Monday, July 14, 2025
Homeकलाअशी रंगली गझल !

अशी रंगली गझल !

गझल मंथन साहित्य संस्थेने मुंबई येथे आयोजित केलेल्या निःशुल्क गझल लेखन कार्यशाळेत ८० पेक्षा अधिक नवोदितांनी गझलेचे धडे घेतले. यासोबतच महाराष्ट्रातील नामांकित गझलकारांचा बहारदार मुशायरा देखील रंगला.

मकरसंक्रांतीच्या शुभमुहुर्तावर दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात गझल मंथन साहित्य संस्थेच्या मुंबई शाखेतर्फे मराठी गझल लेखन कार्यशाळा आणि मराठी गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध गझलकार डॉ. कैलास गायकवाड, श्याम खामकर आणि प्रमोद खराडे यांनी गझल कार्यशाळेच्या प्रशिक्षकपदाची धुरा अतिशय समर्थपणे पेलली.

या गझल प्रशिक्षण कार्यशाळेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच सिलवासाहून देखील प्रशिक्षणार्थी आले होते. सुमारे ८० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी उपस्थित कार्यशाळेत होते.

गझलमंथनच्या मुंबईत झालेल्या या पहिल्याच ऑफलाइन विनामूल्य गझल लेखन कार्यशाळेला प्रशिक्षणार्थींनी भरघोस प्रतिसाद दिला. सकाळच्या पहिल्या सत्रातील काही तासांच्या प्रशिक्षणानंतर उपस्थित प्रशिक्षणार्थींनी एक मतला आणि २ शेर लिहिण्यापर्यंत मजल मारली. त्यातील पाच निवडक प्रशिक्षणार्थींचा गझलमंथन साहित्य संस्थेमार्फत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

दुपारच्या सत्रात प्रमोद खराडे, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा रंगला. त्यात डॉ. कैलास गायकवाड (नवी मुंबई), यांची

‘सभोवताली हवा विषारी आहे
प्राण उरातिल फक्त प्रभारी आहे

वार आपला बोथट होतो हल्ली
अन तिकडे समशेर दुधारी आहे

शांताराम खामकर (शाम) अहमदनगर, यांनी सादर केलेली गझल..
हा भोंगा थांबव म्हणतो, तो भोंगा वाजव म्हणतो अन् टीव्हीमधे बसलेला हा झगडा लांबव म्हणतो

मनसोक्त एकमेकांना लाथा मारुन झाल्यावर,
तो याला गाढव म्हणतो हा त्याला गाढव म्हणतो
श्रोत्यांच मन जिंकून गेली.

प्रा.मानसी जोशी, ठाणे, यांनी “आयुष्य ही राधा वृत्तातील
दोन धागे गुंफले
वस्त्रात आयुष्या
पोत भिजला नेहमी दुःखात आयुष्या”
ही गझल सादर केली.

याशिवाय गझल मुशाय-यामध्ये
प्रदीप तळेकर (पुणे), पूर्णिमा पवार (रत्नागिरी), बा. ह. मगदुम (पुणे), सुनेत्रा जोशी (रत्नागिरी),
ॲड.मुकुंदराव जाधव (जळगाव), यशश्री रहाळकर (नाशिक), डॉ. सुभाष कटकदौंड (रायगड), डॉ. मंदार खरे (पुणे) आणि एस.जी. गुळवे (पालघर) हे महाराष्ट्रातील विविध भागातील सुमारे १५ नामांकित गझलकारांनी आपल्या एकापेक्षा एक अशा अप्रतिम गझला सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

नंदुरबारच्या विष्णू जोंधळे यांनी सुत्रसंचालन करत असताना..
“दिसतात ज्या प्रमाणे नसतात हे दगड
देवासमान कोणी पुजतात हे दगड
पाया कळस स्वतःला मूर्तीत ढाळले
माथा झुकेल इतके सजतात हे दगड”
ही गझल सादर केली.

मुंबईच्या सुजाता मराठे यांनी मुशायऱ्याचे व कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. संध्याकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या गझल मुशायऱ्याला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. वर्षाच्या सुरुवातीलाच असा देखणा आणि सुंदर कार्यक्रम दिल्याबद्दल मुंबई जिल्हा कार्यकारिणीचे सर्वच उपस्थितांनी तोंड भरून कौतुक केले. यावेळी गझल मंथन साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल कांबळे, पनवेल शाखेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सोनवणे, ठाण्याच्या मानसी जोशी, पुण्याचे बा. ह. मगदूम तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे बहुतांशी कार्यकर्ते गझल लेखन कार्यशाळा आणि मुशायरा यशस्वी करण्यासाठी जातीने हजर होते.

कोरोना टाळेबंदी काळात विनामूल्य ऑनलाईन गझल लेखन कार्यशाळा घेणाऱ्या उर्मिला बांदिवडेकर आणि डॉ. शरयू शहा ही जोडगोळी देखील आवर्जून उपस्थित होती.

पुढच्या महिन्यात नवीन ठिकाणी नव्या उत्साहाने भेटण्याचे निश्चित करून सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

– टीम एसएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments