समस्त देशवासीयांची शान, ज्यांचा प्रत्येक भारतीयाला वाटतो अभिमान असे अतिशय प्रतिष्ठित, मानाचे व सन्मानाचे स्थान म्हणजे भारताचे सैन्य दल. हे ते सैन्य दल आहे जे ऊन, पाऊस, थंडी, वारा अशा कोणत्याही ऋतु अथवा कोणत्याही बिकट परिस्थितीची तमा न बाळगता दिवस रात्र, तहान भूक हरपून आपले कर्तव्य निभावतात व प्रसंगी देशासाठी आपले प्राणही हसत हसत अर्पण करतात. अशा या सुपुत्रांचा आणि आता तर सुपुत्रींचा प्रत्येक भारतीय आजन्म ऋणी आहे.
तर जाणून घेऊ आज अशाच एका अतिशय हुशार, शूर, धाडसी सेनाधिकाऱ्याची कहाणी ज्याने आपल्या कर्तबगारीने यशस्वी वाटचाल केली व जणू हे सांगितले आहे की, आम्ही भारतीय कुठेही कमी नाही व नसणार. अंगावर शहारे उभे करणारा हा जीवन प्रवास आहे लेफ्टनंट कर्नल महेंद्र मोहन सासवडे यांचा…
लेफ्टनंट कर्नल महेंद्र सासवडे यांचे वडील मोहन गजानन सासवडे हे स्वतः भारतीय सैन्यात ऑननरी नाईक सुभेदार होते. अशा वीर वडिलांचा तसेच अतिशय शिस्तप्रिय आई सौ राधिकाताई यांचा मुलगा, म्हणजे श्री महेंद्र मोहन सासवडे यांचा जन्म ६ एप्रिल १९८२ रोजी झाला.
वडिलांची भारतभर सतत बदली होत असल्याने अहमदनगर, भटींडा, योल कैंट अशा ठिकाणी त्यांचे पहिली ते सहावी पर्यंतचे शिक्षण झाले. पुढे त्यांनी मूळगावी, सातारा येथे सेंट पॉल्स स्कूल मधून सातवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण तर सातारा येथीलच यशवंतराव चव्हाण कॉलेजमधून अकरावी व बारावी पूर्ण केले. पुढे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमधून त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.
त्यांच्या घरात आईचा प्रचंड धाक होता. प्रत्येक वस्तू जागेवरच ठेवली पाहिजे व प्रत्येक काम वेळेतच झाले पाहिजे ही शिकवण बालवयापासून मनावर रुजली. त्यामुळे स्वावलंबन व स्वयंशिस्त हे लाखमोलाचे गुण त्यांच्या पुढील भविष्यासाठी मोलाचे ठरले. उत्तम संस्काराची शिदोरी असल्याने मोठ्यांचा आदर करणे हे गुण त्यांच्यात रुजले.
पुढे वडील रिटायर झाल्यावर त्यांनी घर अथवा शिक्षण हे दोन पर्याय कुटुंबासमोर ठेवले. मुलांनी शिक्षण हा पर्याय निवडून त्या दिशेने वाटचाल केली. परिस्थिती बेताची होती. त्यामुळे महेंद्रजींनी जत्रेत स्टॉल लावणे, वस्तूंची विक्री करणे असे जे मिळेल ते काम केले.ते
कष्टांना कधीही कमी पडले नाही अथवा कोणत्याही कामाला लाजले नाही. हे संस्कार त्यांना आई वडिलांकडून मिळाले व त्यामुळेच भविष्यात त्यांनी शून्यातून स्वतःचे विश्व साकारले.
लहानपणापासून वडिलांना सैन्य दलात पाहिल्यामुळे महेंद्र यांना त्या क्षेत्राची खूप ओढ होती. त्या वर्दीचे प्रचंड आकर्षण होते. भविष्यात देशासाठी काम करण्याचा त्यांचा मानस होता. ते इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असताना कॉलेज मध्ये युनिव्हर्सिटी एंटरन्स स्कीम (U E S) अंतर्गत पूर्व सर्व्हिस सेलेक्शन बोर्ड (Pre – SSB) इंटरव्ह्यू घेण्यात आले होते. त्यात भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी कॉलेज मध्ये येऊन इच्छुक विद्यार्थी अथवा विद्यार्थिनींची चाचणी परिक्षा घेतली होती.
