एप्रिल महिना म्हटलं की डोळ्यासमोर येते चैत्र गौर, कैरी पन्हे, आंबे आणि वाढती उष्णता म्हणजेच उन्हाळ्याची सुरूवात. बाहेरचे तापमान वाढत असल्यामुळे, आपण घरातील तापमान कमी करण्यासाठी दिवसा आणि रात्रीही आपल्याला ए.सी. चालू ठेवावा लागतो.
आपल्याला माहीतच आहे की, ए.सी. वीजेवर चालतो. परिणामी आपले वीज बिल मोठ्या प्रमाणात वाढते. पण तुम्हाला माहित आहे का की ए.सी. किती वीज वापरतो हे आपण ए.सी. कसा वापरता यावर अवलंबून असतो ?
ए.सी. किंवा अन्य कोणत्याही वीजेच्या उपकरणाला ठराविक भार घेण्यासाठी डिझाइन केलेले असते. जर आपण उपकरणाचा वापर दिलेल्या तपशीलांनुसार केला, तर ते निश्चितपणे आपल्याला ऊर्जा वाचविण्यात, वीज बिल कमी करण्यात आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यात मदत करते. होय, तुम्ही बरोबर वाचलेत ! जितकी जास्त वीज आपण वापरतो, तितकेच जास्त आपण पर्यावरणाचे नुकसान करत आहोत.
आपण वापरत असलेली वीज जीवाश्म इंधनांपासून (fossil fuel) निर्मित केली जाते, ज्यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड गॅस उत्सर्जित होतो आणि तापमान वाढते. त्यामुळे आपण अप्रत्यक्षपणे तापमान वाढ आणि हवामान बदलास कारणीभूत आहोत.
मग वीजेचा वापर कमी करण्यासाठी म्हणजेच विज बचतीसाठी आपण काय करू शकतो ?
आपल्या घरचा वीज वापर कमी करण्यासाठी काही टिप्स पुढीलप्रमाणे आहेत :-
1) ए.सी. चे तापमान २४°C ते २६°C दरम्यानच ठेवावे आणि सापेक्ष आर्द्रता ५५% ते ६५% दरम्यान ठेवा. या सेटिंग्जवर ए.सी. किमितकमी वीज वापरण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. तसेच ही सेटिंग्ज मानवी शरीरासाठी सर्वाधिक आरामदायी वातावरण लक्षात घेवून डिझाइन केली गेली आहेत.

2) ए.सी. चालू असताना पंखा (ceiling fan) चालू करा ज्यामुळे खोलीत वाऱ्याचा प्रवाह सुधारेल व खोलीभर एकसारखे तापमान राहील.
3) खोलीतील सर्व दरवाजे आणि खिडक्या घट्ट बंद आहेत याची खात्री करा. गरम हवा आत शिरल्यास ए.सी. वर जास्त भार पडेल.
4) वॉर्डरोब, कपाटं यांचे सर्व दरवाजे घट्ट बंद ठेवा. ए.सी. ला कळत नाही की त्याला कपड्यांना थंड करायचे नाहीये.
5) ए.सी. च्या इंडोअर युनिट्सचे फिल्टर्स नियमितपणे (महिन्यातून एकदा) साफ करा. ए.सी. चालू करण्यापूर्वी फिल्टर्स पूर्णपणे कोरडे आहेत याची खात्री करा. ओले किंवा आर्द्र फिल्टर्स अधिक धूळ शोषून घेतात. सक्रिय पर्यायी फिल्टर ठेवणे आणि नियमितपणे बदलणे चांगले आहे.

6) आपल्या ए.सी.च्या बाह्य युनिट्सच्या फिन्सना साबणाच्या पाण्याने नियमितपणे साफ करा, कारण ए.सी. चालू असताना त्या जास्त वेगाने धूळ गोळा करतात. कॉईल साफ केल्यावर लगेच ए.सी. चालू करू नका, कारण ओल्या फिंसवर अधिक धूळ जमतो. काही तासांनी ए.सी. वापरा. जेव्हा बाह्य युनिटमध्ये उष्म हस्तांतरण चांगले होते, तेव्हा ए.सी. ची दररोजची एकूण कार्यक्षमता तात्काळ सुधारते आणि ऊर्जेचा वापर कमी होतो.
7) ए.सी. रेफ्रिजरंट गॅसचा दाब तपासा (वर्षातून एकदा)
8) आपल्या रेफ्रिजरेटर सुद्धा छोटा ए.सी.च आहे. आपल्या रेफ्रिजरेटरला जास्त किंवा कमी भरलेला ठेवू नका. जास्त भरलेला असेल तर जास्त वीज वापरेल आणि कमी भरलेला असेल तर काही काम न करता वीज वाया जाईल.
9) आपल्या रेफ्रिजरेटरचा दरवाजा घट्ट बंद असल्याची खात्री करा. बाहेरची गरम हवा आत शिरल्यास फ्रिज वर जास्त भार पडेल.
10) फ्रीजचे तापमान २˚ ते ४˚C आणि फ्रीजरचे तापमान -१७˚ ते -१५˚C सेट करा.
11) थोड्या व छोट्या गोष्टी गरम करायला मायक्रोवेव्ह, ओव्हन यांचा वापर करा.
12) गॅसची फ्लेम नेहमी निळी ठेवा. लाल-पिवळी नाही.

13) आपल्या जल पंपाचे दर 3 वर्षांनी नियमितपणे सर्विसिंग करा. पंपिंगच्या पाण्याचे प्रमाण कमी अढळल्यास पाईपिंगचीही तपासणी करा.
14) स्वयंपाकघरातील नळासाठी वॉटर स्प्रेयर वापरा, ज्यामुळे भांडी धुण्यासाठी वापरले जाणारे पाणी सुमारे ५०% वाचेल.

15) नेहमी BEE स्टार लेबल असलेली विजेची उपकरणे वापरा.

आपण सर्वांनी मिळून केलेले हे छोटेसे बदल उद्याचे भविष्य आणखी उज्वल करण्यास नक्कीच मदत करतील. कारण ऊर्जा संवर्धनाची (energy conservation) प्रत्येक कृती शाश्वत पर्यावरणाकडे (sustainable environment) नेणारे एक पाऊल आहे, हे लक्षात ठेवा.

— लेखन : सुप्रिया देशपांडे. विद्युत अभियंता,
सर्टिफाईड एनर्जी ॲाडिटर, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
