सिंगापूरमध्ये चिनी नववर्षाचा सण मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. कारण सिंगापूरमध्ये चिनी लोकसंख्या ७६ टक्के आहे आणि चिनी संस्कृतीतील हा सर्वांत मोठा सण आहे.
चीनमध्ये हा सण “वसंतोत्सव” म्हणून देखील ओळखला जातो.त्यामुळे इतर सणांबरोबर या ‘वसंतोत्सव’ ची लगबग एक-दोन महिने आधीच सुरु होते. मोठे आकाशकंदील, चिनी भेटवस्तू, नवीन वर्ष ज्या प्राण्याच्या नावाने आहे त्या प्राण्याच्या खेळण्यांनी, केशरी/लाल रंगाच्या वस्तुंनी दुकाने भरून जातात.
चिनी दिनदर्शिकेनुसार या काळात शिशिर ऋतूचा शेवट होऊन उन्हाळ्याची सुरुवात होते. उत्सवाची सुरुवात नवीन महिन्याच्या (चिनी: 正月; फीनयीन: : Zhēngyuè) पहिल्या दिवशी होते आणि १५ व्या दिवशी कंदील उत्सवाने समारोप होतो.
नववर्षाच्या सायंकाळी, चिनी कुटुंबे वार्षिक सहभोजनासाठी (चिनी: 除夕 ; फीनयीन: Chúxī ) एकत्र जमतात. चिनी दिनदर्शिका चंद्र आणि सूर्याच्या गतीवर आधारित असल्यामुळे चिनी नववर्ष हे ‘चांद्रमासिक नववर्ष’ किंवा ‘लुनार नवीन वर्ष’ या नावाने ओळखले जाते.
गेली आठ वर्षे मी वेगवेगळ्या प्राण्यांच्या नावाने आलेली नवीन वर्ष, उदा. कोंबडा, कुत्रा, माकड इ. एका उत्सवाच्या उत्साहाने आलेली बघितली आहेत. या वर्षीचा प्राणी ‘ससा’ असून सशाच्या ठायी आढळणारे अनेक गुण लक्षात घेऊन ससा हे प्रतीक अगदी योग्य वाटते. सशाचा स्वभाव, गोंडस दिसणं अनेक चांगल्या गोष्टी प्रेरित करते.
सशाचा सावधपणा, चलाखी, हुशारी हे गुण शिकण्यासारखे आहेत. प्रत्येक वर्षी एखाद्या प्राण्याच्या नावाने समर्पित वर्ष असणे ही संकल्पना मला खूप आवडली. ससा हा पूर्वीपासून आनंदाचे प्रतीकही मानला जातो.
यावर्षी हा ‘ससा’ लोकांच्या आयुष्यात संपत्ती आणि समाधान आणेल असा ज्योतिषांचा विश्वास आहे.
चिनी नववर्ष हा चीनमधील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा उत्सव आहे. या उत्सवाची सुरुवात काही शतकांपूर्वी झाली असून अनेक चिनी कथा आणि परंपरांमुळे या उत्सवाचे महत्त्व उत्तरोत्तर वाढतच राहिले. चिनी नववर्ष हे जगभरात चिनी लोकसंख्या अधिक असणाऱ्या चीन, हॉंगकॉंग, मकाऊ, तायवान, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, मॉरिशस, फिलिपिन्स, व्हिएतनाम, आणि जगभरातील चायना टाउनमध्ये साजरे केले जाते.
चीनच्या शेजारी देशांमध्येही या उत्सवाचा प्रभाव आहे.
उत्सवाच्या पद्धती आणि परंपरा यांबद्दल चीनमध्ये प्रादेशिकतेनुसार वैविध्य आढळते. प्रत्येक घरात भेटवस्तू, कपडे, भोजन आणि सुशोभीकरणाच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. घरे सजवली जातात. घरासमोर संत्री ठेवली जातात. हे शुभ लक्षण मानले जाते. घरातील दुर्भाग्य दूर करून सद्भाग्य आणि प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी, चिनी परंपरेनुसार घराची साफसफाई करण्याचा रिवाज आहे. अर्थात तसा रिवाज भारतातही आहे. दिवाळीत सर्व घरांमध्ये साफ सफाई केली जाते. दिवे लावून, मिठाई आणि भेटवस्तू दिल्या जातात.
सिंगापुरातही चिनी मिठायांच्या डब्यांनी दुकाने भरून जातात. एकमेकांना पांढऱ्या रंगाची मिठाई दिली जाते. दरवाजे आणि खिडक्यांवर “उत्तम आरोग्य”, “आनंद”, “स॓पत्ती” आणि “वृद्धी” दर्शवणाऱ्या लाल रंगाच्या कागदी कलाकृतींचा वापर सजावटीसाठी केला जातो.
नववर्षाच्या आदल्या सायंकाळी, कौटुंबिक स्नेहभोजनात बदक, डुक्कर, कोंबडी यांपासून तयार केलेल्या रुचकर पदार्थांची रेलचेल असते, तसेच गोडाधोडाचाही आस्वाद घेतला जातो. पंधरा दिवस पाहुण्यांनी घर भरून जाते. मेजवान्या चालू राहतात.
या दरम्यान सिंगापुरात आपल्या गावातले बेंडबाजा, ढोल ऐकायला यायला लागले तेव्हा मी पहिल्यांदा चकित झाले होते. नंतर कळले की हे पंधरा दिवस
‘चिनी ड्रॅगन’ बनून ढोल, ताशांसकट जागोजागी मिरवणूक निघते. मिठाई, फळे आणि लाल वस्तू यांनी भरलेली थाळी समोर ठेवून हा ड्रॅगन नाच करतो. नृत्य, ढोल, ताशा यांच्या गजरात हा ड्रॅगन लहान मुलांसमोर चोकोलेट्स उधळतो.
रात्री फटाके उडवून दिवसाची अखेर होते. दुसऱ्या दिवशी सकाळी, वडीलधाऱ्यांना लहान पोरे व तरुण कुटुंबीय उत्तम आरोग्य आणि भरभराटीच्या शुभेच्छा देतात; तर वडीलधारे त्यांना पैसे भरलेले लाल लिफाफे देतात.
कोविड नंतरच्या काळात महागाई वाढली आहे. त्यामुळे ही लिफाफा देण्याची पद्धत महागात पडते असे दुकानातले एक आजोबा बोलताना म्हणाले. आमच्या लहानपणी अगदी कमीतकमी म्हणजे दहा सेंट मध्ये सुद्धा आम्ही खुश राहत असू असे ते आठवणीत रमून जात म्हणाले.
नववर्षाच्या निमित्ताने जुनी दुःखे, क्लेश विसरून शांती आणि सुखसमॄद्धीसाठी प्रार्थना केली जाते असे त्यांनी सांगितले.
चिनी परंपरेनुसार वर्षगणना ही सलग अंकांमध्ये मोजली जात नाही. चीनबाहेर पिवळ्या सम्राटाच्या कारकिर्दीपासून वर्षगणना केली जाते. पण गणनेचा संदर्भबिंदू प्रत्येक विद्वानाने गणनेत वेगळा धरल्याने, इ.स. २०१२ हे वर्ष ४७१०, ४७०९ आणि ४६४९ ठरते.
एक गोष्ट मात्र खरी, जागतिकीकरणाच्या या जमान्यात सगळे जग जवळ आले आहे. कोविडने माणुसकीला वेगळे रूप दिले आहे. त्यामुळे नवीन वर्ष हे चीन मध्ये असो की सिंगापूरला त्याचे स्वागत करायला आपण सगळे सज्ज होऊया.
(उगम स्रोत- गुगल आणि स्व अनुभव)

– लेखन : मोहना कारखानीस. सिंगापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800
व्वा अगदी संग्राह्य माहिती. अतिशय उत्तम लेख