मुलांची बुद्धिमत्ता, सर्वांगीण विकास, त्यांची मानसिक क्षमता, तत्परतेने निर्णय घेण्याचे सामर्थ्य, मुलाखत अशी सर्व परीक्षा घेण्यात आली. तृतीय अथवा अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण देशात वर्षभर वेगवेगळ्या कॉलेज अथवा युनिव्हर्सिटीत Pre – SSB चाचणी घेण्यात येते. Pre – SSB मध्ये उत्तीर्ण व मेरिट मध्ये उच्च स्थान प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना युपएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी बोलवण्यात येते. लाखोंच्या संख्येने विद्यार्थी अशा चाचण्यांना सामोरे जातात. महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त बघण्यात येते.
पुढे पाच दिवस चालणारी एसएसबी परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणी अतिशय अवघड असते. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे ऑल इंडिया मेरिट ठरवले जाते. यामध्ये अर्थातच महेंद्रजींचे नाव होते.
अभिमानाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स साठी २००५ – २००६ साली फक्त दोनच जागा होत्या. त्यात महेंद्रजींना प्रथम स्थान प्राप्त झाले होते.
मेरिटमध्ये उच्च स्थान प्राप्त झाल्यामुळे महेंद्रजींना मिलिटरी ट्रेनिंगसाठी इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून येथे बोलवण्यात आले. ऑल इंडिया मेरिट मधून त्यांची निवड झाली होती. दिलेल्या प्रत्येक आव्हानांचा सामना त्यांनी अगदी धाडसाने केला. त्याची ती जणू पोच पावती होती. ही अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट होती.
सैन्यात जाणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. मात्र त्यासाठी अनेक खडतर परिस्थितीतुन जावे लागते. अतिशय चोखंदळपणे, पारखून निवड केली जाते. अनेक अटीतटीचा सामना असतो. सेनेत ती व्यक्ती काम करू शकते का ? उत्तम नेतृत्व करू शकते का ? वेळी अवेळी कमी साधन सामग्री असून सोपावलेले टास्क पूर्णत्वाला नेऊ शकते का ? त्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास, त्याची तत्परता, त्याचे सामर्थ्य, सर्वांसोबत राहण्याची तयारी, निर्णय क्षमता, त्याचा समजूतदारपणा अशा एक न अनेक गुणांचा कस लागतो.
अग्निदिव्यातून सोन्यालाही जावे लागते त्याशिवाय ते उजळत नाही, तसेच भारतीय सैन्य दलात उच्च पदवी प्राप्त करण्यासाठी त्या उमेदवारांना देखील कठोर परिश्रम करावे लागतात. अनेक परीक्षांचा सामना करावा लागतो.ही परीक्षा सलग पाच दिवस असते. अतिशय प्रगत मानसिक, शारीरिक कसोट्या लावून निवड समिती योग्य उमेदवारांची निवड करते.
कष्टाचे फळ नेहमी गोड असते. प्रचंड इच्छाशक्ती, मेहनत, चिकाटी, जिद्द व साहस या जोरावरच यशप्राप्ती होत असते. १९३२ साली डेहराडून येथे स्थापना झालेल्या, इंडियन मिलिटरी अकॅडमीत भूदलातील अधिकारी घडविण्याकरिता प्रशिक्षण देण्यात येते. ही जगातील एक अग्रगण्य संस्था आहे. येथे दाखल होण्यासाठी दर वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत लेखी परीक्षा आणि मुलाखती घेण्यात येतात. हे ट्रेनिंग अतिशय खडतर असते. येथे शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम केले जाते. देशासाठी लढायला व शत्रूशी दोन हात करायला शिकवले जाते. मिलिटरीचा इतिहास, यांचे शिक्षण तसेच पोहणे, घोडेस्वारी अशा एक न अनेक गोष्टींचा सराव करून घेतला जातो. कोणत्याही परिस्थितीस निर्भीडपणे तोंड देणे शिकविले जाते. तिथे सखोल ज्ञान व प्रशिक्षण दिले जाते. येथे टिकाव लागणे अतिशय कठीण असते.
अचानक उद्धभवलेल्या कठीण परिस्थितीचा सामना तुम्ही कसा करता, आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान, तुमची बोलण्याची पध्दत, अकॅडमीक परफॉर्मन्स अचानक शत्रूने हल्ला केला तर तुम्ही कशाप्रकारे प्रत्युत्तर देता अशा एक न अनेक गोष्टींची परीक्षा घेऊन त्या आधारे पुढे नियुक्ती केली जाते.
अशा या खडतर प्रशिक्षणानंतरची पहिली परेड, तो क्षण अविस्मरणीय, अतिशय अद्भुत अभिमानाचा होता. जेव्हा स्वतः आई वडील त्या वर्दीवर स्टार्स लावतात तेव्हा आनंदाश्रूने डोळे पाणवतात. हा महेंद्रजींच्या जीवनातील अतिशय विलक्षण व भावनिक क्षण होता. जणू आई वडिलांच्या कष्टांचे सार्थक झाले होते.
एका वर्षाचे मिलिटरी ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण होताच महेंद्रजींना भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती मा. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कडून भारतीय सेनेमध्ये अधिकारीच पदावर रुजू करण्यात आले.
लेफ्टनंट कर्नल श्री महेंद्र सासवडे यांची पहिली पोस्टिंग ही २००६ – २००७ या कालावधीसाठी ईन्फटरी अटाचमेंट, पुंछ जम्मू कश्मीर येथे झाली.
दिवस रात्र त्यांनी विषम परिस्थितीत काम केले. पाकिस्तान द्वारा क्रॉस बॉर्डर फायरिंग मध्ये जीवाची पर्वा न करता सीमेचे सफलता पूर्वक रक्षण केले. घुसखोरांबरोबर कित्येक चकमकी झाल्या. शत्रू कधी वार करेल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे डोळ्यांची पापणी देखील लवता कामा नये असा अतिशय कडक पहारा त्यांना द्यावा लागत असे.
पुढे २००८ ते २०१० आर्मी बेस वर्कशॉप आग्रा येथे त्यांची नेमणूक झाली. कमी वय व कमी अनुभव असूनही १०० हुन अधिक सिव्हिलियन स्टाफला बरोबर घेऊन सैन्याच्या महत्वपूर्ण संसाधनांचे सफलता पूर्वक दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम यशस्वीरित्या त्यांनी पार पाडले .
२०१० ते २०१२ या कालावधीत महेंद्रजींचे राष्ट्रीय रायफल्स अटाचमेंट, बांदिपूर, जम्मूकश्मीर येथे पोस्टिंग होते. अतिशय खडतर परिस्थितीत पाकिस्तान द्वारा प्रायोजित ‘क्रॉस बॉर्डर टेरेरिजम’ विरोधात त्यांनी कश्मीर खोऱ्यात सफलतापूर्वक कार्य केले. अतिरेक्यांबरोबर अनेक वेळा चकमकी झाल्या. त्यावेळी एका अतिरेक्याला मारण्यात त्यांची टीम यशस्वी झाली.
२०१२ – २०२१ या कालावधीत महेंद्रजी पंजाब, सिकंदराबाद, लिकाबाली (अरुणाचल प्रदेश), भोपाल, बारामुल्ला (जम्मूकाश्मीर) अशा ठिकाणी कोर ऑफ ई. एम.ई. च्या विभिन्न बटालियन मध्ये कार्यरत होते. आर्मीच्या स्ट्रेटेजीकली महत्वपूर्ण संसाधनांची सफलता पूर्वक रिपेरिंग व मेंटेनन्सची जबाबदारी त्यांच्यावर होती, जी त्यांनी चोख बजावली.
२०१६ – २०१८ साली, ३ ई. एम.ई. ट्रेनिंग सेंटर भोपाळ येथे त्यांनी काम पाहिले. नवीन भरती झालेल्या ४ हजार रिकरूटना २२ ट्रेंड्स मध्ये बेसिक मिलिटरी व टेक्निकल ट्रेनिंग देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. येथे खेळ व एडव्हेंचर मध्ये आंतराष्ट्रीय दर्ज्याचे ट्रेनिंग दिले जाते. खेळाडूंना ऑलिम्पिक साठी देखील तयार केले जाते. ही सर्व जबाबदारी महेंद्रजीनी पार पाडली.
२०२१ पासून लेफ्टनंट कर्नल महेंद्र सासवडे हे आर्मी हेडक्वार्टर, नवी दिल्ली येथे भारतीय सेनेच्या वित्त प्रक्रियेच्या ऑटोमेशनचे काम पाहत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा व एकता अबाधित ठेवणे, परकीय तसेच अंतर्गत आक्रमकांपासून देशाचे रक्षण करणे, सीमेवर सुरक्षा व शांतता कायम ठेवणे ही भारतीय लष्कराची प्रमुख कर्तव्य आहेत. भारतीय लष्कर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांच्या मदतीला सुद्धा धावून जाते.
