Thursday, February 6, 2025
Homeसाहित्यअसामान्य शिक्षक, संशोधक : कै. खंडेराव आत्माराम राऊत

असामान्य शिक्षक, संशोधक : कै. खंडेराव आत्माराम राऊत

आपल्या समाजामध्ये अश्या कित्येक असामी असतात की ज्या स्वत: पडद्याआड राहून, कोणत्याही प्रसिद्धीची किंवा पुरस्काराची अपेक्षा न करता अत्यंत साधेपणाने आपले कार्य करत असतात. हे लोक सामान्य असतात पण त्यांनी केलेले काम असामान्य असते. काही तरी भव्यदिव्य करावे असे त्यांच्या गावी देखील नसते. पण त्यांनी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद असते आणि त्यांची महती ही त्यांनी केलेल्या कार्यातूनच पुढे येत असते.

एक अतिशय सामान्य व्यक्ती प्रसिद्धीपरान्मुख राहून किती असामान्य होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे स्नेही कै.खंडेराव आत्माराम राऊत. दिनांक १३ एप्रिल २०२२ या कै. खंडेराव आत्माराम राऊत यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना माझ्याकडून त्रिवार अभिवादन.

१९६२ साली मी लोणावळा येथिल विद्या विनय सभेच्या “गुरुकुल हायस्कूल” या निवासी वसतिगृह शाळेमध्ये नोकरीच्या निमित्ताने दाखल झालो. त्याच साली कै. खंडेराव राऊत हे शिक्षण क्षेत्रातील “बी.एड” या पदवी अभ्यासासाठी मुंबई येथे गेले होते. दिसायला सर्वसाधारणपणे माझ्यासारखेच सडपातळ आणि समवयस्क असल्याने वसतीगृहामधिल प्रत्येकजण त्यांची आठवण काढत असे.

गुरुकुल हायस्कूल ही वसतीगृह शाळा असल्याने बाहेरून नोकरीसाठी आलेल्या शिक्षकांची राहण्याची सोय वसतीगृहामध्येच केली जात असे. कालांतराने मुंबईहुन परत आल्यावर कै. खंडेराव राऊत आणि मी वसतीगृहामध्ये एकत्रीत राहू लागलॊ. कै. खंडेराव राऊत, मी आणि कै. वसुंधरा चंदावरकर यांचा पुतण्या दीपक गंगोळी असे आम्ही तीन जण समवयस्क असल्यामुळे आमच्या तिघांची लगेच गट्टी जमली. वसतीगृहयुक्त शाळेमुळे अनेक कार्यक्रमांचे आयोजन हे शाळेमध्ये करण्यात येत असे आणि शालेय क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके यांनी शाळा नेहमी गजबजलेली असे.

श्री दीपक गंगोळी – सचिव विद्या विनय सभा

कै. खंडेराव हे अतिशय उत्त्साही आणि विविध नविन कल्पना कृतीमध्ये आणणारे होते, दीपक गंगोळी यांना खेळ, साहित्य, नाटके यात विशेष रुची असल्याने आम्हा तिघांच्या एकत्रीत सहभागामुळे शाळेमध्ये नेहमीच कार्यक्रमांची रेलचेल असे. स्थानिक विद्यार्थी  (डे-स्कॉलर) आणि वसतिगृहामध्ये राहणारे विद्यार्थी यांचा २४ तास संपर्क आम्ही वसतिगृहातच रहात असल्याने आमच्याशी असे आणि त्यामळे प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी खेळ, नाट्य स्पर्धा, नृत्य, विज्ञान प्रदर्शने या सर्व उपक्रमांमध्ये शाळा नेहमीच प्रथम स्थानी असे. खेळ आणि नाट्य यामध्ये कै. खंडेराव यांचा मोठा हातभार असे. तसेच विद्यार्थ्यांकडून योग्य त्या प्रकारे भरपुर काम करुन घेण्यामध्ये कै. खंडेराव नेहमीच आघाडीवर असत.

गुरुकुल संस्थेमध्ये ५ वर्ष नोकरी केल्यावर पुढील शिक्षण आणि नोकरी यासाठी मी मुंबई येथे आलो परंतु कै. खंडेराव आणि दीपक गंगोळी यांच्याबरोबर निर्माण झालेले स्नेहबंध आयुष्यभरासाठी कायम अखंड राहीले.

कै.खंडेराव आत्माराम राऊत यांचे जन्मगाव बोर्डी ते कर्मभूमी लोणावळा हा जीवनप्रवास आणि एक सामान्य शिक्षक ते कोणत्याही वशिल्याशिवाय मिळालेले तीन राष्ट्रीय पुरस्कार तसेच त्यांच्या शैक्षणिक कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेलेली दखल यातच त्यांचे यश सामावलेले आहे. दुदैवाने त्यांचे कार्य हे समाजापुढे आले नाही आणि त्यांची महती ही अप्रकाशितच राहिली.

तत्कालीन ठाणे जिल्ह्याच्या अत्यंत नयनरम्य समुद्रकिनारा लाभलेल्या बोर्डी गावातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये २१ ऑगस्ट १९३७ साली जन्मलेल्या कै. खंडेराव आत्माराम राऊत यांचे प्राथमिक व शालेय शिक्षण बोर्डी येथिल सुप्रसिद्ध
“सुनाबाई पेस्तनजी हकिमजी हायस्कूल” येथे १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय सहभाग असणार्या कै. आत्मारामपंत सावे, आचार्य भिसे, चित्रे गुरुजी, श्री.दुगल सर, मदनराव राऊत, एस.आर सावे सर या सारख्या दिग्गज मान्यवर शिक्षक मंडळीच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांचे मामा कै. जगन्नाथ पाटील यांच्या प्रोत्साहनाने मुंबई येथे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि मामांच्या विरार येथिल छोट्या चाळवजा घरी त्यांच्याबरोबर राहून जोगेश्वरी येथील इस्माईल युसुफ महाविद्यालया मध्ये रसायन व भौतिकशास्त्र विषयातिल पदवी संपादन केली. दरम्यानच्या काळामध्ये त्यांचे आदर्श आणि मार्गदर्शक कै. श्री. आदा पाटील यांच्या सहकार्याने मुंबई येथिल राममोहन हायस्कूल येथे शिक्षक म्हणून नोकरीकरीता कै.खंडेराव राऊत रुजू झाले. राममोहन हायस्कूल येथे शिक्षक म्हणून रुजू झाल्याच्या दोनच दिवसानंतर कै. ग. ल. चंदावरकर आणि त्यांच्या अर्धांगिनी कै. वसुंधरा चंदावरकर यांच्या विद्या विनय सभा या संस्थेअंतर्गत नव्याने सुरू केलेल्या गुरुकुल हायस्कुल येथे जाण्यासाठी कै. ग. ल. चंदावरकर यांनी त्यांच्याकडे विचारणा केली आणि तेथुनच कै. खंडेराव राऊत यांच्या शिक्षकी कारकिर्दीचा एक नवा अध्याय सुरू झाला. गुरुकुल हायस्कुल येथे रुजू झाल्यानंतर सुरु झालेल्या प्रवासामध्ये कै.श्री खंडेराव आत्माराम राऊत यांनी यशाची विविध शिखरे पादाक्रांत करत केवळ लोणावळा आणि बोर्डीच नव्हे तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा ठसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवून स्वत:ची ओळख निर्माण केली.

शिक्षण आणि पुढील वाटचाल करत असताना १९६० साली लोणावळा येथे गुरुकुल हायस्कूल मध्ये रुजू झाल्यावर कै. ग.ल.चंदावरकर आणि वसुंधरा चंदावरकर यांच्या मार्गदर्शनाबरोबरच गुरुकुल संस्थेचे जेष्ट सदस्य व मुख्याध्यापक कै.य.ना. बेडेकर, दीपक गंगोळी तसेच कै.गुडिगार सर, कै.अनंत कामत, कै. माधव वाड या सारखे अनेक सहकारी यांच्या साथीने गुरुकुलचे नाव उंचावण्यामध्ये मोठा हातभार कै.श्री खंडेराव राऊत यांचा होता.

अध्यापनाचे काम करीत असतानाच त्यांनी पुणे विद्यापीठामधुन इतिहास या विषयामधुन एम.ए ची पदवी मिळविली. एक अत्यंत शांत परंतु शिस्तप्रिय आणि कडक शिक्षक ही ख्याती मिळवण्यामध्ये त्यांची कामाची पद्धत आणि जिज्ञासू स्वभाव याचा फार मोठा वाटा आहे. गुरुकुल मध्ये शिक्षक म्हणुन रुजू झाल्यापासून ते गुरुकुल संस्थेच्या कार्यकारिणी
सदस्य पदापर्यंत यशाची विविध शिखरे एकामागोमाग पादाक्रांत करत असताना अतिशय साधेपणाने प्रसिद्धीपरान्मुख राहण्याची त्यांची वृत्ती हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.

