ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा……
अशी भोंडल्याची अनेक गाणी गात, छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण संचलित,नूतन ज्ञान मंदिर कल्याण (पूर्व) या शाळेमध्ये भोंडल्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
आपले सण, उत्सव व परंपरा या पुढच्या पिढीला माहीत असाव्यात त्या विषयीचे ज्ञान अवगत व्हावे यासाठी दरवर्षी या शाळेत भोंडला हा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येतो. शाळेत हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पार पाडतो. या सणांमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थिनी सहभागी होतात व भोंडल्याचा आनंद लुटतात.
“अडकित जाऊ बाई खिडकीत जाऊ
खिडकीत होता बत्ता आमचा भोंडला आत्ता”
असे म्हणत म्हणत विद्यार्थिनी फेर धरतात.
भोंडला किंवा भुलाबाई किंवा हातगा हा महाराष्ट्रातील स्त्रियांचा उत्सव आहे.यामध्ये किशोरवयीन मुलींचा सहभाग मोठा असतो. महाराष्ट्रातील विविध भागात वेगवेगळ्या नावाने जरी तो खेळला जात असला तरी मूळ संकल्पना सारखीच आहे असा हा नवरात्र उत्सवातील भोंडला.
अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेला नवरात्र उत्सव सुरू होतो. अश्विन महिन्यात सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करतो. हस्त नक्षत्राला सुरुवात झाली की भोंडल्याला सुरुवात होते. पाटावर हत्तीचे चित्रं काढून त्याची विधिवत पूजा केली जाते. हस्त नक्षत्राचे प्रतीक म्हणून हत्तीची पूजा केली जाते. आणि त्या भोवती फेर धरून निरनिराळी लोकगीते गायली भोंडल्याची गाणी गायली जातात. हत्ती किंवा हस्त हा या दिनाचा राजा असतो हत्ती मेघांचे सुख समृद्धी याचे प्रतीक मानले जाते, तसेच तो जलतत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो.
पूर्वीच्या काळी महिलांना विरंगुळा म्हणून भोंडला खेळला जाईल त्या निमित्ताने साऱ्याजणी एकत्र येत आणि सुखदुःखाची देवाण-घेवाण करत. नेहमीच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी नातेसंबंध दृढ करण्यासाठी याची मदत होते. या निमित्ताने जुन्या इतिहास संस्कृती आणि परंपरेचे दर्शन पुढच्या पिढीला घडावे घडते भोंडला हा केवळ मनोरंजनाचा नाही तर कृतज्ञता व्यक्त करण्याचा खेळ आहे कारण नवरात्रीनंतर पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते शिवाय हत्ती हे पावसाचे प्रतीक मांडले जाते. पावसाच्या कृपेने धरती माता समृद्ध झालेली असते. पीक पाणी भरपूर आलेले असते. या पावसाची पावसाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भोंडला खेळला जातो.
दुर्गाबाई भागवतांच्या मतानुसार भोंडल्याची गाणी ही अस्सल लोकगीतांचा नमुना आहे. अत्यंत साधी, साध्या सालीची आणि मौखिक परंपरा जोपासणारी ही गाणी आहेत.
शाळेतील विद्यार्थिनींना आपले पारंपारिक खेळ तसेच उत्सव रूढी परंपरा संस्कृती याची ओळख होऊन ती पुढे टिकून राहावी यासाठी शाळेमध्ये अशा प्रकारच्या उत्सवांचे खेळांचे आयोजन केले जाते. विद्यार्थिनी वर्षभर भोंडल्याची वाट पाहत असतात. जरी एका शाळेमध्ये विद्यार्थिनी शिकत असल्या तरी सुद्धा आपला वर्ग सोडून इतर विद्यार्थिनींची फारशी ओळख नसते. या भोंडल्याच्या निमित्ताने शाळेच्या पटांगणावर पूर्ण शाळेतील विद्यार्थिनी एकत्र येतात. मध्यभागी हत्तीचे मोठे फळ्यावर चित्र काढले जाते. त्या भोवती रांगोळी आणि फुलांची सजावट केली जाते. लहान शाळेच्या मुख्याध्यापिका सो गागरे मॅडम या हत्तीच्या प्रतिमेची विधिवत पूजा करतात. त्याचप्रमाणे कुमारीका पूजनही सर्व शिक्षिका मिळून या दिवशी करतात. भोंडल्याची गाणी तसेच पारंपारिक गीते यावेळी गायली जातात आणि फेर धरून विविध खेळ तसेच गरबा या दिवशी खेळला जातो.
शाळेच्या पटांगणावर उत्साहाचे वातावरण निर्माण होते. यामुळे विद्यार्थिनीचा एकमेकीशी परिचय होतो आणि एकीची भावना निर्माण होते. जाती धर्म विसरून खेळीमिळीने या विद्यार्थिनी हा भोंडला व गरबा खेळतात. विद्यार्थी ही यात सहभागी होतात. अशा प्रकारचे उत्सव सण साजरे करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ काकडे मॅडम या सतत शिक्षकांना प्रोत्साहित करत असतात. तसेच मोलाचे मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे शाळेत अशा प्रकारचे आपल्या रूढी परंपरा संस्कृती टिकवण्याचे काम शाळा ही अविरतपणे करत आहे.
सांस्कृतिक समितीच्या सौ ममता वसावे तसेच कुमारी अस्मिता सावंत यांच्या पूर्वनियोजनामुळे शाळेच्या पटांगणावरील भोंडला हा सुंदर प्रकारे पार पडला. शाळेचे उपमुख्याध्यापक श्री निकुम सर, पर्यवेक्षक श्री भामरे उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहभागामुळे
भोंडला आनंदात व उत्साहात पार पडला.
‘या देवी सर्व भूतेषु शक्ति रूपेण संस्थिता।
नम: तस्यै, नम: तस्यै नम: तस्यै नमो नम:॥’

– लेखन : आस. कल्याण (पू)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800