महेंद्रजी सांगतात की, मी लष्करात काम करू शकलो ते केवळ माझ्या आई वडिलांच्या प्रेरणेने. त्यांनी खूप कष्टात दिवस काढले. ते अनेक वेळा मन मारून जगले. मात्र आम्हाला शिकवले. त्यामुळेच मी आज येथे येऊ शकलो, याचे त्यांना खूप समाधान आहे. देशासाठी काम करायला मिळणे हे माझे भाग्य आहे असे त्यांचे मत आहे.
ज्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला वडील सॅल्युट करत होते आज त्याच पदावर आपला मुलगा आहे याहून मोठी गोष्ट कोणती असू शकते ? पालकांना महेंद्रजींचा सार्थ अभिमान आहे. त्यांची खूप इच्छा होती की आपल्या मुलाने लष्करात जावे, ते स्वप्न महेंद्रजींनी सत्यात उतरवले.
लेफ्टनंट कर्नल महेंद्रजी यांचे लग्न २८ एप्रिल २००८ रोजी झाले. त्यांची पत्नी सौ स्नेहल या बी.एससी, बी. एड (गणित) आहेत. त्या देखील खूप हुशार, समंजस असून पूर्ण कुटुंबाची जबाबदारी चोख बजावतात. त्यामुळे मी समर्पित पणे मला दिलेली जबाबदारी चोख पाडू शकतो, असे महेंद्रजी म्हणतात. त्यांचा मोठा मुलगा अद्वैत सध्या सातवीत असून मार्शल आर्टस् मध्ये त्याने राज्यस्तरीय सिल्वर मेडल पटकावले आहे. तर मुलगी अद्वैका ही तिसरीत असून भरत नाट्यम शिकत आहे.
महेंद्रजी यांना पैंटिंग, पेन्सिल स्केचिंग करायला आवडते. मुलांच्या भविष्याचा दृष्टीने अजूनही पालकांचा कल बदललेला नाही आजही अनेक पालक मुलांना बाहेर पाठवायला धजत नाही. म्हणजे तसे पाहिले तर आकडेवारी कमी आहे. कौटुंबिक व्यवसाय अथवा नोकरीत ते खुश असतात. थोडक्यात त्यांना साचेबद्ध रहायला आवडते, पण त्यांनी हा दृष्टिकोन बदलला पाहिजे, असे महेंद्रजींना वाटते. त्यामुळे रिटायर झाल्यावर स्वस्थ न बसता पालकांची व मुलांची विचारसरणी बदलण्यासाठी काम करण्याची त्यांची इच्छा आहे.
मनुष्याची खरी ओळख ही त्याच्या नावावरून नव्हे तर त्याच्या कामावरून होत असते. जेव्हढी व्यक्ती मोठया पदावर कार्यरत असते तेवढी ती नम्र होत जाते असे त्यांच्याशी बोलताना मला वेळोवेळी जाणवले. चांगुलपणा, नम्रपणा, प्रामाणिकपणा ही माणसाची खरी आभूषणे आहेत, जी व्यक्तिमत्वाला झळाळी देते. असे युवक देशाचे खरे वैभव, खरे भूषण आहेत जे पडद्यामागून काम करत देशाप्रती आपले कर्तव्य चोख बजावतात.
जेव्हा ती मानाची वर्दी अंगावर चढते, भारत मातेचे वंदन केले जाते जय हिंद चा जय घोष केला जातो तेव्हा प्रत्येक सैनिकाचे धैर्य अजून बुलंद होते. जणू त्याक्षणी दहा हत्तीचे बळ मिळाले ही अद्भुत शक्ती केवळ भारतीय सैनिकांमध्ये दिसून येते जे मरणाच्या दारात देखील शेवटच्या श्वासापर्यंत लढतात. जिंकू किंवा मरु हेच ब्रीद त्यांच्या मनात खोलवर रुजलेले असते.
अशा निर्भीड, धडाडीच्या, धाडसी धैर्यशील देशभक्त लेफ्टनंट कर्नल महेंद्रजी मोहन सासवडे यांना सलाम. पुढील शब्दात त्यांना ही
मानवंदना……
“सीमेवरील तिरंगा हा वाऱ्यामुळे
नाहीतर
सीमेवरील उभ्या असलेल्या
सैनिकांच्या श्वासामुळे फडकतोय”

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800.
🙏कडक स्यालूट 🌷