Thursday, December 26, 2024
Homeलेख"असले पुरस्कार नको रे बाप्पा !"

“असले पुरस्कार नको रे बाप्पा !”

कुणी मला महान समजो ना समजो, मी मात्र स्वतःला नेहमीच महान समजत आलो आहे. माझा महानपणा लोकांनीही मान्य करावा, अशी माझी साहजिकच अपेक्षा असते. अर्थात माझा महानपणा लोकांनी मान्य करण्याचं प्रतीक म्हणून मला त्यांनी पुरस्कार देणं आलंच. पण हे लोकं ही किती अज्ञ म्हणावे ? कधी कुठल्या पुरस्कारासाठी माझं नाव घ्यायचं नावच घेत नसत. त्यामुळे या लोकांचा मला भयंकर रागही यायचा, कीवही यायची की यांना माझा महानपणा कळत नाही, तर ते तरी बिचारे काय करणार ?

अशातच एके दिवशी एका व्हॉट्स ॲप गृपवर विविध पुरस्कारांसाठी नावे, माहिती पाठवा म्हणून करण्यात आलेले नम्र आवाहन माझ्या वाचनात आले. पुरस्कारांची नावे ही भारी भारी होती, जशी की साहित्य रत्न, समाज रत्न, शिक्षण रत्न, उद्योग रत्न, विकास रत्न, जीवन रत्न….अशा अनेक रत्नांना पुरस्कार दिल्या जाणार होते. आपल्या समाजात इतकी रत्न आहेत हे पाहून मला तर आपला समाज “रत्न सागर” वाटायला लागला ! उगीचच लोकं आपल्या समाजाला काही ना काही कारणांनी नावं ठेवत असतात, असे वाटू लागले.

तर त्या व्हॉट्स ॲप ग्रुप वर दिलेल्या लिंक ला स्पर्श करून, त्यांनी सांगितलेला “रत्न गौरव” ग्रुप मी जॉईन केला. बघतो तर काय, रोज दोन चार रत्नांची माहिती ग्रुप वर येऊन पडत होती. एकेकाची माहिती आणि महती पाहून तर मी अवाक व्हायला लागलो.

खरं म्हणजे, मी सुरुवातीलाच सांगितल्या प्रमाणे मी महान असल्यामुळे लोकांनी मला स्वतःहून पुरस्कार द्यावा अशी माझी माफक अपेक्षा होती. मला पुरस्कार देऊन त्या लोकांचच नाव मोठं झालं असतं. पण ते त्यांना कळलं तर पाहिजे ना ? म्हणून ते देत नसतील तर आपणही इतर रत्नांप्रमाणे या रत्न गौरव ग्रुप वर आपली माहिती पाठवून देऊ, असं ठरवून मी माझी महान माहिती ग्रुप वर टाकून दिली. बघता बघता अंतिम तारीख जवळ येत चालली होती, तशी ग्रुप वरील रत्नांची संख्याही वाढत चालली होती. शेवटी अंतिम तारखे पर्यंत ग्रुप वर २५६ रत्नांची माहिती आलेली होती. आता माहिती स्वीकारली जाणार नाही अशी सक्त ताकीद देऊन, सर्व छाननी करून १५ दिवसांनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी पुरस्कार प्राप्त रत्नांची नावे जाहीर करण्यात येतील अशी माहिती आयोजकांनी ग्रुप वर टाकली.

ग्रुप वर आलेल्या माहितीत कुणी प्राध्यापक होते, कुणी शिक्षक होते, कुणी उद्योजक होते, कुणी सामाजिक कार्यकर्ते होते आणि लेखक, कवी म्हणवून घेणाऱ्यांची तर संख्या मोजायचेच मी सोडून दिले. इतकी विविध प्रकारची रत्ने पाहून आपला समाज “सुजलाम सुफलाम” झालेला आहे, हे पाहून मला आपल्या समाजाचा अभिमान वाटू लागला.

