कल्याण येथील नूतन ज्ञान मंदिर शाळेत विद्यार्थ्यांसाठी नेहमीच अभिनव उपक्रम आयोजित करण्यात येतात.
याच उपक्रमाचा भाग म्हणून या शाळेत दिवाळीनिमित्त “दीपयोग” या कार्यानुभव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेची सांगता दीपोत्सवाने झाली.
दीपयोग या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते आठवीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
कार्यशाळेची सुरुवात दिनांक 17 ऑक्टोबर पासून झाली. कला आणि कार्यानुभव विषयांतर्गत आकाश कंदील, भेटकार्ड तयार करण्यात आले. या कार्यशाळेत सौ तृप्ती परदेशी, सौ भामरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेनुसार मोठ्या उत्साहाने सुंदर आकाश कंदील, आकर्षक भेट कार्ड तयार केली. दिवाळीच्या अभ्यंग स्नानासाठी आयुर्वेदिक उटणे ही तयार केले.
या कार्यशाळेत सौ गाडगे, सौ भामरे यांनी विद्यार्थ्यांना उटण्याचे महत्त्व पटवून दिले. त्याचप्रमाणे औषधी वनस्पतींविषयी माहिती सांगितली.
अक्षरलेखन कार्यशाळेस सौ मोटघरे, श्री प्रधान, सौ वाबळे यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना विविध प्रकारे अक्षरलेखन शिकवले. विद्यार्थ्यांनी विविध पद्धतीने अक्षरे लिहिली.
रंग, रंगांचे महत्त्व व त्यांची ओळख, रंग संगती, रंगचक्र ही कार्यशाळा श्री मोटघरे , सौ वाबळे यांनी घेतली आणि मुलांना रंगाच्या विषयी अधिक माहिती दिली.
विविध प्रकारचे मुखवटे तयार करण्यासाठीचे मार्गदर्शन सौ झगडे, श्री चव्हाण, श्री गवळे यांनी केले. यामध्ये गणपतीचे मुखवटे, कार्टून्सचे मुखवटे तसेच विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीनुसार त्यांनी विविध मुखवटे तयार केले.
दीपयोग कार्यशाळेची संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गागरे मॅडम यांची होती. ती प्रत्यक्षात आणण्याचे कार्य कार्यानुभव प्रमुख सौ भामरे व सौ झगडे यांनी केले. त्याचप्रमाणे सांस्कृतिक प्रमुख सौ वसावे, कुमारी सावंत यांचाही कार्यशाळा आयोजनात मोलाचा वाटा होता.
ही कार्यशाळा म्हणजे उत्सवाची आणि उत्साहाची मांदियाळी होती. या कार्यशाळेचा उद्देश सृजन निर्मिती करणे, विद्यार्थ्यांच्या अंगीकृत असलेल्या कलागुणांना वाव देणे तसेच विद्यार्थ्यांना सामूहिक कृती चे महत्व पटवून देणे हा होता. या कार्यशाळेत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीही सहभागी झाले होते.
अतिशय आनंदात ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेची सांगता दीपोत्सवाने झाली. नूतन ज्ञानमंदिर या शाळेस 38 वर्षाची दीपोत्सवाची अखंड परंपरा आहे. यावर्षी शाळेची सजावट, विद्यार्थ्यांनी कार्यानुभव अंतर्गत तयार केलेले आकाश कंदील, पणत्या तसेच रांगोळी, मुखवटे दीपावलीची भेटकार्ड वापरून केली.
दीपोत्सवास छत्रपती शिक्षण मंडळाचे पदाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गागरे, उपमुख्याध्यापक श्री निकुम, पर्यवेक्षक श्री भामरे, पालक शिक्षण संघाचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी पालक यांची उपस्थिती होती. शाळेत असंख्य दिव्यांची आरास करून शालेय परिसर प्रकाशमान झाला होता. पणत्यांच्या प्रकाशात संपूर्ण शाळा व शालेय परिसर उजळून निघाला होता.
पणती म्हणजे प्रकाश सात्विकतेचे प्रतीक नवीन आशा अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा ज्ञानदीप असा हा दीपोत्सव दिवाळीच्या पूर्वसंध्येला सुरेल संगीताच्या सुरांनी साजरा केला गेला.

– लेखन : आस
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800