शालेय स्तरावर एकीकडे भौतिकशास्त्र आणि बीजगणित या विषयांचे अध्यापन करीत असताना विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता त्या जोडीला प्रत्यक्ष कृतीची जोड देता यावी आणि अवघड वाटणार्या संकल्पना सहज सोप्या कशा प्रकारे विद्यार्थ्यांना समजाऊन सांगता येतील या दृष्टिने दैनंदीन अध्यापनाच्या जोडीला एका बाजूला वेगवेगळे शास्त्रीय प्रयॊगही ते करत असत. त्यांच्या प्रयोगांमधुन बनविलेले त्यांचे पार्याच्या वापराशिवाय बॉईलचा सिद्धांत स्पष्ट करणारे उपकरण, तसेच त्यांनी केलेल्या विविध प्रयोगासंबंधीचे लेख, राज्य विज्ञान शिक्षण संस्था – नागपुर यांच्या विज्ञान पुस्तिकेमधिल सातत्याने केलेले लिखाण याचा लाभ असंख्य विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या सहकारी वर्गाने घेतला.

शालेय स्तरावर १९६१ ते १९७९ या कालावधीमध्ये संस्थेच्या “गुरुकुल पत्रिका” या नियतकालिकाचे कार्यकारी संपादन, महाराष्ट्र अध्यापक मंडळाच्या “विज्ञान वार्ता” या नियतकालिकामधे सातत्याने विविध विषयांवर लेखन त्यांनी सातत्याने केले. पुस्तकाबाहेरील शिक्षण या संकल्पनेवर काम करताना विविध प्रदेशांना भेटी देऊन तेथिल लोकजिवन, राहणीमान, संस्कृती आणि विविध प्रेक्षणीय स्थलदर्शन निमित्ताने कै.चंदावरकर तसेच वसुंधरा चंदावरकर यांच्या प्रोत्साहनाने १९६१ ते १९९० या कालावधीमध्ये आंध्रप्रदे, गोवा, दिल्ली, मध्य प्रदेश या सारख्या विविध राज्यांमध्ये शालेय सहली आयोजित करण्यामध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असे. शाळेमध्ये दैनंदिन वार्ताफलक लेखन, विविध विषयांवर शालेय ग्रंथालयामध्ये पुस्तकांची उपलब्धता, वेगवेगळ्या विषयांवर आंतरशालेय निबंध तसेच वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रदर्शने, भित्तीपत्रिका स्पर्धा, नाट्य स्पर्धा, शासनातर्फे आयोजित माध्यमिक शिष्यवृत्ती, विज्ञानमंच, प्रज्ञा शोध परीक्षा अश्या विविध स्पर्धा परीक्षा आणि विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा उस्फुर्त सहभाग वाढविण्याकडे त्यांचे प्रयत्न असत.

शासनातर्फे १९७२-७३ पासून स्विकारण्यात आलेल्या १० + २ या शैक्षणिक अभ्यासक्रमासंदर्भामध्ये गणित आणि विज्ञान या विषयांचे तज्ञ म्हणुन विविध मार्गदर्शनपर कृतिसत्रांमधे, व्याख्यानांमध्ये आणि शिबिरांमधे योगदान देण्याची संधी त्यांना सातत्याने मिळाली. त्यांच्या प्रयोगशील आणि अभ्यासू वृत्तीमुळे त्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळावर परिक्षक – समीक्षक – सहाय्य्क प्रमुख समिक्षक – प्रश्निक – प्रमुख समीक्षक या विविध पदांवर काम करण्याचे भाग्य लाभले. १९७२ साली विज्ञान व गणित विषयांच्या अभ्यासक्रमामध्ये झालेल्या लक्षणीय बदलांनुसार सुरू झालेल्या प्रात्यक्षिक परीक्षांचे महत्त्व लक्षात घेऊन कै. खंडेराव आत्माराम राऊत यांनी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले भौतिकशास्त्र विषयाचे प्रात्यक्षिक स्वाध्याय तक्ते तसेच भुमिती या विषयातिल संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट व्हाव्या या साठी त्यांनी तयार केलेल्या पारदर्शिका व इतर शैक्षणिक साधनांचा वापर ते स्वत: आणि इतर सहकारी शिक्षक सातत्याने करत असत.

इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांचे गणितामधिल पायाभूत ज्ञानाच्या मुल्यमापनासंबंधी लेखन (१९७८ साल), Study of analogy between flow of Water and electricity या संबंधीचे संशोधन हे अतिशय मोलाचे होते.

