Thursday, September 18, 2025
Homeलेखअविस्मरणीय बालकुमार साहित्य संमेलन

अविस्मरणीय बालकुमार साहित्य संमेलन

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील बालकुमार साहित्य संमेलनास एकपात्री कलाकार, लेखिका मेघना साने उपस्थित राहिल्या होत्या. त्यांनी आपल्या पोर्टल साठी लिहिलेला हा सुंदर विशेष वृत्तान्त. साने मॅडम यांचे मनःपूर्वक आभार.
– संपादक

अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्था, पुणे यांच्यातर्फे अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाची घोषणा झाल्यावर संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री राजन लाखे यांनी लगेच उत्साहाने तयारी सुरू केली.

हे संमेलन अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार होते. पुण्यामध्ये यासंबंधी एक पत्रकार परिषद 28 जानेवारीला घेतल्याचे कळले.

या संमेलनाची माहिती रसिकांना व्हावी, यासाठी मी संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांची रेडिओ विश्वास वर मुलाखत आयोजित केली होती. या बालकुमार संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार रोहित पवार होते. ते स्वतः विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नेहमीच काही ना काही योजना राबवत आले आहेत. त्यामुळे हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण होणार याची मला खात्री होती.

संमेलनात होणार असलेल्या निरनिराळ्या साहित्यिक कार्यक्रमांची आणि त्यानिमित्त होणार असलेल्या स्पर्धांची माहिती लाखे साहेबांनी रेडिओ ला दिली. त्यावरून संमेलनात कार्यक्रमांची रेलचेल असल्याचे समजले.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच मला कर्जत वरुन या बालकुमार साहित्य संमेलनात कथाकथन सत्रात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देणारा फोन आला. साहित्यिकांची प्रवास व राहण्याची सोय वगैरे संस्थेकडून होणार होतीच.

कर्जत तालुक्यातील बालकुमार संमेलनास किती लोक उपस्थित राहतात, काय कार्यक्रम सादर करतात हे पाहण्यासाठी मी उत्सुक होते.

कर्जतला पोहोचणे तेवढे सोपे नव्हते. रेल्वेचे रिझर्वेशन फुल झाले होते. त्यामुळे ह्वोल्वो बसने जायचे ठरवले. आठवडाभर आधी संमेलनाची सुंदर पत्रिका हाती पडली. त्यात ठाण्याच्या बालसाहित्यिक ज्योती कपिले याही सहभागी होणार असल्याचे कळले. मग आम्ही दोघींनी एकत्रच प्रवास केला.

ठाण्याहून रात्रभर प्रवास करून सकाळी अहमदनगरला उतरलो. तेथून कनेक्टिंग बसने कर्जतला पोचलो. तेथेच दादा पाटील महाविद्यालयाच्या स्टॉप वर आयोजक गाडी पाठवणार होतेच. तोवर पटांगणात एक चक्कर मारली.

दलितमित्र दादा पाटील यांच्या सहकार्याने 1994 साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. करमाळा, जामखेड, कडा आणि कर्जत या अवर्षणग्रस्त परिसरातील शेतकरी व कष्टकऱ्यांचा मुलांच्या हातात लेखणी देण्याचे ऐतिहासिक काम स्वर्गीय दलितमित्र दादा पाटील व कर्मराव पाटील यांनी केले.

या महाविद्यालयाची भव्य वास्तू पाहून आम्ही थक्क झालो. कर्जत सारख्या ठिकाणी शिक्षणाची उत्तम सोय आहे हे लक्षात आले.

स्टॉपच्या समोरच महाविद्यालय आणि त्याच्या पटांगणात उभारलेला भव्य मंडप दिसला. 5,000 मुले बसतील अशी सोय होती. पुस्तक विक्रेत्यांसाठी, प्रकाशाकांसाठी स्टॉल उभारले होते. शेलार सर व त्यांच्या टीमने आमची राहण्याची व्यवस्था केली. तसेच संमेलनाची दिंडी चार वाजता निघणार असल्याचे सांगितले.

आम्ही ठाण्याचे लोक पोचलो. मग मग पुण्याचेही लोक पोचले. अमरेंद्र बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष श्री राजन लाखे सपत्नीक या उपस्थित झाले . तसेच संस्थेच्या पूर्वाध्यक्ष डॉ. संगीता बर्वे मॅडमही आलेल्या होत्या.

दुपारी 4 वाजता “साहित्य दिंडी” ढोल ताशासह वाजत गाजत दादा पाटील महाविद्यालयाच्या गेट जवळ आली, अध्यक्ष राजन लाखे यांनी दिंडी खांद्यावर घेतली. आम्ही सर्वजण दिंडीत सामील झालो. घोड्यावर बसलेली एक वेशभूषा केलेली मुलगी अतिशय सुंदर दिसत होती. जिजामाता, शिवाजी अशी वेशभूषा केलेली मुले, मुली पाहून आम्ही सुखावलो. बाकी मुले रस्त्याने चालत होती. सर्वांचे छान वेष होते. उन्हाचे त्यांना काहीच वाटत नव्हते. सर्व मजेत चालत होते.उत्साह ओसंडून जात होता. ही सर्व संमेलनाची तयारी त्यांच्यासाठीच तर होत होती.

मंडपा बाहेरच्या जागेत मुलांनी काढलेली शेकडो रंगीतचित्रे दिसली. आलेले विद्यार्थीही हे प्रदर्शन पाहण्यात रंगून गेले होते.

दिंडीसाठी आलेल्या सर्व साहित्यिकांना व कार्यकर्त्यांना दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांनी आपल्या केबिनमध्ये आमंत्रित केले. चहापान करता करता आम्हाला महाविद्यालयाची माहिती मिळाली.
“रयत शिक्षण संस्थेच्या या महाविद्यालयात इयत्ता अकरावी ते पीएचडीच्या संशोधन केंद्रापर्यंत उच्च माध्यमिक व उच्च शिक्षणाच्या विविध प्रशाखा आहेत. विविध विषयांचे पदव्युत्तर शिक्षण इथे दिले जाते. काळाची पावले ओळखून या महाविद्यालयाने कौशल्या धिष्टित अभ्यासक्रम असलेले 38 शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले आहेत. महाविद्यालयातून बाहेर पडताना एक तरी कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असा आमचा कटाक्ष असतो” असे डॉ. संजय नगरकर यांनी अभिमानाने सांगितले. तालुका गाव असले तरी आपण एका सुशिक्षित भागात आलो आहोत याची आम्हाला जाणीव झाली.

संध्याकाळी साडेपाच वाजता कार्यक्रमात सहभागी असलेल्या मुली नटून थटून इकडे तिकडे फिरताना दिसल्या. आम्हीही त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतले.
त्या म्हणाल्या, “आम्ही तयार तर झालो आहोत पण मंडपात कोणीच नाही” आम्ही म्हटले, “बरं आम्ही जाऊन बसतो. आम्हाला तुमचा नाच बघायचा आहे ना”
आम्ही पुस्तकांच्या स्टॉल्स वरून लगोलग मंडपात गेलो.

पालकांसाठी खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. विद्यार्थी भारतीय बैठकीप्रमाणे खाली बसणार होते. पालक येऊन बसू लागले. पण विद्यार्थी कुठे आहेत अशी आमच्यात चर्चा सुरू झाली. एवढ्यात मुलींच्या रांगा येऊ लागल्या. नंतर मुलांच्याही रांगा शिस्तीत येऊ लागल्या. शंभर, मग दोनशे विद्यार्थी करता करता हळूहळू मंडप भरतही गेला. विद्यार्थी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हे दृश्य प्रथमच पाहायला मिळत होते. 5000 कॅपॅसिटीचा तो मंडप शेवटपर्यंत भरला आणि मनोरंजन कार्यक्रम सुरू झाला.

विद्यार्थ्यांच्या कला सादरीकरणाने फारच बहार आली. अतिशय उत्तम दर्जा विद्यार्थ्यांनी सांभाळला होता देशभक्तीपर गीते, विविध प्रकारची संबंधित बोध देणारी नाटुकली, असे सगळेच कौतुकास्पद होते. तिसरीच्या मुलांनी संविधान या विषयावर केलेले नाटक पाहून आश्चर्याचा धक्का बसला. बारा वर्षाच्या मुलींनी लावण्या सादर केल्या. त्यांचे नृत्य कौशल्य आणि गती पाहून लावणी महोत्सवाची आठवण झाली. विद्यार्थी टाळ्या वाजवून उत्तम दाद देत होतेच. कधी आनंदाने जल्लोष करत होते मात्र सारे शिस्तीत होते. रात्री नऊ वाजता कार्यक्रम संपला आणि रांगेने विद्यार्थी बाहेर पडले.

पुस्तकाचे स्टॉल्स मात्र अजून अंधारात होते. दुसऱ्या दिवशी दहा फेब्रुवारीला सकाळी उद्घाटन समारंभासाठी सारे पुन्हा मंडपात जमलो. यावेळी उपस्थित असलेले विद्यार्थी वेगळे होते.
वेगवेगळ्या बसेस मधून त्यांना आणण्यात आले होते. सर्वच्या सर्व शाळेच्या गणवेशात होते. त्यामुळे अनेक शाळा तिथे आलेल्या आहेत हे कळत होते.

सकाळी साडेनऊ वाजता आमदार रोहित पवार, डॉ संजय नगरकर सर, राजेंद्र लाखे यांच्या उपस्थितीत झेंडावंदन झाले आणि मग उद्घाटन समारंभाला सुरुवात झाली.

अमरेंद्र बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी प्रास्ताविकात अशी संमेलनने अनेक ठिकाणी घडवून आणण्याचा विचार मांडला. विद्यार्थ्यांची वैचारिक आणि सांस्कृतिक प्रगती हेच संमेलनाचे ध्येय असल्याचे सांगितले.

माननीय रोहित पवार यांनी स्वागताध्यक्ष म्हणून सर्वांचे स्वागत केले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारू लागले.
‘लहानपणी अभ्यासाची फारशी आवड नव्हती परंतु नंतर आपण खूप अभ्यास केला आणि पदे मिळवली. तसेच आता सामाजिक कार्यात झोकून दिले’ हे सर्व मुलांना सांगितले. “एकलव्याची गोष्ट कोणाला येते का “असे विचारल्यावर एक मुलगी पटकन पुढे आली आणि व्यासपीठावर येऊन तिने गोष्टही सांगितली. हे पाहून रोहित दादा पवार यांचे मुलांशी किती मोकळे संबंध आहेत हे लक्षात आले. यापूर्वी याच पटांगणात मुलींच्या राष्ट्रीय कुस्तीचे ही आयोजन त्यांनी केले होते याची एक आठवण त्यांनी भाषणात सांगितली. तसेच मुलांसाठी कर्जत मध्ये तारांगण देखील तयार करण्यात येत आहे, हे सांगितले.

या उद्घाटन समारंभात कवयित्री ज्योती कपिले यांच्या “मदतीचा हात” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.

संमेलनाचा उद्घाटक म्हणून बालकलाकार श्रीनिवास पोकळे उपस्थित होता. चित्रपट कलावंत म्हणून त्याला सर्व जण ओळखत होते. त्याने आपल्या भाषणात अभ्यास आणि कला या दोन्हींचे महत्त्व समजून दिले.

संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध कवी प्रा इंद्रजीत भालेराव यांनी देखील मुलांशी छान संवाद साधला. त्यांनी निरनिराळ्या विषयावर कशा कविता करता येतात हे समजावून दिले. काही ग्रामीण कविता सादरही केल्या.

उद्घाटनानंतरच्या सत्रात ‘मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती हरवली आहे ‘ हा परिसंवाद रंगला. यात प्राध्यापक डॉ. वर्षा तोडमल, पुणे डॉ. सुहास सदावर्ते, जालना, डॉ. विनोद सिनकर, धनंजय गुडसुरकर, उदगीर यांनी मोबाईलच्या अतिवापराने ज्ञानेन्द्रयांवर परिणाम होऊ शकतो तसेच मोबाईल मुळे सध्याच्या युगात अनेक प्रकारची माहिती मिळणे सहज शक्य झाले आहे अशी मते मांडली गेली. मोबाईल मुळे पुस्तके वाचणे कमी झाले आहे, परंतु व्हाट्सअप वरील वाचन वाढले आहे. परिसंवादाच्या अखेरीस राजन खान यांनी आपली परखड मते व्यक्त केली. “या देशाला वाचन संस्कृती कधी नव्हती त्यामुळे तिला धोका उत्पन्न होण्याचा प्रश्न नाही. कोणत्याही सणाला आपण गोडधोड करतो, कपडे खरेदी करतो, पण पुस्तके खरेदी करत नाही. शिक्षक वर्ग ही पुस्तकांच्या खरेदीच्या बाबतीत उदासीन आहे.”
राजन खान यांची मते सर्वांना झोंबत असली तरी त्यात काही सत्यताही आहे हे कोणी नाकारत नव्हते.

दुपारी जेवणानंतर मंडपात पुन्हा वेगळ्या इयत्तांचे विद्यार्थी येऊन बसले. बाल कथाकथन हा कार्यक्रम होता ना. लातूर येथील ज्येष्ठ कथा लेखक जी. जी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम रंगला.
परभणीच्या मा.अर्चना डावरे उदगीरच्या अनिता येलमाटे, पुण्याचे डॉ. दिलीप गरुड यांचे सुंदर कथाकथन ऐकताना मुलेच काय मोठी मंडळीही रंगून गेली.

यावेळी मी माझी ‘थोर पुरुषाची स्वाक्षरी’ ही कथा सांगितली.

यानंतर सुप्रसिद्ध कवयित्री लेखिका डॉक्टर संगीता बर्वे यांचे व्याख्यान झाले. त्यांनी सादर केलेल्या सुंदर सुंदर कवितांनी एक वेगळाच माहोल तयार झाला. कविता कशा सुचतात, लेखन कसे केले जाते, याविषयी त्यांचे अनुभव मुले तन्मयतेने ऐकत होती.

पुढे कवी संमेलन तसेच मुलांचे मनोरंजन कार्यक्रम अशी भरपूर रेलचेल होती. रात्री नऊ पर्यंत सभा मंडप भरलेला होता. मग कर्जतकरांच्या पाहुणचाराचा आस्वाद घेतला नि संमेलनाच्या गाड्यांनी आम्हाला निवास व्यवस्था होती तेथे पोचवले. मुलांच्या अफाट कार्यशक्तीचे कौतुक करीत आम्ही रूमवर पोचलो.

संमेलनात 11 तारखेला देखील अनेक कार्यक्रमांची रेलचेल होती. परंतु मला माझ्या कार्य बाहुल्यामुळे थांबता आले नाही.

एकंदरीत कायमचे लक्षात राहील, असेच हे बालकुमार साहित्य झाले.

मेघना साने

– लेखन : मेघना साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा