Wednesday, March 12, 2025
Homeलेखअशी द्या परीक्षा !

अशी द्या परीक्षा !

दहावी बारावी च्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअर, अभ्यासक्रम निवड या दृष्टीने ह्या दोन्ही परीक्षा महत्वाच्या असतात. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्याच्या मनावर या परीक्षांचे दडपण असते. हे दडपण वाढविण्यात पालकांचा देखील हातभार असतो. कशाला किती महत्व द्यायचे याचा विचार लहान मोठे सर्वांनीच करायला हवा. ताण घेऊन प्रश्न सुटत नाहीत. उलट त्याचा त्रास होतो. त्यामुळे या परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त आनंदी असायला हवे. त्यासाठी वर्षभर आपण जी मेहनत घेतली,अभ्यास केला तो वाया जाणार नाही हा आत्मविश्वास हवा.शेवटी शेवटी फक्त उजळणी वर भर द्यावा.

नेहमीचा अभ्यास अन् परीक्षे पूर्वीचा अभ्यास यातला फरक समजून घेणे गरजेचे आहे. आता तुमच्याकडे वेळ मर्यादित असतो.त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या समजल्या आहेत त्या भागाची धावती जलद उजळणी करावी.अन जो भाग तुलनेत कठीण वाटतो त्यावर भर द्यावा.त्या संबंधी ची उत्तरे पुन्हा पुन्हा नजरेखालून घालावी.

सर्व प्रथम हातातली प्रश्न पत्रिका एकदा नव्हे तर दोनदा नीट वाचा.प्रश्नात नेमके काय विचारले आहे,उत्तरात काय अपेक्षित आहे हे नीट समजून घ्या.एकदम उत्तरे लिहिण्याची घाई करू नये.अनेकदा नको ती घाई अंगलट येते.चुकीचे उत्तर लिहिल्या जाते.जे प्रश्न तुम्हाला सोपे वाटतात, जो भाग तुम्हाला छान समजला आहे,त्या वरचे प्रश्न आधी सोडवा.उत्तर लिहून झाले की धावती नजर टाकून ते बरोबर आहे,काही चुकीचे तर लिहिल्या गेले नाही,याची खात्री करून घ्या.सोपे प्रश्न सोडवल्या नंतर तुलनेत कठीण वाटणाऱ्या प्रश्नाकडे वळा.त्यात तुम्हाला जितके, जसे आकलन झाले तसे प्रामाणिक पणे लिहिण्याचा प्रयत्न करा.मुळात खूप कठीण,खूप सोपे असे काही नसते.सारेच थोडे सोपे थोडे कठीण असे असते.प्रश्न ज्याच्या त्याच्या समजुतीचा, आकलन शक्तीचा असतो.
अक्षरे नीट, मोठी स्वच्छ हवीत. जर आकृतीची गरज असेल तर ती नीट नेटकी काढायला हवी. सुंदर नीट नेटके लेखन, प्रस्तुती करण हेही अचूकते इतकेच महत्वाचे असते.

गणित, सायन्स या विषयात आकृत्याचे महत्व असते. भाषा विषयात व्याकरण, शुद्ध लेखन, विचारांचे स्पष्ट प्रस्तुतीकरण, योग्य शब्द वाक्य रचना, विषयाची मुद्देसुद मांडणी याला महत्व असते. तुम्हाला जे येते, समजले ते परीक्षकाला पटवून देण्या इतके कौशल्य एकूणच उत्तर पत्रिकेत दिसले पाहिजे. तसे ते प्रतिबिंबित झाले की मग अनावधानाने एखादी चूक झाली तरी माफ केली जाते.

सगळेच पेपर सारख्या काठिण्य पातळीचे नसतात. एखादा पेपर कठीण आला, किंवा नीट लिहिल्या गेला नाही तरी त्याचा परिणाम इतर उरलेल्या परीक्षेवर, अभ्यासावर होऊ देऊ नका. इथे आशावाद महत्वाचा. सगळे काही उत्तम होईल हा विश्वास महत्वाचा. कारण मधूनच तुम्ही हातपाय गाळले तर तुमचा अर्जुन होईल. अशा वेळी आपल्या मागे आपले पालक, शिक्षक , जवळचे मित्र यांच्या रूपात कुणी कृष्ण तुमच्या पाठीशी असतोच याची खात्री बाळगा. निश्चिंत राहा.

बोर्डाचे मार्क्स, बोर्डाचा रिझल्ट पुढच्या प्रवेश परीक्षे साठी महत्वाचा असतो हे खरे. हे स्पर्धेचे युग आहे अन् पूर्वीच्या तुलनेत स्पर्धा वाढली आहे हे जे तुम्हाला वारंवार सांगितले जाते तेही खरे आहे. पण पूर्वीच्या तुलनेत आज शिक्षण, अभ्यासक्रम, विषयाची निवड यासाठी भविष्यात अनेक पर्याय आहेत. अमुकच वाट उत्तम,अमुक शाखा करियर साठी महत्वाची असे काही नसते.किंबहुना काही अल्प अपवाद सोडले तर तुम्ही आज जे काही शाळा कॉलेजात शिकता, जे काही ऐंशी नव्वद टक्के गुण मिळवता त्याला पुढे फारसे महत्व नसते.जो काही अभ्यासक्रम तुम्ही निवडाल त्यात तुम्ही किती प्राविण्य मिळवता, जे क्षेत्र तुम्ही करियर साठी निवडता त्यात तुम्ही स्वतःचे नैपुण्य कसे किती दाखवता यावर तुमचे पुढील भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे दहावी बारावीच्या टक्क्यांना अवास्तव महत्व देऊ नका. ते जगण्या मरण्याचा प्रश्न समजू नका. आपल्या परीने जितकी जास्त, प्रामाणिक मेहनत करता येईल, ती मात्र अवश्य करा. त्यात हयगय,चाल ढकल नको.

स्वतःचा स्वतःवर, म्हणजे स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास हवा. तो असला की कसलेही भय वाटणार नाही. ताण भासणार नाही.आणखीन एक आपले पालक, घरचे वडीलधारे, शिक्षक, यांच्या आशीर्वादावर श्रद्धा असू द्या. ती श्रद्धा तुम्हाला या परीक्षेचे शिव धनुष्य उचलण्यास, पेलून धरण्यास, लक्ष्य भेदण्यास निश्चित मदत करेल. सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. यश तुमचेच आहे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम