सुप्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि सजग विचारवंत प्रा. विमलताई गाडेकर यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त ‘विमल दिवस-4’ हा बहुरंगी सांस्कृतिक सोहळा मुंबई विद्यापीठाच्या कवी कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य भवन येथे मोठ्या श्रद्धेने नुकताच संपन्न झाला.
या निमित्ताने राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर लिखित अभिजात नाटक ‘रश्मिरथी’ चे दमदार सादरीकरण प्रसिद्ध नाट्यकलावंत हरीश हरीऔध यांनी केले.

तर लेखिका अर्चना शंभरकर यांच्या ‘सरिनास स्टोरी बोर्ड’ या हिंदी कथा संग्रहाचे ज्येष्ठ अभिनेते तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील जेठालाल ची भूमिका करणारे दिलीप जोशी तथा पत्रकार पोपटलाल यांची भूमिका करणारे सुप्रसिद्ध अभिनेते श्याम पाठक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी डॉ मंगेश बन्सोड, प्राध्यापक, मुंबई विद्यापीठ नाट्य विभाग आणि डॉ सुंदर राजदीप, मुंबई विद्यापीठ संज्ञापन व पत्रकारिता विभाग प्रमुख यांनी विमल गाडेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

नाट्य, साहित्य आणि विचारांचा मिलाफ : कार्यक्रमात ‘रश्मिरथी’ नाटकाच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. महाभारताच्या पार्श्वभूमीवर समाजस्थितीचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या या नाटकाने प्रभावी अभिनय, चैतन्यपूर्ण सादरीकरण आणि नेत्रदीपक प्रकाशयोजनेमुळे रसिकांची दाद मिळवली. या प्रस्तुतीकरणात प्रकाश योजना आणि संगित सिने लेखक तथा दिग्दर्शक आशिष कुळकर्णी यांनी सांभाळले होते. तसेच, ‘सरिनास स्टोरी बोर्ड’ या कथा संग्रहाच्या लोकार्पणाने साहित्य रसिकांना एका नव्या साहित्यिक प्रवासाची ओळख करून दिली. सरिनास या पुस्तकाच्या नावात उल्लेख असलेल्या स्मिता, अर्पणा, रुपा, इंद्राणी, निवेदिता आणि स्वाती यांनी या पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या.

स्मृती जागवणारा सोहळा : मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभाग आणि विमलताई गाडेकर स्मृती सोहळा समितीच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी विद्यापीठाचे प्राध्यापक, साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, उच्चपदस्थ अधिकारी आणि सिनेसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते.
प्रा. विमलताई गाडेकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या ध्वनीचित्रफितीचे प्रदर्शन करण्यात आले.

याशिवाय, नव्या पिढीतील प्रतिभावान व्यक्तींना ‘विमलताईंचा अभिमान- गौरवोल्लेख सन्मान’ प्रदान करण्यात आला. या वर्षी पीएचडी डिग्री घेतल्याबद्दल डॉ. प्रणोती सोनुले, स्त्रीरोग तज्ञ डॉ. अप्रतिम शंभरकर, आय आय एम मुंबई चे स्नातक सम्यक गाडेकर, आयआयएम स्नातक तथा एल एन टी या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत असलेली साक्षी डंबेरे आणि अभिनय आणि नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सखी बोरकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
आपल्या कार्याने समाजात ओळख निर्माण करणाऱ्या वैद्यक व साहित्यिक डॉ स्मिता दातार, प्रख्यात सिने अभिनेत्री श्रीमंती आशा शेलार, प्रख्यात सिने अभिनेते कांचन पगारे.
स्टार प्रवाह दूरचित्र वाहिनी चे नरेंद्र मुधोळकर. यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.

विमल दिवसाची परंपरा : गेल्या चार वर्षांपासून विमल दिवस विविध ठिकाणी मोठ्या आदरभावाने साजरा केला जात आहे. प्रथम स्मृती दिनी चंद्रपूर येथे त्यांच्या अप्रकाशित साहित्याचे प्रकाशन करण्यात आले होते. द्वितीय स्मृती दिनी मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिरात ‘चंदनी दरवळ’ या अभिनाट्याचे सादरीकरण झाले. तृतीय स्मृती दिनी चित्रपट आणि साहित्यातील संवादासह ‘विमल दिवस-2024’ चे आयोजन करण्यात आले होते.
विमलताईं विषयी : प्रा. विमलताई गाडेकर या चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयात समाजशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. त्यांनी अनेक कविता संग्रह आणि कथा संग्रह प्रकाशित केले असून, त्यांच्या साहित्यावर पीएचडीच्या संशोधनाला मान्यता मिळाली आहे. आंबेडकरी साहित्य क्षेत्रात त्यांच्या योगदानाला मान्यता असून, त्यांनी महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भोपाळ येथिल वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत गाडेकर, अर्गोक्युअर या संस्थेच्या संचालक डॉ. मोना पंकज उके, ज्येष्ठ सिने कलाकार जयंत गाडेकर आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रभारी उपसंचालक अर्चना शंभरकर यांनी विशेष मेहनत घेतली.
‘विमल दिवस-4’ ने पुन्हा एकदा प्रा. विमलताई गाडेकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
विमलताई यांना आदरांजली
त्यांची प्रेरणा टिकवण्यासाठी केलेल्या कार्यक्रमांची प्रशंसा..सर्व पुरस्कार विजेते यांचे अभिनंदन