Home बातम्या “अशी मी, अशी मी !”

“अशी मी, अशी मी !”

0

ठाणे येथील सतत सक्रिय असलेल्या “आम्ही सिद्ध लेखिका” संस्था आयोजित, नाट्य परिषद ठाणे शाखा निर्मित आणि प्रा.पद्मा हुशिंग लिखित खास महिला दिनानिमित्त “अशी मी, अशी मी” या आगळ्या वेगळ्या नाट्य प्रयोगाचे नुकतेच डाॅ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सादरीकरण करण्यात आले.

अनादी काळापासून आधुनिक काळापर्यंत स्त्री जीवनाचा आणि तिच्या कर्तृत्वाचा आढावा घेणारा नृत्य, नाट्य, गायन, काव्य, अभिनय यांचा अनोखा नाट्यविष्कार खास “पद्मप्रभा”कडून महिलांना भेट देण्यात आला.

आम्ही सिद्ध लेखिका संस्थेतर्फे वर्धापन दिनानिमित्त 22 एप्रिल रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन ठाण्यात करण्यात आले आहे. संमेलनपूर्व वातावरण निर्मिती व्हावी या हेतूने या प्रयोगाची भेट आपल्या सभासदांना आणि रसिकाना पद्मप्रभाने दिली.

या कार्यक्रमाचे उदघाटन प्रसिद्ध निवेदिका, समुपदेशक, प्रारंभ अकॅडमी च्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. याच महिला दिनाला बाईकमध्ये इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड करणा-या अन्विता सबनीस या बाईकक्वीनचा सत्कार करण्यात आला.

संस्थेच्या विश्वस्त मा. उषा चांदुरकर यांच्यातर्फे अन्विताचे धनादेश देऊन कौतुक करण्यात आले.

संस्थेच्या अध्यक्षा प्रा. पद्मा हुशिंग यांनी राज्य संमेलनाची महिती दिली. त्यानंतर रसिकांनी तुडुंब भरलेल्या नाट्यगृहात “अशी मी अशी” “मी” चा प्रयोग रंगला. नाट्य परिषदेचे कार्यवाह नरेंद्र बेडेकरांचे मार्गदर्शन लाभलेला हा प्रयोग निवेदिता रानडे यांच्या नृत्य दिग्दर्शनाने नटलेला, गोड गळ्याची सुप्रसिद्ध गायिका अनुजा वर्तक हिच्या सुरेल स्वरांनी सजलेला, शाहीर प्रवीण फणसे यांच्या भारदस्त पोवाड्याने गाजलेला, अंजली आमडेकर, अश्विनी कानोलकर यांच्या अभिनयाने भारलेला, आणि यतीन ठाकूर, जयश्री पाठक, प्रतिभा चांदुरकर, अस्मिता चौधरी, प्राची डिंगणकर, सुमित राणे आणि स्वतः पद्मा हुशिंग यांच्या काव्य सादरीकरणाने विविध रंग भरलेला प्रयोग रसिकांनी अनुभवला.

ह्या माध्यमातून अनेक मैत्रिणींना व्यासपीठ मिळवून देण्याचं आणि त्यांच्यातील अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे मोठे काम पदमाताई करत आहेत असे अरुंधती भालेराव यांनी सांगितले.

महिला दिनाची अनमोल भेट मिळाल्याचा आनंद रसिकांनी व्यक्त केला.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version