सहल हा शब्दच किती जादुमय आहे ! अगदी ५ वर्षा च्या मुलापासून ७५ वर्षाचे जेष्ठही आनंदाने उडी मारायला लागेल असा हा जादूमय शब्द.
सहल ह्या शब्दाबरोबर लगेच कुठे जायचे ? त्या ठिकाणा ची मोठी यादीच तयार होते. खरेतर आम्ही मैत्रिणींनी प्रथमच लांबची ट्रिप ठरवली. वेगवेगळ्या ठिकाणाचा विचार करून, आमची शेगांव दर्शन सहल ठरली. तारीख वार नक्की झालं आणि सर्वांच्या आनंदाला उधाण आले. रेल्वेचे जाण्याचे येण्याचे तिकीट रिझर्व्ह झाले. आता घरी दारी फक्त शेगांव दिसु लागले.
आमची रात्री १०ची गाडी होती. सकाळी ७-३० ला आम्ही शेगांवला उतरलो. गाडीतच सगळ्या फ्रेश झाल्या होत्या. स्टेशन च्या बाहेर आल्यावर आधी शेगांव ची प्रसिद्ध कचोरी खाल्ली. वाटले, एवढ्या सकाळी काय आपण कचोरी खाणार ? म्हणून एक एक कचोरी घ्यायचं ठरले. पण गरमागरम कचोरी खाल्ली व लगेच दुसरी कचोरी कधी सांगितली कळले देखील नाही. खरोखर अप्रतिम चव होती कचोरीची. चहा पिऊन आम्ही रिक्षाने आनंद विहार च्या भक्त निवास मध्ये गेलो.
इतके दिवस आम्ही फक्त शेगांव च्या स्वच्छते बदल ऐकले होते ते आता आम्ही प्रत्यक्ष अनुभवत होतो. अप्रतिम सुंदर परिसर. अगदी शांत वातावरण. झाडांनी बहरलेला सर्व परिसर पाहून प्रवासाचा थकवा एका क्षणात नाहीसा झाला. आम्ही ११ मैत्रिणी होतो. म्हणुन तीन रूम घेतल्या. मोठ्या हॉटेलला लाजवेल इतक्या सुंदर स्वच्छ व सर्व सोयी नी युक्त अश्या या रूम आहेत. येतानाच रिक्षावाल्यांनी आम्हाला शेगांव दाखवू असे सांगितले. पण शेगांव ला येण्याच्या आधीच माझी शेजारी व छान मैत्रीण रेणू कुलकर्णी हिने शेगाव येथे स्थायिक असलेल्या मामेभावाची माहिती देऊन गरज असेल तर त्यांची मदत घेण्यास सुचवले. त्या नुसार त्यांच्याशी बोलून शेगांव येथे काय काय बघता येईल याची माहिती देऊन, त्यांनी गाडीची व्यवस्था केली.

रेणू चा मामेभाऊ म्हणजे शामभाऊ कुलकर्णी. त्यांनी ठरवलेल्या गाडीचा ड्रायव्हर, आदित्य पाटील यांचा मला फोन आला व आज काय काय पाहणार आहे हे त्याने विचारले. मी सांगितले की गजानन महाराज चे दर्शन व नागझरी पाहणार आहे. ते म्हणाले की आज तुमचे गजानन महाराज चे दर्शन; लोणार सरोवर; मेहेकर बालाजी मंदिर; नागझरी शिवालय व शेगांवातील इतर ठिकाणे दाखवतो.
त्यानुसार आधी श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतले. सुंदर फुलांनी सजवलेल्या त्या शांत मुतिॅ वरून नजर बाजूला कराविशी वाटत नव्हती. अगदी मनसोक्त दर्शन घेतले. मनसोक्त अश्या साठी की इतर ठिकाणी जरा गर्दी असली की एक क्षणभर पण दर्शन घेऊ देत नाही. चला चला पुढे असा लकडा असतो. पण इथे अगदी छान शांतपणे माऊली चे दर्शन झाले. “झाले का माऊलीचे दर्शन ?” येवढेच फक्त सेवेकरी विचारात होते. कुठे हि धक्का बुक्की नाही की आरडाओरडा नाही.

महाराजाचे डोळे भरून दर्शन घेतले. नंतर मंदिरातील महाप्रसाद घेतला. एवढी मोठी लाईन होती, पण कुठेच मोठ्याने आवाज नाही. सगळं कसे शांतपणे चालू होते. दोन ते तीन मजली प्रसादालयात मोठं मोठी दालनं, टेबल खुर्ची अशी छान बसण्याची व्यवस्था होती. वयस्कर व ज्यांना जिना चढणे शक्य नाही त्यांच्या साठी खालच्या मजल्यावर जेवणाची सोय होती. अतिशय स्वच्छ सुंदर महाराजांचे आशिर्वाद असलेल्या रुचकर महाप्रसादाचे जेवण आम्ही जेवलो. तिथे कोणीही जेवण उष्टे टाकु शकत नाही. राहिलेले जेवण बरोबर बांधून देतात. शिस्त व स्वच्छता खरोखर वाखाणण्या जोगी आहे.
सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे नम्रपणा. फोटो काढु नये हे फलक तिथे लावले होते. त्यामुळे फोटो घेतले नाही. इथे कुठेही प्रसिद्धीचा हव्यास नाही. त्यामुळे फोटो काढून घेणे ही तर खुप लांब ची गोष्ट झाली. तुम्ही तिथे उगाच कोणाशी गप्पा मारू शकत नाही किंवा कुठले प्रश्न ही उगाच विचारू शकत नाही. कुठलाही सेवेकरी कोणाशी गप्पा मारत नाही. फक्त नम्र सेवाभावच अनुभवयाला मिळतो.
सगळे सेवेकरी पांढऱ्या शुभ्र कापडात व डोक्यावर गांधी टोपी व मुखात फक्त आणि फक्त माऊली माऊली. धन्य ते सेवेकरी. त्यांना मनापासून प्रणाम.
आता खरा आमचा प्रवास सुरू झाला, आमचे गाडीवाले चक्रधारी सारथी आदित्य पाटील व त्यांचे सहकारी यांच्या बरोबर. नांव जरी आदित्य असले तरी शांत सुस्वभावी व भरपूर गप्पा मारणारा, कधी अगदी एखाद्या लहान भावा सारखी आमची काळजी घेणारा, कधी आमच्यातीलच एक होऊन गेला हे कळलंच नाही.
शेगांव वरून आम्ही लोणार सरोवर बघायला निघालो. वाटेत छान ऊसाचा रस पिऊन तृप्त झालो कारण रस खरोखरच छान गोड होता. अगदी परत एकदा घेतला. दुपारी २ वाजे पर्यंत आम्ही लोणार सरोवर येथे पोहचलो. ऊन जरा जास्तच होते. पण लोणार सरोवर चे सौंदर्य ही खुप सुंदर सुखद होते. लोणार सरोवराचा इतिहास खुपच अद्भुत आहे.

येथे श्रीरामाचे एकट्या चे मंदिर आहे. येथे पुरातन कुंड आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात फक्त श्रीरामाची मूर्ती आहे, सहसा श्रीराम यांची एकटी मूर्ती कधीही नसते… अजून खास म्हणजे श्रीराम यांची ही मूर्ती निशस्त्र अवस्थेत आहे. श्रीरामाच्या हातात कायम धनुष्यबाण दाखवले जाते जे या मूर्तीत नाही. यामागे एक खास कारण आहे. श्रीराम वनवासात असताना येथे या सरोवराच्या बाजूला वास्तव्यास असताना त्यांचे वडील दशरथ यांचे निधन झाले… श्रीरामांनी आपल्या वडिलांचा दशक्रियाविधी येथून वीस किमी अंतरावर असलेल्या पैनगंगा नदीच्या काठी मेहकर येथे केला… तेथेच श्री बालाजी यांची खास मूर्ती आहे. श्रीराम यांना आपल्या वडिलांचे पिंडदान करायचे होते आणि ते वनवासात असल्याने त्या विधीसाठी श्रीराम निशस्त्र असायला हवेत अशी अट होती आणि त्यांच्याबरोबर कोणी स्वकीय असायला नको… हेच पिंडदान श्रीरामांनी या सरोवराच्या बाजूला केले आणि त्याचं ठिकाणी सध्याचे हे निशस्त्र श्रीरामाचे मंदिर आहे. या मंदिरात एक अचंबित करणारी गोष्ट अशी या ठिकाणी तुम्ही गाभाऱ्यात मूर्तीच्या समोर उभे राहून हात जोडून नमस्कार करायला उभे राहिलात की तुम्हाला श्रीरामांच्या मूर्तीच्या एका बाजुला लक्ष्मण आणि दुसऱ्या बाजूला सीता मातेचे दर्शन होते…हे खूपच आश्चर्यकारक आहे. इतक्या सुंदर पुरातत्व वास्तु ची देखभाल मात्र नीट घेतली जात नाही. खरोखरच जर सरकार व स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन येथे थोडी सुधारणा केली तर पर्यटकांचे आवडते ठिकाण होईल.