विशेष म्हणजे, केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर पर राज्यातून आणि काही नावे तर परदेशातून आलेली पाहून माझा ऊर अभिमानाने भरून आला. कोण म्हणते, मराठी माणूस मागे आहे म्हणून ? काही लोक उगाचच टवाळकी करतात की, मराठी पाऊल पडते पुढे, कल्याण डोंबिवली कडे…वगैरे. अशा टवाळ लोकांनी जर हा ग्रुप पाहिला असताना तर त्यांना कळाले असते, मराठी समाज म्हणजे रत्नांची खाण आहे ! असो.

तर ग्रुप वरील प्रत्येकाचा दररोजचा प्रत्येक क्षण हूर हूर लावणारा जात होता. रोज सकाळी उठल्या उठल्या प्रत्येक जण आधी ग्रुप वरील स्वतःची माहिती वाचून आपण केलेल्या कॅटेगरीत सर्व श्रेष्ठ आहोत, म्हणून पुरस्कार आपल्यालाच मिळणार याची खूणगाठ मनाशी बांधूनच मोठ्या जोशाने रोजच्या कामाला लागत असे. स्वतःचा अभिमान बाळगत असे.

होता होता एकदाची १५ ऑगस्ट ची सकाळ उगवली. १५ ऑगस्ट हा खरं तर आपला स्वातंत्र्य दिन. पण यंदाच्या स्वातंत्र्य दिना इतकी या आधी कुणीही इतक्या आतुरतेने या पूर्वी या दिनाची वाट पाहिली नव्हती, जितकी या वर्षी पाहिली !

पुरस्काराच्या निमित्ताने का होईना पण सर्व जण पहाटे लवकरच उठले. आपले नाव पुरस्काराच्या यादीत पारोशाने कसे पाहायचे ? म्हणून सर्व जण आंघोळपांघोळ करून तयार झाले. पुरुष मंडळी झब्बे पायजामे घालून तयार झाली. ज्यांच्या कडे लग्नात शिवलेले कोट होते आणि ते त्यांना अजूनही कसे बसे का होईना होत होते, ते त्यांनी अंगावर चढवले. महिला पुरस्कार अर्जदारांनी तर स्वतःची अशी काही सजावट केली की जणू आजच त्यांना पुरस्कार घ्यायला जायचे आहे ! कुणी पैठण्या घातल्या, कुणी कांजीवरम, कुणी सिल्क तर काही साठी सत्तरीच्या महिलांनी त्या तरुण दिसव्यात म्हणून चक्क पंजाबी ड्रेस, जीन पँट, टॉप असा तरुणींना लाजवेल असा पेहराव केला होता.

सकाळचे नऊ वाजले तरी ग्रुप वर नावे काही जाहीर झालीच नाही. आता इतके छान आवरलेच आहे तर ते वाया का जाऊ द्यावे ? या उदात्त हेतूने सोसायटीत होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या झेंडा वंदन कार्यक्रमाला कधी न गेलेले या झेंडा वंदन कार्यक्रमाला मात्र आवर्जून उपस्थित राहिले. दर वर्षी झेंडा वंदन कार्यक्रमाला उपस्थित राहणारे काही बापडे मात्र या नवं देशभक्तांना पाहून विचारातच पडले, कधी २६ जानेवारी, १५ ऑगस्ट ला झेंडा वंदन कार्यक्रमाला न येणारे हे महाभाग या वर्षी कसे काय झेंडा वंदन कार्यक्रमाला आले ? त्या बिचाऱ्या, खऱ्या देश भक्तांना “अंदर की बात” काय माहित ? एकदाचा झेंडा वंदन कार्यक्रम संपला. गरमागरम बटाटेवडे, चटणी, सोबत मिरची खाऊन झाली. मरतुकड्या कागदाच्या कपात चहाही घेऊन झाला. मनात मात्र सारखा मोबाईल मधील “त्या” ग्रुप वर आपले नाव असेल ना ? हाच विचार चालू होता. एकदाचा तो अल्पोपहार ही संपला. सर्व ठीक ठिकाणचे पुरस्कार अर्जदार घरी ही जाण्याच्या भानगडीत न पडता तत्काळ थोडेसे बाजूला झाले आणि हळूच आपला मोबाईल काढून “तो” ग्रुप पाहू लागले. तर काय, त्या ग्रुप वर अजूनही पुरस्कार विजेते यांचे नाव जाहीर झाले नव्हते. हे पाहून मात्र सर्वांचा संयम सुटला. जो तो ग्रुप वर विचारणा करू लागले, की नावे कधी जाहीर करणार ?

लोकांचा संयमाचा बांध सुटत चालला होता. त्यांना शांत करण्यासाठी आयोजक दर एक तासाने लवकरच पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत, म्हणून सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. स्वातंत्र्य दिनी आपल्याला अमुक अमुक रत्न पुरस्कार जाहीर झाल्याचे कधी एकदा फेसबुक वर टाकतो, सर्व व्हॉट्स ॲप ग्रुप्स वर टाकतो, सर्व मित्र मंडळी, नातेवाईक यांना कळवतो आणि आपला महानपणा त्यांना दाखवून देतो, असे प्रत्येकाला झाले होते. आता खोटे कशाला सांगू, त्यात मी ही होतोच. म्हणून तर इतर सर्वांची परिस्थिती समजून घेत होतो.

होता होता, दिवस सरला. रात्र ही सरू लागली. मग मात्र काही लोकांना इतका अमूल्य वेळ आयोजक वाया घालवत आहेत म्हणून धीर धरवेना. काही तर आयोजकांना चक्क शिवीगाळ करू लागले. त्यांची आई बहीण काढू लागले. आपण ज्यांना रत्न समजत होतो, त्यातील काही अशी ही “रत्ने” आहेत, हे पाहून माझ्या मनाला भयंकर यातना होऊ लागल्या ज्यांना आपण रत्न समजत होतो, ते तर सागर गोटे निघत आहेत, हे पाहून मला आपल्या समाजाची मात्र काळजी वाटू लागली. शेवटी ११.५९ झाले आणि आयोजकांनी दिलेला शब्द पाळला. १५ ऑगस्ट म्हणजे १५ ऑगस्ट रोजीच त्यांनी पुरस्कार जाहीर केले. पुरस्कार निवड समितीला सर्वच अर्जदार हे त्यांनी त्यांनी केलेल्या कॅटेगरीत पुरस्कारासाठी योग्य वाटल्याने त्यांना तो तो पुरस्कार जाहीर करून टाकला. माझ्या सारख्या काही महान अर्जदारांची मात्र घोर निराशा झाली कारण निवड झाल्याचे कळवत असताना आयोजकांनी पुरस्कार कार्यक्रमासाठी येणाऱ्या खर्चापोटी आपल्या ऐपती प्रमाणे प्रत्येकी किमान पाच हजार रुपये त्यांनी दिलेल्या बँक खात्यात जमा करण्याची नम्र विनंती केली होती.

एका महिन्याचा तो ग्रुप, त्याच्या माध्यमातून गावोगावच्या होत चाललेल्या रत्नांच्या ओळखी, १५ दिवसांचा तो इंतजार, रोजच्या रोज मनातल्या मनात मारलेल्या उड्या, सर्व लोकांपुढे मिरवायची फुशारकी असं सर्व काही ठरवलेल्या गोष्टींवर त्या नालायक ५ हजार रुपयांनी पाणी फिरवलं. तिथे ५ हजार भरण्याऐवजी त्या ५ हजारात घरातील किराणा माल, लाईट बिल, मोबाईल बिल, मुलांच्या कोचिंग क्लास ची फी असे एक ना अनेक कुठले कुठले खर्च भागवू शकतो याची यादी डोळ्यापुढे चमकायला लागली. शेवटी आपला मध्यमवर्गी विचार करून मी मनातल्या मनात म्हणालो, “असले पुरस्कार नको रे बाप्पा !”
(पूर्व प्रसिद्धी: वर्ल्ड सामना, विनोदी दिवाळी अंक)

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. आजकाल पुरस्कार विकले जातात याची खुमासदार शैलीत उडवलेली खिल्ली.

  2. “असले पुरस्कार नको रे बाप्पा” हा अतिशय खेळकर शैलीतला आणि नर्म विनोदी लेख खूपच मनोरंजक आहे. सध्या पुरस्कारांचे जे पेव फुटलय त्यावर खुसखुशीत शैलीत मस्त टीका केलेली आहे. वाचताना खूप मजा आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments