साहित्य कला व्यक्तीत्व विकास मंच अंतर्गत साकव्य परदेशी परिवार समूहाचे द्वितीय आंतरराष्ट्रीय कवी संमेलन नुकतेच आभासी पद्धतीने संपन्न झाले. हे संमेलन चांगलेच रंगले.
पत्रकारितेत अत्यंत मानाचा समजला जाणारा “चौथास्तंभ” विशेष पत्रकारिता पुरस्कार, “सामाजिक सेवा” वर्गात प्राप्त झालेले, अनेकानेक पुरस्कारांनी सम्मानित, न्यूज स्टोरी टुडे या आंतरराष्ट्रीय, वेबपोर्टलचे संपादक आणि निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन अतिशय बहारदार पद्धतीने साजरे झाले. त्यांनी कवितेबद्दल आणि काव्य संमेलनाबद्दल अतिशय बहुमोल मार्गदर्शन केले. साकव्य मधल्या अनेक साहित्यिकांचे लेखन त्यांच्या वेब पोर्टलवर नियमितपणे प्रकाशित होत असते. त्याच बरोबर या काव्य संमेलनात सहभागी कवींच्या कवितासुद्धा प्रसिद्ध करतील, असे प्रेमपूर्वक वचन त्यांनी दिले.
कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून श्री. विसुभाऊ बापट उपस्थित होते. “कुटुंब रंगलंय काव्यात” हा एकपात्री प्रयोग गेल्या ४० वर्षात देश विदेशात त्यांनी सादर केला आहे. त्यांनी उपस्थित राहून प्रत्येक कवयित्रीच्या कवितेचे थोडक्यात समीक्षण करून सगळ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन करून आपल्या काही आठवणी ही सगळ्यांना सांगितल्या.

साकव्य समूह संस्थापक, श्री. पांडुरंग कुलकर्णी यांच्या मनोगतातून सर्व सहभागी कवयित्रींचे आणि परदेशी समूहाचे कौतुक केले गेले. परदेशात राहून देखील भारतीय सांस्कृतिक वारसा, विशेषतः माय मराठीचा प्रसार हे सर्व साहित्यिक करत असल्याचा अभिमान त्यांच्या बोलण्यातून जाणवला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, श्री. विलास कुलकर्णी यांनी त्यांच्या खास ओघवत्या शैलीत साकव्य समूहाबद्दल माहिती दिली आणि परदेशस्थ कवयित्रींचे कौतुक केले.
या कवी संमेलनात सिंगापूर मधून नीला बर्वे आणि स्मिता भीमनवार, एरवी कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या प्राची देशपांडे यांनी भारतातून, रशिया मधून डॉ. कल्याणी मसादे, केमन आयलंड्स मधून शिल्पा तगलपल्लेवार आणि अमेरिकेतून अरूणा मुल्हेरकर, वर्षा हळबे, तनुजा प्रधान व डॉ गौरी जोशी कंसारा या कवयत्रींनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी कंसारा यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केले.
कार्यक्रमासाठी समूहाचा ध्वज बनवला ग्राफिक्सकारा, शरयू खाचणे मॅडम यांनी आणि या कार्यक्रमाचे पोस्टर बनवले श्री. मिलिंद पगारे सर यांनी.
परदेशात राहूनही आपल्या माय मराठीशी नाळ जोडून ठेवणाऱ्या साकव्य समूहाच्या नारी शक्तीने हे द्वितीय काव्य संमेलन चांगलेच गाजवले.
या कार्यक्रमाची व्हीडिओ यूट्यूब लिंक पुढे देत आहे:
कवी संमेलनाचा आस्वाद घेऊन आपले अभिप्राय अवश्य कळवा, तसेच रशियातील कवयत्री डॉ कल्याणी मसादे यांची ‘आयुष्य’ ही कविता व विसुभाऊ बापट यांनी केलेले रसग्रहण, याच पोर्टल वरील ‘कविता’ या सदरात अवश्य वाचा.

– लेखन : तनुजा प्रधान. कविसंमेलन समन्वयक
साकव्य परदेश समूह प्रमुख, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
साकव्य परदेशस्थ परिवाराच्या द्वितीय काव्यसंमेलनाचा साद्यंत अहवाल अतिशय सुरेख दिला आहे.ह्या कार्यक्रमाच्या समन्वयक सौ, तनुजा प्रधान आणि संयोजक डाॅ.गौरी जोशी कंसारा ह्या दोघी खरोखर इतकी मेहनत घेत आहेत,त्यांचे करावे तितके कौतूक कमीच आहे.