Home बातम्या असे रंगले ऑनलाईन कविसंमेलन

असे रंगले ऑनलाईन कविसंमेलन

2

येता सर पावसाची
ओढ गावाची लागते
येता सुगंध मातीचा
माती गावाची दिसते

बाहेर रिपरीपता पाऊस आणि मोबाईलवरील ऑनलाईन कविसंमेलनात पावसाच्या कवितांचा दरवळ, पंजाब ते कर्नाटक आणि छत्तीसगड ते महाराष्ट्र अशा चार राज्यातील नव्या जुन्या कवींची मैफल उत्तरोत्तर रंगत गेली आणि काव्य रसिकांच्या ओठांवर उत्स्फूर्त दाद आली. निमित्त होते वर्ल्ड पोएट्री मुव्हमेंटच्या मराठी कवी संमेलनाचे.

मेंडेलिन आणि व्हेनेझुएला या ठिकाणी सुरू असलेल्या वर्ल्ड पोएट्री काँग्रेसच्या पार्श्वभूमीवर जगभरच्या कवींनी आपापल्या भाषेत कविता सादर करून शांततेचा पुनरुच्चार जगापुढे ठेवला. वर्ल्ड पोएट्री मुव्हमेंटचे मराठी भाषा समन्वयक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी आयोजित केलेल्या कवितेच्या वाटेवर जितेंद्र कुवर, व्यंकटेश चौधरी, डब्ल्यू. कपूर, वैजनाथ अनमुलवाड, कविता मुरूमकर, हर्षदा सुंठणकर आणि पुनम सिंगल-सुलाने यांनी कविता सादर केल्या.

कवी संमेलनाची सुरुवात जळगाव येथील कवी, तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या पावसाळी कवितांनी झाली. पाऊसपर्ण या कवितासंग्रहातील कविता त्यांनी रसिकांपुढे सादर केल्या.

व्यंकटेश चौधरी यांनी पावसाविषयी काळजी करणारा शेतकरी बाप आणि लेकरांच्या काळजीने हुरहुरणारी माय आपल्या कवितेतून मांडली.

छत्तीसगड येथील डब्ल्यू. कपूर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील कविता सादर केली.

बेळगाव कर्नाटक येथील हर्षदा सुंठणकर यांनी आपल्या कवितेतून आजोबा आणि नात यांचे हृदय चित्र रेखाटले.

पंजाब मधून पुनम सिंगल सुलाने यांनी मायबोली मराठीची महती वर्णन करणारी कविता वाचून दाखवली.

तर वैजनाथ अनमुलवाड यांनी जुन्या आणि नव्या गावातील भेदरेषा आपल्या कवितेतून ठळक केली.

कविता मुरूमकर यांनी स्त्रीजाणिवेचे सूक्ष्म पदर कवितेतून उलगडून दाखवले.

एक तास चाललेले हे कवीसंमेलन उत्तरोत्तर रंगत गेले. पृथ्वीराज तौर यांनी कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केले.

येता सर पावसाची
ओढ गावाची लागते
येता सुगंध मातीचा
माती गावाची दिसते
कवयित्री पूनम सुलाने यांच्या ह्या ओळी रसिकांच्या काळजात घर करून गेल्या.

या ऑनलाईन कवी संमेलनाला महाराष्ट्रातील दिग्गज कवींसह शेकडो रसिक उपस्थित होते.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

2 COMMENTS

  1. असे रंगले ऑनलाईन कविसंमेलन
    खुप छान सुंदर 👌👌👍👍👍👍
    पुढच्या वेळेस मला पण सहभागी व्हायला आवडेल.🙏👍👍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version