मूळ इंग्रजी ‘बिग बॉस’ आधी हिंदीत आणि नंतर मराठी घराघरांमध्ये पोहोचला आणि एक नवीनच रियालिटी शो सुरू झाला.
या बिग बॉस चे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत जरब युक्त भाषेत आदेश देणारा बिग बॉस चा आवाज ! हा आवाज कुणाचा आहे, याची माझ्या सारखीच हजारो, लाखो लोकांना उस्तुकता होती आणि आता आताच कळले, हा आवाज तर आपल्या रत्नाकर तारदाळकर याचा आहे !
दूरदर्शन वृत्त निवेदक, माहिती पट निर्माता, हजारो ठिकाणी आवाज देणारा रत्नाकर चा ‘बिग बॉस’ मधील आवाज आम्ही मित्र मंडळी सुद्धा ओळखू शकलो नाही, इतका तो त्याने स्वतंत्र शैलीत सादर केला.अशा या हरहुन्नरी रत्नाकर ने नुकताच एक अभिनव प्रयोग सादर केला तो म्हणजे, “नवा गडी नवं राज्य”!
मुंबईतील विले पार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या शताब्दी वर्ष महोत्सवा निमित्त या संस्थेच्या इंदिरा तिनईकर युवा मंचाने सादर केलेल्या ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात ‘बिग बॉस’ ह्या लोकप्रिय रियालिटी शो मधील सेलिब्रिटी उषा नाडकर्णी, रेशम टिपणीस, मेघा धाडे, आस्ताद काळे, अभिजीत केळकर, नेहा शितोळे आणि खुद्द बिग बॉस म्हणजे खुद्द रत्नाकर तारदाळकर आले होते ….
रत्नाकरचीच संकल्पना असलेल्या ह्या कार्यक्रमात ह्या सगळ्या मंडळींनी दोन सव्वा दोन तास पहिल्या दोन सीजन च्या पडद्यामागच्या गमतीजमती सांगितल्या.
प्रेक्षक म्हणून आपल्याला निव्वळ १०% भाग माहीत असतो. पण बिग बॉस ह्या संकल्पनेची निर्मितीमूल्ये काय आहेत, १८ विविध भाषामध्ये हि मालिका का प्रसिद्ध आहे, ह्याची प्रोसेस काय असते, इथपासून निवड प्रक्रिया, ताण आणणारे काम, २४ तास सतत कॅमेरे, त्यानंतर टास्क, आवडीनिवडी, शिस्त, बाहेरच्या जगाशी तुटलेलं नातं अश्या सगळ्यांमधून वाट काढताना होणारा प्रवास, येणाऱ्या अडचणी, त्यावर मात करण्याचं सामर्थ्य आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ह्याला लागणारी मानसिक तयारी आणि मानसिकता अश्या अनेक विषयांवर ह्या मंडळींनी त्यांचे अनुभव दिलखुलास पणे सांगितले.
कार्यक्रमाला उशिरा पोहोचलेल्या आस्ताद ला बिग बॉस ने गाणं गायची शिक्षा दिली आणि ती त्याने आनंदाने स्वीकारून बहारदार गाणे गाऊन उपस्थितांची मने जिंकली. उषा नाडकर्णी यांनी सादर केलेला पदन्यास ही सर्वांची दाद मिळवून गेला. कन्फेशन बॉक्स, टास्क, नियमबद्धता, काटेकोरपणा, धाक, नाच, गाणं, शिक्षा अश्या सगळ्या गोष्टींमुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. कलाकारांना संघातर्फे त्रिमूर्तीची फ्रेम आणि कार्यक्रमाचे गिफ्ट पार्टनर Shaku’s तर्फे गिफ्ट्स देण्यात आली.
ह्या कार्यक्रमाची विडिओ लिंक लवकरच देण्यात येईल.
उपस्थित सर्व प्रेक्षकांना सर्वकाही विसरून आपणच काही काळ बिग बॉसच्या घरात असल्याचा फिल या कार्यक्रमाने दिला, हे या कार्यक्रमाचे मोठेच यश होय.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800