आयुष्यात पहिल्यांदाच मी पाककला स्पर्धेत भाग घेतला. ज्वारी बाजरी नाचणीचे कुठल्याही एका घटकांपासून एक पौष्टिक पदार्थ करायचा. या निमित्ताने मी यु ट्युब वर अनेक रेसिपीज पाहिले.अनेक पदार्थ घरी करून पाहिले. हाच आनंद मानत मी स्पर्धेत उतरली. साधारण 150 महिलांनी भाग घेतला होता. मला सातवे बक्षीस मिळाले. मस्त भारी वाटले. वाचू या स्पर्धेचा वृत्तांत…
पाककला स्पर्धेच्या निमित्ताने मी माझ्या खास मैत्रिणीना काही हटके पदार्थ करत असाल तर पाठवा, असे सांगून त्रास देत होती. सर्व मैत्रिणी असं कर, तसं कर सांगत मस्त चविष्ट पौष्टीक पटकन होणाऱ्या रेसिपीज पाठवत होत्या. मी भाग घेऊ, नको घेऊ, अशी तळ्यात मळ्यात होते. असे करता करता मनाचा ठिय्या पक्का करत भाग घ्यायचे नक्की केले.
प्रथम प्रत्येकी एक एक किलो ज्वारी, बाजरी, नाचणी आणली. त्याबरोबर प्रत्येकी एक एक किलो ज्वारी, बाजरी व नाचणी परत वेगळे पीठ आणले. सॅलड पण करायचे होते. मग डेकोरेशन. त्याबरोबर अनेक प्रकारच्या रंगीत भाज्या रोज घेऊन येत होती. दोन तीन आठवडे घरात ह्याच तीन पदार्थाची आणि सॅलडचीच जणू मक्तेदारी होती. अनेक पदार्थाची रेलचेल त्याबरोबर त्याच्या चवी चाखून बघताना त्याची सजावट, त्याचा रंग व पदार्थ कसा आकर्षित होऊ शकतो यासाठी भाज्या, फळं वेगवेगळ्या आकारानी कापून त्याची सालं पण सोडली नाही. सतत काय आणि कशी सजावट छान दिसेल ? मग कुठल्या प्लेट्स कुठल्या आकाराची, रंगाची घेऊ, करत घरातल्या शोकेस मधील काचेची, सिरेमॅक्सचे सेट आत बाहेर करत होती. पदार्थाचे नमूने करता करता माझा किचनचा कट्टा, फ्रिज अगदी रंगीबेरंगी झाला होता. असे अनेक पदार्थ घरी करून पाहिले. हाच आनंद मानत मी स्पर्धेत उतरली.
मिती क्रिएशन आयोजित उत्तरा मोने सादरीकरण मार्फत मुंबईत सहा सात ठिकाणी श्रावण महोत्सव स्पर्धा होत्या. माझी खास सखी सुनंदा रानडे, ही मला तू भाग घे म्हणत प्रोत्साहित करत होती. सखीला मान देत स्पर्धेत नाव नोंदवले. जास्तीत जास्त काय होईल बक्षिसाची अपेक्षा नाही, पण काहीतरी करायला तर हवं करत खूप विचार केला आणि मी गोल गोल अनेक रेसिपीज करून शेवटी मी नेहमी करते ते ज्वारीच्या पीठाचे थालीपीठं करायचे ठरवले. पण यावेळेस हटके करू काय..? तर आपण ज्वारीला मोड आणून त्याची थालीपीठं करू आणि त्या थालीपीठांना हसरे ईमोजी करू, बस् पक्क आणि त्या बरोबर मस्त घरचं ताजं लोणी.
आता सॅलड ठरवलं. रंगीत सिमला मिरच्या, मक्याचे दाणे, डाळिबं, झुकेणी बारीक बारीक एकाचं आकाराचे कापून मस्त मिक्स करून ठेवायचे. सुरेखा सोड्ये, माझ्या नणंदेने पण मला छान छान आयडिया दिली. चला मग एकदम मस्त तयारी केली व घेतला भाग.

साधारण 150 च्या आसपास स्पर्धकांनी भाग घेतला होता.
मस्त छानश्या प्लेट मध्ये हसतमुख पाच इमोजी ठेवले. त्याला छानसे सजवले आणि बाजूच्या प्लेट मध्ये एकदम रंगसंगतीत सॅलडला सजवले. बाजूला छान वेगवेगळ्या सॅलडचे कापनी सजावट केली. पुढे स्वागतासाठी पेअर फुलाच्या एका कापाला अळशीच्या मदतीने सजवले. व्वा छान सजवून बसले.


मला second top 5 मध्ये दुसरं बक्षिस म्हणजे सातवे बक्षीस मिळाले. मला खूपच भारी वाटले.
हो हो आता माझी खास मजेशीर पूर्णिमा रेसिपी वाचाच.
मोड आलेल्या ज्वारीची थालीपीठं.
एक मध्यम वाटी ज्वारीला प्रेमानी आधी ओजारले. मग मस्त सावकाश धूवुन ज्वारीला दोन दिवस एक चमचा मेथी बरोबर पाण्यात भिजत ठेवले. मग थंडी लागु नये म्हणून ज्वारीशी गप्पा मारत त्याला छान मऊ फडक्यात घट्ट एक दिवस बांधून ठेवले.
खूश होऊन आनंदाने त्या लाडक्या ज्वारीला मोड आले. मग त्या ज्वारी ला छान हलकेसे गाणं म्हणत भाजले. त्याला थंड केले .
मग मिक्सर मध्ये बारीक केले. मग त्या पिठा ला वाईट वाटू नये म्हणून त्यात रंगबेरंगी सिमला मिरची, गाजर, कोथिंबीर, घातली आणि थोडा कोबी ही घातला. अजून खूष होण्यासाठी त्यात धनेजिरे पूड, तिखट, मीठ, हळद, एक चमचा दही घातले. त्या सर्वाची दोस्ती व्हावी म्हणून एकजीव केले, पाणी नाही हं घातले. मग छान छान emoji स्माईली करत तव्यावर खरपूस थालीपीठं केली. खूष होत मग ती थालीपीठं हातात हात घेत प्रदर्शनात नटून बसली आणि चक्क त्या लाडक्या थालीपीठांनी बक्षीस आणले ना घरी.
गुणी थालीपीठांची, गुणी ग बाई कथा.
मोड आलेल्या कडधान्याचे रंगीत सॅलड
मुग, चवळी, मटकी, हरभरे आले आले नाचत, प्रत्येकी दोन दोन चमचे घेत घातले त्यांना भिजत.
चौघांच्या चार तर्हा तरी मैत्री व्हायला हवी ना ?
मग पूर्ण एक दिवस भिजवले पाण्यात.
मग त्याला छान पातळ फडक्यात अजून मैत्री होण्यासाठी बांधले. मैत्रीत त्याना आनदांनी मोड आले. त्या चौघांना थोड्याश्या तेलात हलके कूरकूरीत परतवले.
मग त्या मैत्रीला रंगीत करायला रंगीत सिमला मिरच्या आल्या. मग नाचत, सोनेरी मक्याचे दाणे आले बागडत, डाळिंबाचे दाणे आले उड्या मारत, मग अर्धा कांदा, अर्धी एक झुकेणी, केशरी गाजर, टोमॅटो तयारच होते खेळायला. खेळता खेळता त्यात मीठ मिरपूड लिबूं पण धावत आले. सर्वाना मिसळून बसविले त्यांना बशीत, सगळे हसले खुशीत.
किती मस्ती, किती द्वाड,
चविष्ट आणि पौष्टीक
सर्वानी केले मग सॅलडचे लाड.

— लेखन : सौ पूर्णिमा शेंडे. मुंबई.
— संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
पौर्णिमा ताई रेसिपी खुप छान झाली.
तुम्ही गप्पा मारल्या मुळे ज्वारी जरा जास्तच
गोरीमोरी होऊन लाजली.
रेसिपी पेक्षा कृती वाचताना मज्जा आली.
सुंदर सुंदर 👌
अभिनंदन अभिनंदन 💐💐
पाककृती शिकुन घ्यायची तर , तुझ्याकडूनच शिकावी.अगं ..काय भन्नाट वर्णन केलेस तु..हे वाचतांना अक्षरशः डोळ्यासमोर नाचतायेत सर्व पदार्थ!! लय भारी!!