कुणी कल्पना न केलेले, कुणी स्वप्नातही विचार न केलेले, कुणी दुश्मनावर अशी वेळ यावी हा विचारही न केलेले दिवस या भरतखंडातीलच नव्हे तर अवघ्या विश्वातील लोक अनुभवत आहेत. का झाले असावे असे? असे कसे हे दिवस आले म्हणावे ?
काही महिन्यातच होत्याचे न होते झाले. भयानक परिस्थिती गावोगावी उद्भवली आहे. लाखो माणसे गेली, हजारो कुटुंबं देशोधडीला लागली, सधवा विधवा झाल्या, बालके अनाथ झाली, ज्याच्या खांद्यावर जायचे अशांना स्वतःच्या खांद्यावरही नेता आले नाही. जवळच्या नात्यातील अनेक जण असूनही बेवारशी असल्याप्रमाणे सरणाचा आधार घ्यावा लागला, मृतांचा परंपरागत अंत्यसंस्कारही करता आला नाही. इच्छा असूनही जवळची माणसेही मृत कुटुंबातील व्यक्तिच्या सांत्वनाला, भेटीला जाऊ शकली नाहीत, अनेकांना मृत व्यक्तिचे अंत्यदर्शनही घेता आले नाही. हे असे कसे दिवस आले म्हणावे?
सख्ख्या मुलाला आपल्या जन्मदात्यांना अग्नी देता आला नाही. कुणीतरी त्रयस्थाच्या हस्ते अग्नीसंस्कार उरकण्यात आले. अशा त्रयस्थांना का असे शेवटचे संस्कार करण्यात आनंद वाटला असेल ? अनेक सवाष्ण महिला या विषाणूने पाहता पाहता उचलून नेल्या. खरेतर कोणत्याही स्त्रीसाठी सौभाग्यवती असताना जाणे हा गौरवाचा क्षण ! पतीच्या मांडीवर प्राण सोडताना पतीच्या हाताने घोटभर पाणी पिणे ही भाग्याची खूण समजणाऱ्या अनेक स्त्रिया आजही आहेत. अशा सौभाग्यवती या कालावधीत हे जग सोडून गेल्या हे सुदैव की दुर्देव ? कारण सौभाग्य लेणे सोबत घेऊन इहलोकीची यात्रा संपविणे हे भाग्य जरूर वाट्याला आले परंतु नको त्यावेळी आले हे दुर्भाग्य का ? कारण सौभाग्यवती जाणाऱ्या महिलांच्या अंत्यसंस्काराला एक वेगळे महत्त्व आहे. अशा महिलेच्या अंत्ययात्रेच्या वेळी तिरडीसमोर इतर सवाष्ण बायका हळदीकुंकूवाचा सडा घालतात. अशा बाईला शेवटची आंघोळ घालून संपूर्ण सौभाग्यांलकारांनी सजवून नेतात. तिच्या कपाळावर हळदीकुंकवाचे मळवट भरतात. परंतु या दुर्देवी कालावधीत हा भाग्याचा क्षण सौभाग्यवती जाणाऱ्या महिलांच्या वाट्याला आलाच नाही. असे कसे हे दिवस आले म्हणावे?
या कालावधीत लाखो लोक हे जग सोडून गेले. अंत्यसंस्कार करण्यासाठी त्रयस्थांना पाचारण करावे लागले. अनेक गावांमध्ये तर अत्यंत भीषण परिस्थिती होती. एकाच दिवशी अनेकांचा अंत्यसंस्कार करावयाचा होता. ज्याप्रमाणे गावोगावी, शहराशहरातून दवाखान्यात बेडची संख्या अपुरी पडली, काही ठिकाणी एकाच पलंगावर दोन-दोन रुग्णांना झोपवावे लागले, काही ठिकाणी दवाखान्यातील मोकळ्या जागेत रुग्णांना झोपवून औषधोपचार करावे लागले तशीच परिस्थिती मरणोत्तर अनेक स्मशानात दिसून आली. अंत्य संस्कारासाठी मृतांना अनेक तास ताटकळत बसावे लागले. काही ठिकाणी तर एकाच चितेवर अनेकांना एकाच वेळी अग्नी द्यावा लागला, मोकळ्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. असे कसे हे दिवस आले म्हणावे?
