आज दिवाळी. लक्ष्मीपूजनाचा दिवस. सहज विचार करता करता, मनात विचार आला की अनेक स्त्रियांची नावे लक्ष्मी अशी असतात किंवा नावात तरी लक्ष्मी हा शब्द असतो. पण खरंच सर्व स्त्रिया आपली नावं सार्थ ठरवू शकतात का ? किंवा त्यांची नावं सार्थ ठरतात का ? नाही तरी मराठीत म्हण आहेच, “नाव लक्ष्मीबाई, हाती कथलाचा वाळा !” असा विचार करता करता मला आठवण आली, नुकत्याच आमच्या अंदमान द्वीपसमूहाच्या सहलीत सहभागी झालेल्या विजयालक्ष्मी यांची ! त्यांनी त्यांचे नाव सार्थ ठरविले आहे, हे त्यांची कथा वाचून आपल्याला देखील पटेल.
अंदमानच्या सहली दरम्यान विजयालक्ष्मी यांचे पिताश्री पंडित शंकरराव वैरागकर यांनी “विजयालक्ष्मी” नाव का ठेवले, हे सहज बोलताना सांगितले की, विजयादशमीच्या दिवशी हीचा जन्म झाला म्हणून आम्ही तिचे नाव विजयालक्ष्मी असे ठेवले. आणि खरोखरच तिच्या जन्मानंतर आमची सतत भरभराट होत राहिली आहे.
तसं पाहिलं तर वैरागकर यांच्या वारकरी घराण्याला संगीताचा वारसा लाभला आहे. मूळचे लातूर जिल्ह्यातील भूकंपाने प्रसिद्ध झालेल्या किल्लारी येथील पंडित शंकरराव वैरागकर गेली ५० हून अधिक वर्षे गायन करीत आहेत. गायनाचे धडे त्यांनी पार कलकत्ता, ग्वाल्हेर, पुणे येथे काही वर्षे राहून गिरवले आहेत. पुढे नाशिक येथे संगीत शिक्षक म्हणून काम करीत असतानाच त्यांनी आवडीपोटी हजारो विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले आहेत आणि अजूनही देत आहेत. दोन मुली, एक मुलगा, नातवंडं असा सर्व वैरागकार परिवार संगीतमय जीवन जगत आहे.
तर आता वळू या, आजच्या आपल्या कथा नायिका विजयालक्ष्मी यांच्याकडे. खरं म्हणजे आमच्या अंदमानच्या सहलीत त्यांना हिंडताना, फिरताना, बागडताना, सहजपणे गाताना पाहून मला वाटलंच नाही की त्या खूप उच्च शिक्षित, अनुभव संपन्न आहेत, म्हणून. जेव्हा त्यांची शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक कारकीर्द, अनुभव, योगदान मला कळाले, तेव्हा मी अवाक झालो! आणि मला एक म्हण आठवली, ती म्हणजे दिसते “तसे नसते म्हणून जग फसते !”
विजयालक्ष्मी यांना संगीताचे बाळकडू घरातूनच वडिल, जेष्ठ सुप्रसिद्ध गायक पं. शंकरराव वैरागकर यांच्याकडून मिळाल्याने “अभिजात शास्त्रीय संगीत” हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य घटक आहे. श्री. जगदेव वैरागकर यांच्याकडे त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले आहे. पण स्वतःला संगीत क्षेत्रापुरतेच मर्यादित न ठेवता त्यांनी उच्च शिक्षण आणि इतर ॲक्टिव्हिटीज वरही लक्ष दिले. त्यांच्या शालेय, महाविद्यालयीन जीवनात, संगीतात अनेक स्पर्धांतून राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाची बक्षिसे त्यांनी मिळविली आहेतच पण विशेष उल्लेखनीय म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या भव्यदिव्य परेड मध्ये त्यांनी १९९६ साली महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. १९९० मध्ये ठाणे येथे दादोजी कोंडदेव मैदानावर आठशे मीटर व बाराशे मीटर अथेलेटीक्स गेम मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू शायनी विल्सन अब्राहम यांच्यासोबत त्यांची स्पर्धा होती. त्यात त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला होता. त्यामुळेच त्या लहानपणापासून उत्तम खेळाडू आहेत. आताही त्या दररोज व्यायाम करतात व मॅराथॉनमध्ये सहभाग घेतात.
