कोळी समाज प्रामुख्याने मासेमारी करीत असल्याने समुद्र किनारी त्यांची वस्ती असते. कोळ्यांच्या या वस्तीला कोळीवाडा असे म्हटले जाते.
नारळी पोर्णिमाला कोळीवाडा उजळून निघतो. कोळी लोकांचे दैवत म्हणजे एकवीरा देवी, खंडोबा येथे ते दरवर्षी भेट देतात. नवस बोलतात. परंतु कोळी लोकांचा उदरनिर्वाह समुद्रावरच अवलंबून असल्याने ते समुद्रालाही आपलं दैवत मानतात. नारळी पोर्णिमाला ते दर्याची मनोभावे पूजा करुन समुद्राला सोन्याचा किंवा साधा नारळ अर्पण करतात.
समुद्रातील वादळाची तसेच आपल्या जीवाची पर्वा न करता किंवा बुडण्याची भिती न बाळगता ते मासेमारीसाठी होडी, बोट यांची पूजा करुनच समुद्रात व्यवसायासाठी उतरतात.
नोकरीच्या निमित्ताने माझा लोकल ट्रेनचा कल्याण ते मुंबई नित्याचा प्रवास होत असे. या प्रवासात मी नेहमी मुंब्रा खाडी, कळवा खाडी, तेथील रेतीबंदर, होड्या पाहायची. ते सर्व निसर्ग सौंदर्य पाहूनच “कोळ्याची पोर” या माझ्या कवितेचा जन्म झाला.
“कोळ्याची पोर” या कविते बरोबरच माझं ही नशीब फळफळलं. २०१८ ला इयत्ता आठवीच्या “सुगम भारती” या पाठ्यपुस्तकासाठी या कवितेची बालभारती पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे यांनी निवड केली.
सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच एका रसिक वाचकाने मला सांगितले या कवितेला ताल, लय आहे तेव्हा या कवितेचे गाण्यात रुपांतर केले तर छान होईल. मी पण मनावर घेतले. संगीतकार मिलींद मोरे यांनी संगीतबद्ध केले आणि सुप्रसिद्ध गायिका शकुंतला जाधव यांच्या आवाजात रेकाँर्डिग झाले. गं बाई मी कोळ्याची पोर.. बघता-बघता सुंदर गाणे तयार झाले !
नारळी पोर्णिमाच्या मुहुर्तावर या गाण्याचा व्हिडीयो करण्याचे मी ठरविले. दिग्दर्शक शिवाजी शिंदेसर, नृत्य दिग्दर्शक संदेश पाटील आणि त्यांचा गृप तसेच छायाचित्रण मनोज घुसळे, विशाल कर्डक आणि संकलन सिद्धांत घुसळे या सर्वांच्या उत्तम सहकार्याने गं बाई मी कोळ्याची पोर… या गाण्याची निर्मिती झाली. सुनिल पाटील यांच्या मदतीने त्यांच्या खाडीकिनारी असलेल्या पिपंलास या गावी शुटिंग पार पडले.
लहान मुलगी जेव्हा तारुण्यात येऊन नववधूच्या रुपात आपल्या समोर उभी राहते तेव्हा आपल्याला विश्वासच वाटत नाही. खरंच का ही आपली छकुली ? अगदी तसंच माझ्या बाबतीत झालं. कोळ्याची पोर ही माझी कविता संगीत, मधुर आवाज त्यावर नृत्य अश्या साज-शृंगाराने नटून जेव्हा एखाद्या नववधूप्रमाणे हे गाणं मी पाहिलं तेव्हा खरंच मला विश्वास बसेना, हिच का माझी कविता ?
या गाण्यातील तेजल कदम हिची अदाकारी, चेहऱ्यावरील हावभाव अप्रतिम झाले आहेत. नृत्यात तिला साथ देणाऱ्या कोमल सातपुते, प्रतिभा शिरसाठ, ऋतुजा जाधव, जोस्ना दरवे भूमिका कदम या सर्वांचे उत्तम नृत्य आहे.
शिवाजी शिंदे यांचा सुंदर अभिनय, वर्षा कळके, राधिका शिवणकर यांची मिळालेली साथ माझ्यासाठी खूप मोलाची आहे. हे गाणे आवडल्यास नक्कीच like करा. share करा. व्हिडीयोलाही जरुर subscribe करा.
या गाण्याच्या निर्मितीसाठी ज्यांनी-ज्यांनी मला सहकार्य केले त्या सर्वांना खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद.
कोळी समाजातील समुद्र किनाऱ्यावरील जीवन म्हणजे रोज समुद्राच्या लाटां प्रमाणे आयुष्यात येणारी संकट आणि त्यावर मात करत संसाराचा गाढा ओढणारी कोळ्याची पोर म्हणजेच कोळी महिलांवरील हे गीत आपणही पाहण्यासाठी उत्सुक असालच तेव्हा सादर करत आहे.. गं बाई मी कोळ्याची पोर….

– लेखन : सुरेखा गावंडे. कवयित्री/लेखिका
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800