भौतिकशास्त्रामधील ओहमचा नियम ही संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्टपणे आकलन व्हावी यासाठी त्यांनी बनविलेल्या “दाब – प्रवाह संबंध” या शैक्षणिक उपकरणाची दखल तालुका आणि जिल्हा पातळीवरच नाही तर सातारा येथे भरलेल्या १३ व्या राज्य विज्ञान प्रदर्शनामध्ये घेतली गेली आणि नोव्हेंबर १९८८ मध्ये नेहरू विज्ञान केंद्र – वरळी, मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील पश्चिम भारत विज्ञान मेळाव्यामध्ये सर्वोत्कृष्ट शैक्षणिक उपकरण म्हणुन सदर उपकरणाची निवड होऊन कै.खंडेराव आत्माराम राऊत यांना वैयक्तिक पारितोषिक तसेच महाराष्ट्र राज्यास विषेश गुणवत्ता चषक प्रदान करण्यात आला.

इयत्ता ९वी-१०वी च्या विज्ञान अभ्यासक्रमामधील बॉईलचा सिद्धांत हा प्रयोग केवळ त्यात वापरण्यात येणार्या पार्याच्या अनुपल्ब्धतेमुळे शाळेमध्ये शिकविण्याचे टाळले जाते. कै.खंडेराव राऊत यांनी यावर संशोधन करून तयार केलेल्या “पार्याविना बॉइलचा सिद्धांत ” या पाण्याचा वापर करून तयार केलेल्या नाविन्यपूर्ण उपकरणाची दखल देखील फेब्रुवारी १९९२ साली यवतमाळ येथे भरलेल्या १७व्या राज्य विज्ञान प्रदर्शनामध्ये घेण्यात आली.

कै. खंडेराव राऊत यांच्या संशोधक आणि अभ्यासू स्वभावाची दखल लोणावळाच नव्हे तर मावळ तालुका व पुणे जिल्ह्यामधिल लायन्स क्लब, रोटरी क्लब , टाटा मुलभूत शिक्षण संस्था तसेच राज्य शिक्षण संस्था – पुणे या सारख्या अनेक विविध नावाजलेल्या संस्थांनी घेतली . त्याचीच फलश्रुती म्हणून एप्रिल १९९२ मध्ये मॉरिशस , व्हिएतनाम , केनिया ,युगांडा , घाना , कंबोडीया, झांबिया , बोत्स्वाना , आर्वांडा या ९ विकसनशील राष्ट्रांमधील १५ शिक्षण तज्ञांनी केंद्र सरकारचे अधिकारी व युनेस्कोचे शिक्षण विषयक सल्लागार डॉ.के.जी.वीरमणी यांच्या नेत्तृत्वाखाली आपल्या देशाला दिलेल्या भेटीमध्ये संपुर्ण महाराष्ट्रामधुन “शालेय शिक्षण भेट” या अंतर्गत भारतातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून सुधारण सुचविण्यासाठी गुरुकुल हायस्कुलची निवड केली . राष्ट्रीय स्तरावरील १९९३ साली पार पडलेल्या पश्चिम भारत विज्ञान मेळाव्यामध्ये कै. खंडेराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विद्यार्थी व एक शिक्षक यांनी तयार केलेल्या ” गॅसोलिन प्लॅंट ” या प्रकल्पास सहा राज्यामधुन प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात आले .
याबद्दल सहभागी विद्यार्थ्यांना इतर पारितोषिकांसोबतच कलकत्ता येथिल नॅशनल म्युझीयमच्या वतीने शिष्यवृत्ती व शाळेला डॉ.होमी भाभा चषक प्रदान करण्यात आला.

गुरुकुल हायस्कुल येथे कार्यरत असताना लोणावळा शहर तसेच आसपासच्या परिसरामध्ये असणार्या अनेक संस्था व मान्यवर यांच्याशी कै. खंडेराव राऊत यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले . एक साधा व मितभाषी परंतु शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आसपासच्या परिसरामध्ये होती . लोणावळाच नव्हे तर मावळ तालुका व पुणे जिल्ह्यामधील अनेक शैक्षणिक संस्थांशी त्यांचे संबंध अनेक शैक्षणिक उपक्रम , गणित व विज्ञान विषयावरील व्याख्याने या निमित्ताने सलोख्याचे होते. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन पुणे जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणार्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सप्टेंबर १९८८ साली कै. खंडेराव राऊत यांची निवड झाली . लोणावळा नगर परिषद , रोटरी क्लब , लायन्स क्लब , पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ या सारख्या अनेक संस्थांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा वेळोवेळी केलेला सन्मान आणि आजतागायत लोणावळाच नव्हे तर संपूर्ण मावळ तालुका व पुणे जिल्हा यामध्ये कै.खंडेराव राऊत यांचे आदराने घेतले जाणारे नाव यातच त्यांच्या कार्याची पावती दडलेली आहे.

विद्या विनय सभा या संस्थेच्या कार्यकारीणी मध्ये , पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचा सक्रिय सदस्य , मावळ तालुका मुख्याध्यापक मंच याचे उपाध्यक्षपद असो किंवा पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे सदस्यत्व या सर्वांद्वारे त्यांनी केलेले अध्यापनचे आणि इतर संबंधित कार्य याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने त्यांची निवड शिक्षक पुरस्कारासाठी करून तशी शिफारस राष्ट्रीय शिक्षक आयोगाकडे केली.

विद्या विनय सभा तर्फे सत्कार

“मानव संसाधन विकास” मंत्रालयाच्या शिक्षण विभागामार्फत देण्यात येणार्या सर्वोच्च राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचा मान कै.खंडेराव आत्माराम राऊत यांना प्राप्त झाला. दि.५ सप्टेंबर १९९४ रोजी राष्ट्रपती कै.शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनामध्ये पार पडलेल्या विशेष समारंभामध्ये कै.खंडेराव आत्माराम राऊत यांचा केला गेलेला सत्कार ही एका सर्वसामान्यांमधिल असामान्य व्यक्तीमत्वाला मिळालेली पावती ठरली .

लोणावळ्यासारख्या छोट्या शहरामध्ये स्वत:च्या कर्तृत्वाने स्वत:चे अस्तित्व निर्माण करून त्याची व्याप्ती राष्ट्रीय पातळीवर पोहचविण्यामागे कै.खंडेराव राऊत यांचे वडिल कै.आत्माराम के.राऊत आणि त्यांचे मामा कै. जगन्नाथ पाटील यांचा वाटाही महत्वाचा आहे. गरीब परिस्थितिमध्येही शिक्षण पुर्ण करण्यासाठी त्यांचा मिळालेला पाठींबा अणि प्रोत्साहान हा कै.श्री खंडेराव राऊत यांच्या यशस्वी कारकिर्दीचा एक पैलू ठरावा .
गु्रुकुल हायस्कुल मधुन शाळेच्या मुख्याध्यापक पदावरुन निवृत्त झाल्यावर जन्मगाव बोर्डी येथे जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा त्यांचा संकल्प पुर्ण होण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांचे स्वप्न अधुरेच राहीले.

कै.खंडेराव राऊत यांचे जेष्ठ बधू कै.श्री.मदन आ. राऊत हे राज्य शासनाच्या शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित , राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री.प्रभाकर आ. राऊत हे त्यांचे बंधू शिक्षण क्षॆत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचे कनिष्ट बंधू श्री.निरंजन आ. राऊत हे महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी म्हणुन निवृत्त असून जिल्ह्यात सन्माननिय जेष्ठ माध्यमकर्मी म्हणुन ख्यातीप्राप्त आहेत. त्यांची कन्या स्वाती “पॅकेजिंग टेक्नॉलॉजी” या वेगळ्या क्षेत्रातील उच्च विद्याविभुषित असून पुत्र नितांत हे संगणक प्रणाली तसेच निसर्ग व वन्यप्राणी छायाचित्रण क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत . त्यांची नात “वेदांती” कला क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहे . राऊत कुटूंबियांच्या परिवारातील पुढील पिढी ही उच्च विद्याविभुषित असून वैद्यकीय , संगणक , अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. कुटुंबामधिल दोन सुना या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत . त्यांच्या सहचारिणी विजया खंडेराव राऊत यांचा त्यांना मिळालेला पाठींबा आणि साथ या सर्वामुळे त्यांना मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हा अतिशय महत्त्वाचा आहे.

दुर्दैवाने कै.खंडेराव राऊत यांच्या शैक्षणिक कार्याचा तसेच त्यांनी केलेल्या विविध प्रयोगांचा बोलबाला हा फक्त त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित वर्तुळामध्येच राहिला आणि समाजामध्ये त्यांचा कार्याची दखल घेतली गेली नाही . एका सर्वसामान्य शेतकरी कुटूंबामधुन स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करून राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार मिळवुनही अनाम राहीलेल्या कै.खंडेराव राऊत यांच्या विषयी म्हणुनच कवी कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी चपखल बसतात ….

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !

शंकर मोदगेकर

– लेखन : शंकर मोदगेकर.
जेष्ठ कलाकार व माजी कला शिक्षक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी