साहित्य प्रतिभा जागृत असताना एखाद्या विषयावर कविता सुचू पहाते पण काही वेळा असा अनुभव येतो की, जणुं कृष्ण आपल्याला विचारतोय, मी हवा की माझं सैन्य ? नेमका अशा वेळी माझा दुर्योधन होतो. कल्पना सुचते पण शब्दच लबाडी करतात. समर्पक शब्द सुचत नाहीत. मग अशा अर्धवट लिहिलेल्या कवितांचे कागद मी फाडून टाकतो.
कवीच्या मनाचा एक पोत असतो, साहित्यात जे काही नवरस आहेत शृंगार, हास्य, करुणा, वीर, भयानक, बीभत्स, अदभुत, शांत असे हे रस कवी त्याच्या मूळ अंगभूत असणाऱ्या पोता प्रमाणे काव्य रचना करतो, काही पोवाडे रचतात काही हास्य कविता, काही चावट, बीभत्स अन काही या पालिकडेही जाऊन डोळ्यासमोर घडलेल्या घटना प्रसंग पाहूनही कविता रचतात.
माझ्या बाबतीत तर प्रेम केलं, प्रेमातल्या ओलाव्याच्या स्वप्नरंजनाच्या कविताही लिहिल्या. काही काळानंतर प्रेमभंग झाला. मग विरहाच्या कविता झाल्या. मी निसर्गवेडा आहेच त्यामुळे निसर्गाचे सौंदर्य त्यातील बदल नभीचे बदलते सुंदर आकर्षक वा दाटून आलेले काळे काळे ढग, रंगरूप, बदलते स्वरूप, निसर्गताले देवदूत, अशा अनेक विषयांच्या कविता सुचल्या, लिहिल्या गेल्या.
निसर्ग मोहक तन रोचक कधी सूर्य अस्तांचली
कधी चंद्र चांदण्या कधी मोर थुई थुई
कधी वेणूचा नाद अनावर सतार दिडदा मनी
मनात माझ्या शब्द निनादे होऊन संवादिनी
खळखळे झरा कधी, कधी लाटा उसळती
ऊन पाऊस लय तयाची इंद्रधनु सतरंगी
कधी शब्द उमाळा कधी तान कोकिळेची
विरहाची सल कधी कधी वेळ प्रसंगाची
अन अचानक मनी उसळते शब्दांची उर्वशी
लेखणीतनं झरते शाई कविता सुचते अशी
शब्दांना जेंव्हा जेंव्हा उमाळा येतो सरस्वतीच्या प्रांगणात जेंव्हा सरसरतो तेंव्हा शब्दांनाच कोंब फुटतो, जाई जुई सोनचाफा फुलांचा सुगंध दरवळ जेंव्हा नाकी भरतो तेंव्हा त्या दरवळीतूनच मनविभोर रचना होतात. वेलीवरून अलगद पान गळावे अन मनात शब्द टपकावे असही होतं कधी कधी. आंब्याचा मोहर वा त्यावर लगडलेल्या कैऱ्या दिसणं, गुलमोहराला छान बहरून आलेला दिसणं, बहाव्याच्या पिवळ्या धम्मक फुलघोसांचे कंदील लटकलेले नजरेला दिसणं, बकुळीच्या वा प्राजक्ताच्या झाडारखाली फुलांची चादर पसरलेला सडा दिसणं या सारख्या आपल्याच निकट घडणाऱ्या घटना मनाला अलवार स्पर्शुन जातात या घटना प्रतिभा जागृत करतात अन कविता सुचतात.
शब्दांची टरफले मुसळानी कांडून त्यांच्याच काळजावर घणानी घाव घालून सन्नाट कविता भन्नाट होते. डोळे मिचकावत वाचणाऱ्या रसिकांच्या मनात हृदयात घर करून खंतावलेल्या मनांना आनंद देऊन जाते ती कविता. झेंड्यासारखं फडफडत, वाळवंटात तडफडत , वीजेसारखं कडकडत डोंगरावर गडगडत काळजाचा ठाव झेलत प्रतिभेला जे जे सुचतं ती कविता. जमिनीच्या ओटीत अलगद बीज पडतं त्या बीजाला कळत नाही हे कुणाच्या हातून पडलंय पण तिच्या रुजण्याच्या अंगभूत संपन्न गुणामुळे ते रुजतं हे जेंव्हा आपल्या सुप्त प्रतिभेला जाणवतं अन त्यावर काव्यरूपी भाष्य होतं ती कविता.
कालांतरानी रोप वाढतं त्यावर भिरभिरत एक पाखरू येऊन विसावतं त्याची वंशवेल वाढवतं हे आपल्या चक्षुनी पाहून त्यावर काव्य करणं म्हणजे कविता. जंगलाला आग लागल्यावर एखादी जिद्दी चिमणी दूरच्या तलावातलं पाणी तिच्या इवलुशा पंखातून आणून आग विझवण्याचा तिच्या परिने प्रयत्न करणं अन या प्रसंगाच्या अवलोकनार्थ काही सुचणं ती कविता. प्रत्येक ऋतु प्रत्येक नक्षत्र त्यात होणारे कालानुरूप बदल, उन्हाळा हिवाळा पावसाळा आपल्या अंतर्मनानं अनुभवणं अन मिळालेल्या त्या अनुभूतीतून आपल्या प्रगल्भ प्रतिभेला सहज सुलभ चालना मिळून चारोळी, गझल सुचणं ती कविता. कविता सहज सुचणं प्रासंगिक सुचणं अनेक विषय हाताळणं नवरसात लिहणं अन आपली साहित्य प्रतिभा जिवंत असणं हेच तर कवीचं लक्षण आहे ना ? असं म्हणतात ना “जे न देखे रवी ते ते देखे कवी” त्याला कविता सुचते कशी हा प्रश्नच मग उरत नाही ? खरं ना ?
इथे माझ्या एका इंजिनिअर कवी मित्राचा किस्सा सांगतो. तो निवृत झाला अन त्यानंतर कविता करायला लागला. अगदी सुमार दर्जाच्या, दर्जा कसला दर्जाहीनच त्या, मनात येईल तसा लिहायचा ना छंद, ना वृत्त, ना यमक जुळलेले ! गद्यच ते इतरांनी त्याला पद्य समजावे. बरं एकेका दिवशी किती कवितांचा रतीब घालावा ? चक्क पंचवीस तीस कविता रोज ग्रुपवर पाठवायचा, आमचे इतर कवी मित्र गृप मेंबर्स म्हणायचे याला कविता प्रसवत नाहीत तर याला रोज कवितांचे जुलाब होतात ! असो ज्याची त्याची प्रतिभा अन ज्याच्या त्याच्या कविता, दुसरे काय म्हणणार न आपण ?
— लेखन : सुनील चिटणीस. पनवेल
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800