श्रावणमास आला की सर्व कासार समाजास वेध लागतात ते ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्रीमद् भागवत कथा ते ही ज्ञानेश्वरी पारायण सोहळा फंड आळंदी (देवाची) यांचे विद्यमाने आयोजित करण्यात येणारा अप्रितम, नेत्रदीपक, डोळ्याची पारणे फिटेल असा सोहळा पाहण्याचे. यावेळी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते .
प्रतिवर्षी होणारा हा कार्यक्रम यंदाच्या वर्षी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा फंड आळंदी (देवाची) तर्फे देवभूमी चारधाम प्रवेशद्वार हरीद्वार येथे आयोजित करण्यात आला होता. हा संपूर्ण सोहळा अतिशय उत्साहात, जल्लोषात आणि आनंदात पार पडला. तमाम कासार समाजासाठी विशेष आणि उपयुक्त असा हा कार्यक्रम दि ०३/०८ ते १०/८/२०२३ या कालावधीत प्रेमनगर आश्रम, देवभूमी हरिद्वार( उत्तराखंड) येथे पार पडला.
दि.३/०८/२०२३ रोजी देवभूमी हरिद्वार उत्तराखंड येथे प्रेमनगर आश्रम या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भागवत कथा यांची सूरवात ज्ञानेश्वरी ग्रंथाची भव्य दिव्य शोभयात्रेने झाली.
ही मिरवणूक सर्व समाज बांधवांनी अतिशय उत्साहात, जोमात आणि टाळ वीणा सोबत हरी नामाचा गजर करत पार पाडली.
ही मिरवणूक सभागृहात आल्यावर संत ज्ञानेश्वर माऊलीचे पूजन करण्यात आले. त्याच बरोबर टाळ, वीणा, मृदुंग यांचे पूजन करण्यात आले. विविध मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. साध्वी अनुराधा दीदी चा सत्कार आला. अध्यक्षीय मनोगत, आणि साध्वी अनुराधा दीदी यांनी सुखी व समृद्ध जीवन जगण्याचा मंत्र तसेच भागवत कथा एकण्याचे महत्व विषद करून आपल्या सुंदर संदेशानी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भागवत कथा कार्यक्रमाची सुरूवात केली.
ह.भ.प. विनायक महाराज अष्टेकर व ह.भ.प. श्रीमती कमलताई शिवाजीराव दहातोंडे परळी वैजनाथ व ह.भ. प. सौ. उज्वलाताई अंदूरे पुणे यांच्या सुंदर व गोड वाणीने व नेतृत्वाने ज्ञानेश्वरी पारायण वाचन पार पडले. या कार्यक्रमात भागवताचार्य, रामायणचार्य साध्वी अनुराधा (दीदी) शेटे यांनी आपल्या गोड मधुर सुश्राव्य अमृतवाणीने ज्ञानामृताची बरसात करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. सर्व भाविक दिदीचे भागवत ऐकताना एवढे तल्लीन व एकाग्र झाले की ऐकणे हाच एक ध्यास असतो. दीदीचे भागवत एकताना मन एवढे प्रसन्न होते की प्रत्येक जण नाचू गाऊ लागतो आणि राधे राधे, गोपाल कृष्ण भगवान की जय असा जयघोष होऊन प्रसन्न व तेजोमय वातावरण तयार झाले.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ज्ञानेश्वरी पारायण आणि भागवत कथा सात दिवस चालते. शेवटी सातव्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने समारोप झाला.
भागवत कथेत श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा त्याचबरोबर राधाराणी श्रीकृष्ण विवाह सोहळा एवढा सुंदर आणि उत्साहात साजरा केला की दीदी ही भाविकांचा उत्साह पाहून तल्लीन झाल्या. जिकडे तिकडे चोही कडे आनंदी आनंद दिसत होता. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सर्व भाविक नाचत होते आणि उस्फुर्त प्रतिसाद देत होते. राधे राधे असा जयघोष होत होता.
यंदाच्या वर्षी मुख्य आकर्षण होते ते सुदामाच्या भूमिकेत असलेले आमचे वीर काका.
पूर्व पिठीका
या कार्यक्रमाचा वृत्तान्त सादर करताना मला थोडे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा फंडची पार्श्वभूमी सांगण्याचा मोह आवरत नाही. साधारणतः १९९३ ते १९९४ साली अध्यात्मिक व वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेले कासार समाजातील थोर व्यक्ती म्हणजेच वै.शाहुराव शंकरराव ईटकर आणि वै. कालिदास रामकृष्ण वेळापूरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील खेडेपाड्यात, प्रत्येक गावागावात शहरात स्वखर्चाने फिरून समाजामध्ये जनजागृती केली. त्यांना ज्ञानेश्वरी पारायण व अध्यात्मिकतेचे महत्व पटवून दिले. संत ज्ञानेश्वर यांनी विश्व कल्याणासाठी जी ज्ञानेश्वरी लिहिली आणि जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखविला. लोकांचे जीवन समृध्द व सुखी व्हावं त्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती ज्ञानेश्वरांनी केली. त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची माहिती व ज्ञानेश्वरी पारायनाचे महत्व त्याची ओढ लोकांच्या मनामनात निर्माण व्हावी, यासाठी या दोन्ही थोर व्यक्तीनी, १९९४ साली ज्ञानेश्वरी पारायण सोहळा फंड आळंदी (देवाची) या नावाने रजिस्ट्रेशन करून मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी केली आणि या दोन्ही संस्थापकानी आपल्या कार्याची व्याप्ती प्रचंड वाढवली आणि दरवर्षीआळंदी (देवाची) मुक्कामी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा घेण्यास सुरवात केली. कासार समाज भाविकांचा यासाठी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. भाविकात प्रचंड आवड निर्माण झाली. त्यांना सुंदर व सुखी जीवन जगण्याचा भक्ती मार्ग दाखविला, परमार्थ शिकवला. हीच खरी जनसेवा आहे हा संदेश दिला आणि लोकांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला.
पुढे, २००१ साला पासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा फंड आळंदी (देवाची)चे अध्यक्ष पदाची धुरा श्री.श्रीकांतशेठ शाहुशेठ ईटकर (नाना) लातूर यांचे कडे आली आणि त्यांच्या रूपाने एक उमदे तडफदार, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असललेले व्यक्तिमत्व व त्यांना जोड मिळाली ती संस्थेचे पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य सर्वश्री अरुणजी कालिदासराव वेळापूरे सर, कार्याध्यक्ष माजलगाव, श्री शरद दामोधर भांडेकर, अध्यक्ष अ.भा.सो. क्ष.कासार मध्यवर्ती मंडळ, उपाध्यक्ष, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा फंड शिरूर कासार, श्री संजयजी डांगरे पुणे (सचिव); श्री.महारुद्र वीर, सहसचिव;
श्रीअजयजी टंकसाळे, पुणे कोषाध्यक्ष; श्री.शिवाजीराव काटकर, सदस्य; श्री अनिलजी शेटे, बीड सदस्य; अशी सर्व कार्यकारणी व कार्यकर्ते समाजासाठी अहोरात्र झटणारे सहकारी लाभले.
आज ज्यांची आठवण येते ते दोन खंदे सदस्य कै.अण्णा येवणकर, नांदेड आणि कै.अशोकराव एकनाथसेठ रासने, बीड या दोंघांचे फार मोठे योगदान होते. करोना काळात ते आपल्यातून निघून गेले त्यांना कधीही विसरता येणार नाही. त्यांना मानाचा सलाम.
दरवर्षी आळंदी येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होत असताना, साधारणतः २००० साली एक नवीन मतप्रवाह भाविकांच्या मनात येऊ लागला, की हा सोहळा महाराष्ट्रातील इतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी व महाराष्ट्राबाहेर एखाद्या तीर्थक्षेत्रात घेण्यात यावा. अशी मागणी होऊ लागली तेंव्हा असे ठरले की, एक वर्ष महाराष्ट्रात आणि एकवर्षी महाराष्ट्राबाहेर एखद्या तीर्थक्षेत्र ठिकाणी घ्यावे आणि त्यास सर्वांनी एकमताने संमती दर्शवली. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला आणि तेंव्हा पासून पवित्र श्रावण महिन्यात होणारा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वेगवेगळ्या ठिकाणी होऊ लागला. आता पर्यंत ज्या ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला ते पुढील प्रमाणे :-
१) पहिला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, कालिकादेवी मंदिर. तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे
२) श्री क्षेत्र नाशिक. काळाराम मंदिर (सिहस्थ पर्वणी काळ),
३) क्षेत्र नेवासा, जेथे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते मंदिर ठिकाण.
४) आळंदी
५) मुक्ताई नगर मुक्ताई मंदिर.
६) सासवड
७) श्रीक्षेत्र पैठण
८) श्री क्षेत्र परळी वैजनाथ.
९) सटाणा
१०) श्री क्षेत्र काशी उत्तरप्रदेश.
११) लातूर
१२) श्री क्षेत्र रामेश्वर.
१३) श्री क्षेत्र शेगांव.
१४)श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी
१५)श्री क्षेत्र देवगड दत्तात्रय मंदिर
१६)श्री क्षेत्र द्वारका गुजरात,
१७) नांदेड येथे माहेश्वरी भवन
१८) नुकतेच पार पडले ते देवभूमी हरिद्वार (उत्तराखंड). येथील प्रेमनगर आश्रम हंस घाट, गंगानदी किनारी प्रेमनगर आश्रमचे मुख्य सतपाल महाराज यांचा आशीर्वाद लाभला.
प्रेमनगर आश्रमाबद्दल सांगायचे झाले तर हा हरिद्वार मधील अग्रगण्य आश्रम आहे. अतिशय सुसज्ज अतिशय सुंदर, डोळ्याचे पारणे फिटेल अश्या भव्य दिव्य आणि विशाल परिसरात पसरलेला गंगानदी हंस घाट निकट आहे.
ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रमास आलेल्या सर्व भाविकांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था उत्तम करण्यात आली होती. याच बरोबर वैद्यकीय सेवा ही देण्यात आली होती. वरिष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्यात आली .
या कार्यक्रमासाठी समाजातून मोठ्या संख्येने अन्नदाते मदत करतात. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात समाजातील अनेक जण देणगी रूपाने मदत करतात, त्या सर्वांचे आभार मानने आपले कर्तव्य ठरते. त्यांना मनापासून धन्यवाद.
असा हा कार्यक्रम दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहे. मोठ्या संख्येने भाविक जमतात व आनंदाने सर्व बांधव तल्लीन होऊन माऊलीचा गजर करत माऊलीच्या चरणी लीन होतात म्हणून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा फंडाचे दोन्ही संस्थापकांना नतमस्तक होऊन म्हणावे लागेल की
“इवलेसे रोप लावले द्वारी! त्याचा वेलू गेला गगनावरी !
या दोघांना त्रिवार वंदन.
१० ऑगस्ट २०२३ रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष व कार्यकारणी,सर्व कार्यकर्ते आणि ज्यांनी ज्यांनी विविध रूपात मदत केली ते सर्व अन्नदाते, देणगीदार या सर्वांचे मनपूर्वक आभार.
— लेखन : दीपक जवकर. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800