जसे सूर्याचे तेजस्वी रूप संपूर्ण सृष्टी उजळून टाकते तसेच एक प्रभावी व्यक्तिमत्व लोकांच्या जीवनातील अंध:कार, नैराश्य दूर करून त्यांच्या जीवनात प्रकाशाची ज्योत निर्माण करू शकते. तर जाणून घेऊ अशाच एका अष्टपैलू व्यक्तीचा धडाडीचा जीवन प्रवास…..
श्री रामचंद्र तुकाराम धुमाळ व आई प्रमिलाताई धुमाळ यांचे सुपुत्र निशिकांत यांचा जन्म १६ जून १९७५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथे झाला.
निशिकांतजींचे प्राथमिक शिक्षण प्रवरा इंग्लिश मीडियम शाळेत झाले. प्रवरा कॉलेज, लोणी (प्रवरानगर) येथून ते भूगोल विषयात बी.ए झाले.
निशिकांतजींच्या वडिलांचा शेतीसाठी लागणाऱ्या मशीन्सचा व्यवसाय होता. पूर्वीपासून ते प्रवचनकार व किर्तनकार देखील होते. त्यामुळे अनेक वेळा निशिकांत यांचा देखील त्यात सहभाग असायचा. त्यांच्या वडिलांची ‘भगवती नाट्य मंदिर’ नामक नाटक कंपनी होती. १९८४ साली स्थापन झालेल्या या नाटक कंपनीत वडील स्वतः लेखन व दिग्दर्शन देखील करत.
“मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” तसे निशिकांत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षांपासून नाटकात काम करू लागले. त्यांनी तीस ते चाळीस नाटकात काम केले. त्याच बरोबर अनेक कार्यक्रमांचे सुत्रसंचलन देखील केले. त्यांचे वक्तृत्व उत्तम असल्याने ते सर्वांमध्ये लोकप्रिय झाले.
शिक्षणाची ध्यास पण घरची परिस्थिती बेताची असल्याने, त्यांना पुढील शिक्षण देणं वडिलांना शक्य नव्हते म्हणून निशिकांत गावावरून पळून पुण्यात आले व आत्याच्या घरी राहिले. अतिशय अस्वच्छ व कोणतीही सोय नसलेल्या परांजपे लॉज वर ते काही काळ रहात होते कारण त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती. परंतु स्वतःला सिद्ध करायचे होते. त्यामुळे हे सर्वच सहन केल्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय नव्हता.१९९५ ते ९७ त्यांनी पुण्यात राहून एम.बी.ए. ची पदवी मिळवली.
त्यांचा हा प्रवास अतिशय खडतर होता. तेव्हा ते शिक्षण व नोकरी अशी दुहेरी कसरत करत. डिलिव्हरी बॉय पासून त्यांनी कामाची सुरुवात केली. ज्यांना आयुष्यात काही करण्याची व मिळवण्याची इच्छा असते ते कधीही कष्टाला घाबरत नाही. त्यांच्यासाठी कोणतेही काम लहान अथवा मोठे नसते हे त्यांच्या उदाहरणावरून स्पष्ट दिसते.
निशिकांत यांनी, संजीवन एंटरप्राइजमध्ये सेल्समनची नोकरी केली. त्यांचे काम पाहून त्यांना बढती मिळून त्यांची मुख्य डिस्ट्रिब्युटर म्हणून नेमणूक करण्यात आली.
१४, डिसेंबर १९९९ रोजी त्यांचे लग्न झाले. त्यामुळे ते पुन्हा गावी गेले व घरचा व्यवसाय सांभाळू लागले. पण त्यात फारसा जम बसत नव्हता म्हणून त्यांनी शिर्डी येथील साईबाबा संस्थानात ९८ रुपये हजेरी ने, चहा लाडू विकायचे काम तीन वर्षे केले.
सप्टेंबर २००२ मध्ये त्यांना मुलगा झाला. आता मुलाच्या भविष्याची चिंता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपण काहीतरी केले पाहिजे, स्वतःचे एक वेगळे विश्व उभारले पाहिजे असे विचार त्यांच्या मनात सतत येत.
मग ते पुन्हा पुण्यात आले व एका प्रिंटिंग प्रेस मध्ये सेल्समन म्हणून काम पाहू लागले. त्यांचे प्रभावी विक्री कौशल्य पाहून मालकांनी त्यांची महाराष्ट्र हेड म्हणून नेमणूक केली. त्यांनी तेथे अडीच वर्षे काम केले.
पुढे एकाच्या ओळखीने वर्ल्ड वाईड इमिग्रेशन कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून त्यांना नोकरी मिळाली. त्यांचे संभाषण कौशल्य, प्रभावी नेतृत्व पाहून त्यांची रिजनल हेड म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यावेळी ते मुंबई व संपूर्ण महाराष्ट्राचे काम पाहू लागले.
निशिकांत यांना आवाजाची दैवी देणगी लाभल्याने, पुण्यातील ‘रसिका तुझ्याच साठी’ या ऑर्केस्ट्रा मध्ये त्यांना निवेदन व गायनाची संधी मिळाली. २००१ साली ‘झाले छत्रपती शिवराय’ या नाटकात शिवाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेसाठी त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार पुण्यात प्रदान करण्यात आला.
२००५ साली आय.सी.आय.सी.आय.बँकेत सुरवातीला सेल्स मॅनेजर व पुढे रिजनल हेड सेल्स ऑफ गोवा आणि महाराष्ट्र अशी मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली व ती त्यांनी अतिशय चिकाटीने, प्रामाणिकपणे व चोख निभावली.
२००५ साली त्यांनी स्वतःचे घर व गाडी घेतली हा त्यांच्या साठी सर्वात आनंदाचा व अविस्मरणीय क्षण होता. एका पळून आलेल्या मुलाने जिद्दीने स्वतःचे वेगळे विश्व उभारले होते.
अनेक वेळा त्यांच्या आयुष्यात खूप मोठे आघात झाले. गावी असलेल्या वडिलोपार्जित शेतीच्या मशिनरी दुकानाला आग लावण्यात आली. घरी दरोडा पडला त्या वेळी आईच्या डोक्यावर कुराडीने वार करण्यात आला ज्यामध्ये आईचा डोळा अक्षरशः बाहेर पडला होता तर बायकोच्या तोंडावर वार झाल्यामुळे दोघीही अनेक महिने दवाखान्यात होत्या.
परमेश्वर जणू निशिकांत यांची परीक्षा घेत होते अनेक वेळा कमावलेले पुन्हा शून्यवर येत होते. पण तरीही त्यांनी हार मानली नाही. येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला त्यांनी धीराने तोंड दिले. न थांबता, न डगमगता संकटाचा सामना केला. कारण त्यांचा विश्वास होता की परमेश्वर त्यांनाच संकटे देतो ज्यांना त्या संकटांशी सामना करण्याचे सामर्थ्य असते. त्यांची सकारात्मक वृत्ती असल्याने त्यांची यशस्वी वाटचाल सुरूच होती.
आय.सी.आय.सी.आय बँकेत त्यांच्या कामावरची निष्ठा, नावीन्य, कौशल्य व उल्लेखनीय कामगिरी पाहून त्यांना ७८ नॅशनल अवॉर्डस व ८३ राज्यस्तरीय पुरस्कार तसेच चार आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. या बँकेत ते बारा वर्षे कार्यरत होते.
सर्व स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी बँकेतील नोकरी सोडण्याचा अतिशय धाडसी निर्णय घेऊन स्वतःची
‘ The Knowledge Park ‘ या कंपनीची २००१ साली स्थापना केली. या कम्पनीच्या कामाला ते पूर्ण वेळ देऊ लागले. या कंपनी द्वारे पुण्यातील अनेक विद्यापीठात समुपदेशक म्हणून ते काम करू लागले. ही कंपनी केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर म्हणजे सिंगापूर, मलेशिया, दुबई, हॉंगकॉंग, श्रीलंका, थायलंड या देशातही समुपदेशनाचे मोलाचे काम करत आहे. महिन्यातून पंधरा दिवस त्यांना परदेशात रहावे लागते.
निशिकांत यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, गुजराती, राजस्थानी, भोजपुरी, पंजाबी या भाषांवर प्रभुत्व आहे.
पण जेव्हा आपण मातृभाषेत संवाद साधतो तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहचू शकतो व त्यांच्या समस्या सोडवू शकतो असे त्यांना वाटते.
उत्तम संभाषण कौशल्य असल्याने ते विविध विषयांवर मार्गदर्शन करत असतात.यात प्रामुख्याने कौटुंबिक कलह, वैवाहिक समस्या, मुलांच्या संदर्भातील शैक्षणिक समस्या, जीवनातील मानसिक ताण तणाव यांचा समावेश आहे. करिअरच्या दृष्टीकोनातून त्यांना विविध क्षेत्रातील सखोल ज्ञान व माहिती असल्याने ते अगदी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देत असतात.
त्यांनी एका जोडप्याची गोष्ट सांगितली जी अगदी सोडचिठ्ठी पर्यंत गेली होती. अनेक वेळा शाब्दिक व शारीरिक भांडण ही होत अगदी पोलीस स्टेशनची पायरी देखील ज्यांनी गाठली होती त्यांना समजून, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व समुपदेशामुळे ते जोडपे गेली सहा वर्षे उत्तम संसार करत आहे. ही केस म्हणजे त्यांच्या साठी एक आव्हान होते कारण सर्वांनी त्यांच्या समोर हात टेकले होते तेथे निशिकांतजीनी अतिशय हुशारीने एका जोडप्याला पुन्हा एकत्र आणले होते.
अशाच एका एकत्रित कुटुंबात ऋणानुबंध कार्यक्रमातून कौटुंबिक कलह, प्रॉपर्टी मुळे भांडण, गैसमज झाले होते त्या सर्वांना समुपदेशामुळे एकत्रित आणून पुन्हा या कुटुंबाला जोडण्याचे पवित्र कार्य त्यांच्या हातून घडले.ज्या वेळी हे भांडण मिटले होते त्यावेळी कुटूंबातील सगळे अक्षरशः गळ्यात गळे घालून रडत होते. अशा अनेक समस्या निशिकांत रोज सोडवून अतिशय मोलाचे काम करत आहेत.
निशिकांत यांनी तबला व गायनाच्या देखील अनेक परीक्षा दिल्या असून त्याही क्षेत्रात नैपुण्य मिळवले आहे. त्यांना वाचनाची खूप आवड आहे. आध्यत्मिक वाचनाकडे त्यांचा कल आहे.त्यांनी अनेक कविता, प्रेरणादायी लेख व गजल देखील लिहिल्या आहेत.
इतकेच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी स्वतःचे एक वेगळे नाव कोरले आहे. स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. समाजातील अनेक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. जसे की भरारी कार्यक्रमामध्ये युवकांना व्यवसाय मार्गदर्शन,
वधूवर व महिला मेळावा, मिशन प्रशासन द्वारे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांची व्यवस्था, सुत्रसंचलन अशा जबाबदाऱ्या ते गेली अनेक वर्षे चोख निभावत आहे.त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतुन समाजात एक आगळावेगळा ठसा उमटवला आहे.
एकाच व्यक्तीमध्ये एवढे सगळे गुण असू शकतात ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे.त्यांनी सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेऊन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या परिवारात, त्यांचे वडील, पत्नी सौ सोनाली असून मोठा मुलगा चैतन्य, हॉटेल मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षाला आहे. लहान मुलगा ओम, अकरावीत असून पुढे सी एस करण्याची त्याची इच्छा आहे.
पत्नीची सुख दुःखात सोबत असल्याने ते यशस्वी होऊ शकले व प्रत्येक संकटावर हिमतीने मात करू शकले असे निशिकांतजी प्रांजलपणे म्हणतात.
निशिकांत यांना युवकांना एकत्रित आणून प्राध्यान्य देण्याचा मानस आहे कारण युवा पिढी हीच खऱ्या अर्थाने देशाची आन, बान व शान असते, त्यामुळे तरुणांना बळकटी देऊनच समाजाची प्रगती होऊ शकते असे त्यांचे मत आहे.
जगामध्ये जगण्यासाठी अनेक गोष्टी आहेत त्यामुळे कोणत्याही अपयशाने खचू नये व आपले आयुष्य संपवू नये असा मोलाचा संदेश ते सर्वांना देऊ इच्छितात. स्वतःवर देखील प्रेम करायला शिकले पाहिजे.यश अपयश या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात ज्या प्रत्येक व्यक्तीच्या वाट्यात येतात.
निशिकांत यांची तेजस्वी झळाळी अशीच पुढेही राहो हीच सदिच्छा व पुढील वाटचालीसाठी त्यांना अनेक शुभेच्छा.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

Nishikant bhau tumhi kharach asthpailu ahatch itkya sankatana tond deun ithprnt pohochn kharch awghd hot pn tari tumhi tyavr mat Keli tumhi yash milvale tumchi ajun khup pragti howo parmeshwar tumchya ajun aslelya ichha purn karo
वा वा निशीकांत तु माणुस म्हणुन व आमचा भाऊ म्हणून अगदी प्रेमळ व माणुसकी जपणारा आहेस च पण तुझ्या तील हे छान अष्टपैलू गुण बघून खुप खुप छान वाटले. तु आमचा भाऊ आहे यांचा जर जास्तच अभिमान वाटला. खुप यशस्वी हो 👍
NewsStoryToday नेहमी प्रमाणे उत्तम लेख खुप छान 👍
Realy great nishikant .apli story yuvkana prernadai v adarah vat ahe .jivnat alelya pratek sanktacha samana karaycha asto har manaychi naste he tumhi siddh kele ahe . Ani sucess dekhil zale ahat .sarv kasar samajla apla abhiman ahe .
Apli ashich pragati vavhi hi prarthna
.
निशिकांत धुमाळ ह्यांचा जीवन प्रवास थक्क करून सोडणारा आहे. त्यांचे कष्ट त्यांची जिद्द सारेच प्रेरणादायी आहे, आणि म्हणूनच आज त्यानी यशाचे शिखर गाठले आहे. खूप शुभेच्छा..