भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती विविध उपक्रमांचा समावेश असलेली “शैक्षणिक भीमजयंती” म्हणून साजरी केली जाणार असून या जयंतीनिमित्त समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण, गरजू विद्यार्थी दत्तक घेणे, अभ्यासिका सुरु करणे, तसेच शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था संघटनांना पुरस्कार देऊन गौरव करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती महामानव प्रतिष्ठानचे अध्यक्ष, एक वही, एक पेन अभियानचे प्रणेते व राज्य शासनाचा समाजभूषण पुरस्कार प्राप्त, पत्रकार राजू झनके यांनी नुकतीच दिली आहे .
ही जयंती सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक मनोरंजन, तसेच सार्वजनिक मिरवणुक माध्यमातून आदी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत असते . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिक्षणाचा मूल मंत्र दिला. त्यांनी स्वतः प्रचंड शिक्षण घेतले, देशाला दिशादर्शक ठरणारी अनेक विषयांवरील पुस्तके देशाला दिली. जगातील सर्वाधिक विद्वान व्यक्ती म्हणून कोलंबिया विद्यापीठात त्यांचा पुतळा आहे. पुस्तकांसाठी घर बांधणारे ते जगातील एकमेव व्यक्ती होते. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणावरील प्रेम लक्षात घेता आंबेडकरप्रेमी संस्था, मंडळे आणि संघटनांनी त्यांची जयंती “शैक्षणिक भीमजयंती” म्हणून साजरी करावी तसेच जनतेने समाजातील गरजूंना वह्या, पेन, पुस्तके व शैक्षणिक वस्तूंचे वितरण करावे असे आवाहन झनके यांनी केले आहे.
महामानव प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील नऊ वर्षांपासून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना एक वही, एक पेन अभियान या उपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वितरण करून शैक्षणिक भीमजयंती साजरी केली जाते. १४ एप्रिल ते १४ मे असे महिनाभर हे विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तसेच सहकार्य करण्यासाठी ९२७२३४३१०८ या क्रमांकावर किंवा zankeraju@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800