येथे आम्हाला केंद्रीय मंत्री मा.श्री.नितीन गडकरी साहेबांचे बॉडीगार्ड भेटले. त्यांना भेटुन खुप छान वाटले. कारण खरोखरच श्री. नितीन गडकरी साहेबांनी तेथील सर्व भागातील रस्ते अतिशय सुंदर केले आहेत. त्यामुळे कुठेही प्रवासात दगदग झाली नाही. धन्यवाद श्री.नितीन गडकरी साहेब.
लोणार सरोवर आणि श्रीराम मंदिर नंतर आम्ही मेहेकर येथील अतिशय सुंदर अप्रतिम असे श्री बालाजी मंदिर बघितले. अप्रतिम अशी ११ फुट उंच अशी बालाजी ची मूर्ती आहे. त्या मूर्तीचे दिवसातून तीन वेळा चेहऱ्यावरचे भाव बदलतात. आम्ही गेलो तेव्हा ती मूर्ती आमच्याकडे बघून स्मितहास्य करत आहे असेच वाटत होते. आम्ही दर्शन घेत असताना मूर्तीच्या हातातील फुल अलगद खाली पडले ते बघून आम्हाला खरंच खूप आनंद झाला. त्या मूर्तीच्या डोक्यावर घाम देखील येतो इतक्या जागृत स्थळाला आपण भेट दिली याबद्दल मनोमन खूप समाधान वाटले व आपल्या भारतात इतके अद्भुत ठिकाण आहेत याबद्दल खूप गर्व ही वाटला. त्या मंदिरातून अक्षरशः बाहेर यावसंच वाटत नव्हतं पण पुढील प्रवास करणं गरजेचं होतं.

तेथून आम्ही नागझरी शिवालय मंदिरात गेलो. अतिशय सुंदर असे मंदिर आहे. हे मंदिर खूप छान पुरातन असून सुरेख बांधलेले आहे. येथेही पाण्याचे कुंड आहेत. मंदिरातून निघेपर्यंत आम्हाला जरा रात्र झाली त्यामुळे आकाशातील चंद्र व त्याच वेळेस गुरु आणि शुक्र यांची युती आम्हाला बघायला मिळाली खूप नयनरम्य असे दृश्य होते. नागझरी येऊन निघून आम्ही पुन्हा शेगांवात आलो.
शेगांवातील श्री गजानन महाराजांचे प्रगट स्थान श्री.बंकटलाल याचं सदन; गजानन महाराज बसायचे ते शिवालय मंदिर व इतर काही ठिकाणे आम्ही बघितले व आनंद विहार येथे आमच्या मुक्कामी आलो. येथे आम्हाला अगदी अल्प दरात सुंदर जेवणाची व्यवस्था होती. इथे ही सेवेकरी मनापासून लोकांना जेवण वाढत होते. कुठेही आवाज नाही. गोंधळ नाही. खुप मोठे प्रसादालय आहे. एका वेळेस भरपूर लोक इथे जेवण (प्रसाद) करू शकतात. जेवण करून आम्ही आमच्या रूमवर आलो. सकाळी लवकर उठायचे होते.

सकाळी आम्ही श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी माहुर येथे जाणार होतो. त्यामुळे जास्ती गप्पाटप्पा न करता सगळ्याजणी पटापट झोपल्या.
क्रमशः

— लेखन : सौ मंदा शेटे.
— संपादन : सौ अलका भुजबळ.
☎️9869484800