अनेक कुटुंबांची वाताहत झाली. घरातील कर्ता माणूस निघून गेला. काही कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्ती काळाने हिरावून नेल्या. करतेसवरते, कमावते हात नसल्यामुळे कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. अनेक घरातील दृश्यं काळीज कापून काढणारीं, अश्रूंचा पूर आणणारीं होती. कुटुंबातील अनेक सदस्यांना मृत्यूने कवटाळले होते मात्र कुटुंबातील चिमुकल्यांना जीवदान मिळाले होते. दहा वर्षे पण वय नसणाऱ्या या मुलांचे भवितव्य, भविष्य काय असणार आहे? कोणता देवमाणूस मदतीला येणार आहे ? महत्त्वाचे म्हणजे सर्वत्र या विषाणूंचा हाहाकार माजलेला असताना प्रत्येकाला आपल्याच कुटुंबाची काळजी लागलेली असताना अशा बालकांना मदतीचा हात देणार कोण ? कुणी एखादा पुढे सरसावला तरी त्याच्याही मनात शंकेची पाल चुकचुकली असणारच की, मी ज्यांना मदत करतोय त्यांनाही या विषाणूने कवटाळलेले असेल तर ? असे कसे हे दिवस आले म्हणावे?
लग्न! गरीब असो श्रीमंत असो प्रत्येक जण आपल्या घरी होणारा लग्नसोहळा अविस्मरणीय व्हावा, कुठे काही उणे राहू नये, कुणाला निमंत्रण द्यायचे राहू नये या उद्देशाने कार्यरत असतो. लग्नाला किती माणसे जमतील यापेक्षा सर्वच आले पाहिजेत, आपल्या कुवतीप्रमाणे सारेजण खर्च करीत असतात. घरी होणाऱ्या कार्याचा स्वतःसह इतरांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु मागील काही महिन्यात लग्न सोहळा केवळ उरकल्या जातोय. या विषाणूच्या प्राबल्यतेमुळे लग्नाला उपस्थितीतांच्या संख्येवर बंधने आली आहेत. त्यातही मोजता येतील अशीच संख्या असल्यामुळे उपस्थितीतांपैकी कुणी बाधित तर नाही ना या शंकेने एकमेकांकडे पाहिले जाते. हस्तांदोलन, ऊरभेट, गळाभेट ह्या आनंददायी, कौतुकास्पद बाबीही आता होत नाहीत. सारे काही दोन हाताचे अंतर राखून, अर्धाधिक चेहरा झाकून! असे कसे हे दिवस आले म्हणावे?
भ्रमणध्वनी! आज चैनीची नव्हे तर जीवनावश्यक अशी बाब ! अन्न, वस्त्र, निवारा यासोबत आता भ्रमणध्वनीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. भ्रमणध्वनीवरील प्रत्यक्ष चर्चा, फेसबुक, व्हाट्सएपच्या अशा माध्यमातून होणारे संदेशांचे आदान प्रदान ही बाब अत्यंत प्रेरणादायी अशी परंतु आजकाल कुणाचा भ्रमणध्वनी आल्याची घंटा वाजली की ह्रदयात शंकेची पाल चुकचुकते ! दोलायमान स्थितीत माणूस फोन उचलतो कारण आजकाल विषाणूबाधित होऊन दवाखान्यात शरीक केले असल्याचे फोन मोठ्या प्रमाणात येत आहेत. तीच बाब संदेशांची! फेसबुक उघडले, संदेशाची पेटी उघडली की धाडधाड याच विषाणूच्या बातम्या मोठ्या संख्येने पाठवलेल्या असतात. तीच गोष्ट वाहिन्यांची ! बाधितांचा आकडा, मृतांचा आकडा! दवाखान्यातील परिस्थिती ! बेड, औषधांची मारामार ! इंजेक्शनचा तुटवडा आणि काळाबाजार! मृतांची परवड, नातेवाईकांची धडपड! कुटुंबाचा आक्रोश! स्मशानातील परिस्थिती! तेच ते नि तेच ते! असे कसे हे दिवस आले म्हणावे?
बालकांचे बालपण, वृद्धांचे जेष्ठत्व, घराघरातील हसणे, बाजारहाट, गप्पांची मैफल, खाऊगिरी, धमाल मस्ती सारे काही हरवून गेले आहे आणि नशिबात फक्त नि फक्त घरकोंडी आली आहे. असे कसे हे दिवस आले म्हणावे?
या आधीही असे म्हणत होते की, माणसाचा काही भरवसा नाही. बाहेर गेलेला, परगावी गेलेला मानव सुखरूप, जिवंत येईल की नाही याची शाश्वती नाही. मागील काही महिन्यांपासून आपण हे सारे अनुभवतो आहोत. कुणाचा केव्हा काय निरोप येईल, कोणत्या कुटुंबावर कसा आघात होईल, खातेपिते घर कसे उजाड होईल कशाचाही भरवसा राहिलेला नाही. त्यामुळे एकत्र आहोत तर एकमेकांना सांभाळा, मिसळून रहा. कुणाचाही अपमान करु नका, घालूनपाडून बोलू नका. घरातील माणसे हीच खरी संपत्ती आहे, तेच खरे ऐश्वर्य आहे. नाहीतर मग म्हणावे लागेल, ‘असे कसे हे दिवस आले म्हणावे?
राजकारण आणि राजकीय माणसे! काय बोलावे या संदर्भात ? सारे कसे खुर्चीसाठी अगतिक, हतबल आहेत. हा त्याच्याकडे बोट दाखवतो, तो त्याच्याकडे बोट दाखवताना खालच्या पातळीवर जाऊन दोषारोप करण्यात मग्न आहेत. सारेच जण आम्ही जनतेसाठी करतोय हे घसा खरडून सांगत आहेत. खरेच तुम्ही जनतेसाठी करीत आहात ना तर मग सारे एकत्र येऊन, खांद्याला खांदा लावून अशा विपरित परिस्थितीत राज्याला, देशाला मदत करा ना. ज्या जनतेच्या जीवावर तुम्ही कोणती ना कोणती खुर्ची उबवित आहात मग त्याच जनतेच्या जीवावर उठलेल्या, लाखो बळी घेतलेल्या विषाणूला नेस्तनाबूत करण्यासाठी का एकत्र येऊ शकत नाहीत ? निवडणूक संपली राजकारण संपले असे फक्त म्हणण्यासाठीच का ? ‘प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याची वृत्ती’ आता तरी सोडून द्या. लोकशाहीचा एक आदर्श, स्तुत्य, अनुकरणीय पाठ घालून द्या. जनता तुम्ही कोणत्या पक्षाचे, कोणत्या खुर्चीवर आहात हे बघत नाही. जनतेला तुमच्याकडून भक्कम आधाराची गरज आहे. कारण जनता आता म्हणत आहे, असे कसे हे दिवस आले म्हणावे?
अशाही परिस्थितीत डॉक्टर, दवाखान्यातील कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस, बँक इत्यादी विविध खात्यातील माणसे स्वतःचा जीव धोक्यात घालून विषाणूबाधितांना मदत करीत आहेत. रात्र नाही दिवस नाही ही माणसे सेवा बजावत आहेत. त्यांच्याही मनात कधी ना कधी येतच असेल, ‘असे कसे हे दिवस आले म्हणावे?’
– लेखन: नागेश सू. शेवाळकर.
– संपादक: देवेंद्र भुजबळ.0869484800.