Thursday, December 25, 2025
Homeसाहित्यअष्टपैलू पुलं

अष्टपैलू पुलं

१२ जून, आज महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व पु ल देशपांडे यांचा स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांचे थोडक्यात जीवन दर्शन….

पु ल देशपांडे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ गावदेवी, मुंबई येथे झाला. पुलंचे शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात, तर पुढील शिक्षण फर्ग्युसन आणि विलिंग्डन महाविद्यालयात झाले.

पुलंनी भास्कर संगीतालय येथील दत्तोपंत राजोपाध्याय यांच्याकडून हार्मोनियमचे धडे घेतले. ४० च्या दशकात साहित्य क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते.

वयाच्या १६ व्या वर्षी ‘आजोबा हरले’ या प्रहसनापासून पुलंची लेखन यात्रा चालू झाली. पुढे पूर्वरंग, अपूर्वाईतून त्यांनी प्रवास घडवला, कधी व्यक्ती आणि वल्लीतून अनेकांची भेट घालून दिली, कधी मर्ढेकर-आरती प्रभू-बोरकरांच्या कविता प्रभावी काव्य वाचनातून रसिकांपर्यंत समर्थपणे पोहोचवल्या, बटाट्याच्या चाळीचा फेंरफटका घडवला.

पुलनी एकूण १४ एकांकिका लिहिल्या. ती फुलराणी, तुज आहे तुजपाशी, सुंदर मी होणार अशी उत्तमोत्तम नाटकं लिहिली. नाट्यदिग्दर्शन, अभिनय या क्षेत्रांतही आपला ठसा उमटवला. ‘अंमलदार’ हे पुलंनी रूपांतरित केलेलं पहिलं नाटक. अनुवाद किंवा रूपांतर हा पुलंच्या विविध पैलूंमधला आणखी एक पैलू. इतर भाषिक नाटकांचं रूपांतर करताना त्याचं मराठीकरण मोठ्या कौशल्यानं पुलंनी केलं.

१९४७ साली ‘कुबेर’ या चित्रपटातून पुलंचं पहिलं दर्शन झालं. १९५४ पर्यंत ते चित्रपटात रमले.” वंदे मातरम”,  “दूधभात”, “गुळाचा गणपती” त त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने ते प्रसिद्धीस आले. संवादलेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, गायक, नायक, गीतकार, संगीतकार अशा अनेक भूमिकांमधून चित्रपट क्षेत्रात पुलं वावरले. १९९३ च्या ‘एक होता विदूषक’ मधील त्यांचे संवाद प्रत्येकाला भावले, अभिजाततेचा अनुभव देऊन गेले.

सादरीकरणाचं विलक्षण व हमखास यशस्वी ठरणारं कर्तृत्व पुलंकडे होतं. त्यांचे हावभाव, शब्दफेक, देहबोली, आवाजावरचं नियंत्रण सगळंच विलक्षण आणि लक्ष वेधून घेणारं.

बटाट्याची चाळ, वाऱ्यावरची वरात, असा मी असा मी, या प्रयोगांतून पु. लं. मधले ‘परफॉर्मर’ भेटतात. लेखन असो, वादन असो, गायन असो, नाटक किंवा वक्तृत्व सगळीकडे पुलंचं सादरीकरण थक्क करतं.

महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाजवळचं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु.ल.देशपांडे. सर्वसामान्य मराठी माणसाचं प्रेम, आपुलकी, आदर, त्यांच्याबद्दलचा अभिमान. त्यांच्याबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतील. केवळ लेखक नव्हे, तर बहुआयामी असणारं असं व्यक्तिमत्त्व. निबंध, समीक्षण, नाटक, प्रहसन, एकांकिका, अनुवाद, पटकथा, व्यक्तिचित्रण, चिंतनात्मक लेखन अशा अनेक लेखनप्रकारात त्यांच्या लेखणीने हुकूमत गाजवली. साहित्य, संगीत, नाटक, वक्तृत्व, अभिनय. कलेच्या ज्या ज्या प्रांतात पु.ल. वावरले त्या त्या प्रांताचे ते अनभिषिक्त सम्राट झाले.

अभिनय, एकपात्री अभिनय, हार्मोनियम (संवादिनी) वादन, कथाकथन, स्वत:च्या लेखनाचे सादरीकरण, अभिवाचन, नाट्य व पटकथा लेखन, दिग्दर्शन, काव्यवाचन या प्रत्येक क्षेत्रात पुलंनी अतिशय उच्च दर्जाचे यश प्राप्त केले, अफाट लोकप्रियता मिळवली, आपला श्रेष्ठ दर्जा सिद्ध केला.

चार्ली चॅप्लीन आणि रवींद्रनाथ टागोर या दोन व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव पु. ल. देशपांडे यांच्यावर होता. त्यांना ‘महाराष्ट्राचे वुडहाऊस’ म्हणत असत.

राजकारण हा पुलंचा प्रांत कधीच नव्हता. पण १९७५ च्या आणीबाणीच्या काळात त्यांच्या वक्तृत्वाला व विनोदाला उपहासाची धार आली. पुलंमधला कार्यकर्ता आणीबाणीविरुद्ध लढला.

त्या काळात लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या ‘प्रीझन डायरी’ चा त्यांनी मराठी अनुवाद केला. जनता पक्षासाठी पुलंनी अनेक भाषणं केली.

पुलंच्या साहित्यातून त्यांची अचाट निरीक्षणशक्ती, अनलंकृत प्रवाही संवादात्मक भाषाशैली, मराठी व संस्कृतवरील प्रभुत्व, संदर्भ श्रीमंती, भाषेतली लवचीकता, नावीन्य, भावस्पर्शी लिखाण आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निखळ, निर्व्याज विनोद, कोणालाही न बोचणारा, दुखणारा विनोद या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं असत.

मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पुलंचे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय होते.

दूरदर्शनच्या पहिल्यावहिल्या प्रसारणासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. ते उत्तम संवादिनी वादक होते.

सामाजिक बांधिलकी कृतीशीलतेने मानणाऱ्या पुल व सुनीताबाई यांनी बाबा आमटे, अनिल अवचट, बाबा आढाव, हमीद दलवाई आदी अनेक कार्यकर्त्यांना, सामाजिक संस्थांना, त्यांच्या विविध उपक्रमांना कोणताही गाजावाजा न करता, सहजपणे व सढळतेने सहकार्य केले. पुलंना पुण्यभूषण, पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांसह संगीत नाटक अकादमी पुरस्कार व साहित्य अकादमीचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या कला अकादमीस पुलंचे नाव देण्यात आले आहे.

प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अजरामर स्थान निर्माण केलेल्या पु.ल. देशपांडे यांचे १२ जून २००० रोजी पुणे येथे निधन झाले.

संजीव वेलणकर

– लेखन : संजीव वेलणकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”