आम्ही आमच्या योगावर्गाच्या मैत्रिणींची सहल रायरेश्वरला जाण्यासाठी ठरवली. त्यानुसार आयोजन करून व्यवस्थितपणे आम्ही ती सहल पूर्ण करून आलो. त्याला आता पाच सहा वर्षे झाली. तरी देखील अजुनही त्या आठवणी ताज्या आहेत.☺️
खरं तर रायरेश्वरची सहल ही कायमच आठवणीत रहाणारी सहल ठरली. पुन्हा पुन्हा माझं मन तिकडेच धाव घेत आहे. तिथले शंकराचे मंदिर, तिथला सौंदर्याने भारलेला निसर्ग सगळं सगळंच आपल्याला भुरळ पाडणारं आहे.
पुण्यापासून ८२ किमी अंतरावर रायरेश्वर हे अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. आमची गाडी खालीच पार्क करून आम्ही वीस जणींनी रायरेश्वराचा गड चढायला सुरुवात केली. चढताना सुरवातीला आम्हाला वाटलं एवढं वर चढुन जाणं आम्हाला शक्य होईल की नाही ? कुणास ठाऊक, कारण त्याची उंची खुप होती. परंतु एकमेकींच्या साथीने जसजसं आम्ही गड चढायला सुरुवात केली, तसतसं निसर्गाने अनंत हातांनी भरभरून दिलेलं निसर्ग सौंदर्य पाहुन आम्हाला आणखीनच गड चढण्याची स्फूर्ती येऊ लागली.
गड चढत असताना रिमझिम पाऊस, चिखलाचा रस्ता, काही ठिकाणी दगडी पायऱ्या तर काही ठिकाणी अगदी अरुंद वाट होती.
आम्ही मैत्रिणी एकमेकींच्या हात धरून गड चढण्याचा प्रयत्न करत होतो. चढता चढता आजूबाजूचं दृश्य पाहून तर थक्क व्हायला होत होतं.
इतके सुंदर डोंगर जणू काही निसर्गाने हिरवा शालूच नेसलाय आणि शालू सुध्दा साधासुधा नाही तर हिरव्या रंगांच्या वेगवेगळ्या छटांचा शालू आणि त्यावर मधेच हलकीशी सोनेरी किरणांची झालर आणि मधे मधे भुरभुरणाऱ्या पावसाच्या नक्षीदार रेषा, इतका सुंदर शालू नेसून निसर्ग आमच्या समोर दिसत होता जणूकाही नविन नवरी नटूनथटून आमच्या बरोबरच चाललिये !
घनदाट झाडी असल्यामुळे संपूर्ण वातावरण हिरवंगार दिसत होतं. सूर्य पण अधूनमधून डोंगरांच्या आडून डोकं वर काढत होता जणूकाही तो लापाछपीच खेळतोय असं वाटत होतं.
आजूबाजूच्या डोंगरातून शांतपणे कोसळणारे धबधबे होते आणि काही डोंगरांवर तर ढग एकमेकांशी गुजगोष्टी करत असल्याचा भास होत होता. हे निसर्गाचं अनमोल सुंदर रुपडं पहातच आम्ही कधी गड चढलो आम्हाला कळालेच नाही.
गडावर पोहोचल्यावर सुध्दा आम्हाला शंकराचे मंदिर काही दिसेना, ते अजून थोडं पुढे होतं.
पण तिथे आम्ही अक्षरशः स्वर्ग कसा असेल याचा अनुभव घेतला. कारण आजूबाजूला डोंगर दऱ्या धबधबे, छोटीशी पायवाट आणि दोन्ही बाजूला नुकतीच उमलायला लागलेली कर्दळीची झाडं हे सगळं एकाच ठिकाणी उभं राहून आम्हाला अनुभवता येत होतं.
थोडं पुढे चालून गेल्यावर एक गोमुख कुंड होतं, त्या कुंडातील पाणी अमृतासारखं भासलं. पाणी पिऊन आम्ही पुन्हा चालु लागलो आणि आम्हाला ज्याची प्रतिक्षा होती ते शंकराचं मंदिर आमच्या दृष्टीस पडलं. मंदिर अगदी साधं दगडी काम असुन त्यावर पत्र्याचे शेड आहे.
मंदिरात अगदी छोटासा मिणमिणता तेलाचा दिवा लावलेला होता तेवढाच काय तो तिथे प्रकाश.
मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. त्यांना वाकुन नमस्कार करून आम्ही पुढे जाऊन शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले.
मोबाईलच्या प्रकाशात शंकराची पिंड विलोभनीय दिसत होती. पिंडीच्या समोरच आपल्या लाडक्या शिवरायांनी मूठभर मावळ्यांच्या साथीने शंकराच्या साक्षीने घेतलेली शपथ अशी सुंदर प्रतिमा आहे, तिचेही दर्शन घेतले.
हे सगळं स्वर्गानंदाचं दृश्य पाहुन माझ्या मनात पटकन विचार आला की खरंच आपल्या लाडक्या छत्रपती शिवरायांनी या रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या बोटाच्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ का घेतली असावी……कारण हे इतकं सुंदर निसर्गाने आपल्याला अनंत हातांनी भरभरून दिलेलं प्रेम असं ऐऱ्यागैर्यांच्या हाती जाऊ नये आणि आपल्या सर्वांना सुखाने आनंदाने रहाता यावे आणि अशा स्वर्गासारख्या निसर्गात आपण मनसोक्त विहार करत रहावे, हे आणि असे बहुसंख्य उद्देशानेच छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
परंतु आपलंही कर्तव्य आहेच की या अशा सर्व गड किल्ल्यांची आपण जपणुक केली पाहिजे. त्यांचे संगोपन, संवर्धन केले पाहिजे.
खरं तर अशा सुंदर निसर्गरम्य ठिकाणी आपण एकदाच नाही तर वारंवार जाऊन आपल्या पुढच्या पिढीला पण याचं महत्व सांगुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा सांगितल्या पाहिजेत.
🙏🏻 हिच खरी छत्रपती शिवरायांना मानवंदना असेल. 🙏🏻
🚩जय भवानी जय शिवाजी🚩

– लेखन : सौ. मंजुषा राजेश किवडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869485800