संगीत,खेळ, लेखन या बरोबरच विजयालक्ष्मी यांनी उच्च शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. त्यामुळेच एम. ए. (इंग्रजी), एम. ए. (एज्युकेशन) एम. ए. (संगीत ), बी.एड, (संगीत विशारद) या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. इतक्या वरच न थांबता आता त्या ‘पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत : ‘आत्मचिंतनातून प्रकटलेले स्वराविष्कार’ या विषयावर संशोधन करीत आहेत.
विजयालक्ष्मी अनेक वैयक्तिक मैफिलींबरोबरच प्रतिष्ठित मराठी वाद्यवृंदातून गायन करीत असतात. त्यात महत्वाचे म्हणजे गुरुवर्य पद्मश्री भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत ‘भावसरगम’ आणि ‘बंदीश ते भावगीत’ या प्रतिष्ठित कार्यक्रमात त्या गातात. ‘हृदयस्थ गाणी’, ‘चांदण्यात फिरताना’ हा मराठी भावसंगीताचा, तसेच ‘एक श्याम गजल के नाम’, ‘उनसे नैन मिलाकर देखो’, हा उर्दू गझलांचा तसेच ‘कजरा मुहब्बतवाला’, ‘बरसे बुंदिया सावन की’ हा शास्त्रीय संगीतातील बंदिश व त्यावर आधारित फिल्मीगीते, गझलांचा असे वैविध्यपूर्ण संगीतावर आधारीत कार्यक्रम त्या सादर करतात. याची झलक आपल्याला VijayalaxmiManerikar या यु ट्यूब चॅनलवर पहायला मिळेल.
विजयालक्ष्मी यांनी सांगीतिक कारकीर्द करता करता १९९८ पासून सुरुवातीची अकरा वर्षे महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले आहे. या दरम्यान त्यांनी विद्यार्थांसाठी विविध शैक्षणिक प्रयोग करून यशस्वी वाटचाल केली. पण
त्यानंतर सृजनशील नागरिक घडवण्यासाठी आदर्श बाल शिक्षणाची गरज अधिक आहे, हे जाणवल्यावर त्यांनी महाविद्यालयाची सुरक्षित अशी नोकरी सोडून पती शशांक मणेरीकर यांच्या सहकार्याने शिक्षण क्षेत्रात स्वतंत्रपणे काम सुरू केले.एस एम एज्युकेशन फाउंडेशन च्या विश्वस्त, ग्लोबल व्हिजन स्कूल च्या संस्थापक संचालक, ग्लोबल टिचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या संस्थापक, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी “स्माईल नाशिक” या स्वयंसेवी संस्थेच्या ही त्या संस्थापक आहेत.
विजयालक्ष्मी गेली पंधरा वर्षांपासून शालेय शिक्षण क्षेत्रात सातत्याने अनेक वैविध्यपूर्ण अभिनव प्रयोग करीत आहेत. शालेय शिक्षण पद्धतीत (स्वतःच्या शाळेत) बदल घडवणाऱ्या समाजाभिमुख आणि प्रयोगशील शिक्षण देण्याच्या त्यांच्या प्रयोगांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. ही दखल घेऊन त्यांना दिल्ली येथे “जागतिक शालेय शिक्षण परिषदेत” सन्मानित करण्यात आले. तसेच अनेेक जागतिक शिक्षण परिषदांमधून त्यांना सतत व्याख्यानांसाठी आमंत्रित करण्यात येते. ही त्यांची व्याख्याने “अनोखे शैक्षणिक प्रयोग” म्हणून प्रसिद्ध आहेत. दिल्ली येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर स्कूल लीडर्स या संस्थेच्या त्या मानद सदस्य आहेत. शैक्षणिक प्रयोग, सृजनशील पालकत्व, दहावीच्या अभ्यासाचे तंत्र आणि मंत्र, महिला सक्षमीकरण, मुलांशी सुसंवाद अशा शिक्षणाशी निगडित अनेक विषयांवर विविध शहरांमध्ये, शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये त्या पालक, शिक्षक, विद्यार्थांसाठी अविरत मार्गदर्शन करीत असतात तसेच प्रशिक्षण शिबीरे देखील घेत असतात.
विजयालक्ष्मी यांच्या शैक्षणिक प्रयोगांची, उपक्रमांची दखल घेऊन त्यांना नवदुर्गा, समाजरत्न, तेजस्विनी, तेजस, वुमन आयकाँन ऑफ नाशिक, जिजाऊ, नेशन बिल्डर, बेस्ट एज्युकेशनीस्ट अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
संगीत, क्रीडा, शिक्षण या बरोबरच विजयालक्ष्मी लेखनातही सक्रिय आहेत. ‘हृदयरंग’, ‘लागीर’, ‘क्षेमालागी जीव’ हे त्यांचे तीन काव्यसंग्रह दिलीपराज प्रकाशनने तर ‘रानभुलीचे प्रदेश’ , ‘एक घोट मृगजळाचा’ ही ललीत पुस्तके ग्रंथाली ने प्रकाशित केली आहेत. जळगाव येथील सर्वोदय साहित्य मंडळातर्फे उत्कृष्ट काव्यसंग्रह व अखिल भारतीय पत्रकार संघ, पुणे तर्फे उत्कृष्ट मुखपृष्ठाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. शासनमान्य दर्जेदार पुस्तक यादीत ‘हृदयरंग’ या पुस्तकाचा समावेश आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतावर आधारीत “गाणी उलगडताना” हे सदर त्यांनी महाराष्ट्र टाइम्स मध्ये लिहिले होते. या ललीत लेखांचे पुस्तकही ग्रंथालीतर्फे प्रकाशित होत आहे. आपले गुरू पंडित हृदयनाथ मंगेशकर
यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी २६ ऑक्टोबर २०२१ रोजी एक तासाची एक डाॅक्युमेंटरी फिल्मही यु ट्युब वर प्रसिध्द केली आहे.
सामाजिक जाणीव असलेल्या, संवेदनशील मनाच्या विजयालक्ष्मी यांनी नुकतीच दिवाळीनिमित्त नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहास भेट दिली. या भेटीविषयी बोलताना त्या म्हणतात, “नुकतीच मी नाशिकरोड येथील मध्यावर्ती कारागृहात गेले होते. तिथे एक स्वयंसेवी संस्था महिला कैद्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी चालवते. त्यातील तीन छोट्या मुलांच्या आयांनी खून केले होते आणि बाकीच्यांच्या आया चोरी, लूट वगैरे करणाऱ्या होत्या. मी आज पहिल्यांदाच जेलच्या अंतर्भागात गेले होते. तिथे मोबाईल वगैरे काहीही घेऊन जाऊ शकत नाही. मला त्या लोकांशी बोलतानाही भिती वाटत होती. मी त्या सुपरिटेंडेंट मॅडमना उंबरठा चित्रपटाची कथा सांगितली. त्यांनी तो सिनेमा पाहिलेला नव्हता. त्यांना तो चित्रपट पहा असे सांगितले. आजचा प्रसंग फार विचार करायला लावणारा होता. असं वाटलं आपण फार आनंदी आणि सुंदर दुनियेत राहतो. ती लोकं गुन्हेगारीच्या एका वेगळ्याच जगात राहतात !”
विजयालक्ष्मी यांची कन्या दामिनी ही देखील घराण्याचा संगीत वारसा पुढे चालवत असून सध्या लंडन येथे टी संगीत क्षेत्रातील उच्च शिक्षण घेत आहे.
अशा या शिक्षण समुपदेषक, शिक्षण अभ्यासक, खेळाडू, गायिका, लेखिका, कवयित्री अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या धनी विजयालक्ष्मी या “काही करायला वेळच मिळत नाही हो” अशी सतत सबब सांगणाऱ्या व्यक्तींसाठी एक चांगलं उदाहरण आहे.त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
आज दिवाळीनिमित्त एका “विजयालक्ष्मी” चा परिचय झाला, जी खरोखरच संगीतलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि उत्तम गृहलक्ष्मी सुद्धा आहे. अशा एका थोर विदुषीचा परिचय करून दिल्याबद्दल देवेंद्र भुजबळ सरांचे मनःपूर्वक आभार आणि सन्माननीय विजयालक्ष्मी मॅडम ह्यांना विनम्र अभिवादन आणि अभिनंदन 🙏💐
अप्पा वैरागकर यांच्या तीन पिढ्यांच कला कर्तृत्व आणि सामाजिक वैभवाचा लेख फार प्रभावी आहे आणि वैरागकर परिवाराचा अनेकांगी,परिचय सर्वाना आदर्शवत राहील यात शंका नाही. वैरागकर परिवाराबरोबर एन एस टी टीमचं अभिनंदन.
सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.
अगदी यथायोग्य वर्णन❤️🌷