९६ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे आजपासून सुरु झाले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचा हा अल्प जीवन परिचय.
या संमेलनास आपल्या पोर्टल तर्फे हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
न्या. नरेंद्र चपळगावकर यांना आम्ही जवळची मंडळी आदराने, प्रेमाने नाना म्हणतो.
वैचारिक सामाजिक, राजकीय चिंतन, असलेल्या नानांना यावेळचे अध्यक्षपद मिळाले ही केवळ आमच्यासाठीच नाही तर, सर्व साहित्य क्षेत्रासाठी गौरवास्पद बाब आहे.
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे मराठी भाषा, मराठी साहित्य या विषयी आपले मत मांडण्याची मोठी संधी आहे असे नाना मानतात. ते उचितच आहे.
नानांनी आपल्या लेखनातून सामान्य माणसासाठी कायदा सोपा करून तर सांगितला. एवढेच नव्हे तर चिंतनशील लेखनातून वैचारिक वाङमय समृद्ध केले. लालित्यपूर्ण लेखनाने ललित साहित्य संपन्न केले. विविध संस्थात्मक कार्यातून त्यांनी दिशादर्शक ठरेल असे लक्षणीय योगदान दिले आहे.
१४ जुलै १९३८ रोजी बीड येथे जन्म झालेले नानासाहेब आज ८४ वर्षात आहेत. याही वयात लेखन, वाचनाचा त्यांचा उत्साह नव्या पिढीस लाजवणारा असतो. वडील पुरुषोत्तम चपळगावकर हे स्वातंत्र्य लढ्यातील नेते असल्याने नानांना स्वातंत्र्यापूर्वीचा काळ घरातच अनुभवता आला आणि वकिली व्यवसायाचे बाळकडूही मिळाले.
बीडच्या चंपावती विद्यालयात प्राथमिक, बीडच्या सरकारी शाळेत माध्यमिक, अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयात इंटरपर्यंत, संभाजीनगरच्या मिलिंद महाविद्यालयातून बी.ए., माणिकचंद पहाडे महाविद्यालयातून पहिल्या वर्गात एलएलबी, मराठवाडा विद्यापीठातून पहिल्या वर्गात एम ए ची पदवी, असा नानांचा शैक्षणिक प्रवास झाला आहे.
नाना थेट काही वकील झाले नाही. तत्पूर्वी ते लातूरच्या दयानंद महाविद्यालयात, पहाडे महाविद्यालयात त्यांनी काही काळ अध्यापन केले. त्यानंतर १९६२ पासून त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला. पुढे ते न्यायमूर्ती झाले. १९९० साली मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती म्हणून ते सेवानिवृत्त झाले.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर नानांनी आपला वेळ लेखन, संस्थात्मक कार्यासाठी दिला. राजकीय, सामाजिक, ललित, वैचारिक अशा २७ पुस्तकांचे लेखन केले. अनंत भालेराव काळ आणि कर्तृत्व, आठवणीतील दिवस, कर्मयोगी संन्यासी, कायदा आणि माणूस, कहाणी हैदराबाद लढ्याची, तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ असे काही त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण लेखन सांगता येईल . यातून नानांच्या लेखनाची विविधता लक्षात येते.

नानांनी पंतप्रधान नेहरूंचे लिहिलेले चरित्र मौज प्रकाशनने अलिकडेच प्रकाशित केले आहे.
नानांचे संस्थात्मक कार्यही अधोरेखित करावे असे आहे. मराठवाडा साहित्य परिषदेशी त्यांचा ऋणानुबंध जुनाच आहे. त्याचप्रमाणे प्राज्ञ पाठशाळा, वाई राजवाडे संशोधन मंडळ, धुळे या संस्थांचे विश्वस्त म्हणून त्यांनी कार्य केले आहे. सध्या नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.
विद्यापीठ कार्यकारणी सदस्य, दैनिक मराठवाडा चे विश्वस्त, भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष या विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. स. भु शिक्षण संस्थेसारख्या अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्थांशी ते निगडित होते. राष्ट्रसेवा दल आणि लोकशाही समाजवादी चळवळीतही त्यांनी आपले योगदान दिले.
माजलगाव येथे २००४ साली २६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे नाना अध्यक्ष होते. संमेलना निमित्ताने मसापचे मुखपत्र असणाऱ्या प्रतिष्ठानने विशेषांक प्रकाशित केला त्यात त्यांची सविस्तर मुलाखत प्रकाशित झाली. त्यात त्यांनी चरित्र, वाङमय प्रकार या विषयी भूमिका विस्ताराने मांडली होती. चरित्र आणि आत्मचरित्र याविषयी त्यांनी केलेले चिंतन, मांडलेले विचार आजही महत्त्वाचे आहेत. त्या अनुषंगाने कर्मयोगी संन्यासी अनंत भालेराव आणि पंडित नेहरू विषयक व्यक्तीचिंतनाची पुस्तके महत्त्वाची वाटतात.
नानांच्या लेखनास राज्य पुरस्कारासह महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, श्री ग माजलगावकर पुरस्कार यासह अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन चा सन्मान लाभला. या वाटचालीच्या प्रवासात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाने मोठीच भर पडली आहे. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पावनभूमीत होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद नानांना मिळाल्याने संमेलनास नैतिक वैचारिक अधिष्ठान ही प्राप्त झाले आहे.

– लेखन : प्रशांत गौतम. ज्येष्ठ पत्रकार, औंरंगाबाद.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800