.अविनाशजी पाठक यांस वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत अनंत शुभेच्छा !
    देवेंद्र सर, आज तुम्ही एका अष्टपैलू न्यूज पोर्टल संपादकाची ओळख घडवून आणलीत.आणि तेही तुमचे मैत्रीस्पर्धक ! पण तुमच्या ठायी त्यांच्या विषयी असलेला आदर, व तुमचे मैत्रीप्रेम वाचून वाचकांस प्रेरणा मिळाली.
    श्री.अविनाशजी यांस पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !

    सौ.वर्षा भाबल.

  2. बहुविध व्यक्तिमत्वाच्या अविनाशजींना
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments