माहेर म्हणजे प्रेम, माया, लाड, कौतुक, आपुलकी, आपलेपणा, जिव्हाळा व स्वातंत्र्य अशा शब्दांचा उल्लेख अगदी सहज केला जातो.
आणि सासर म्हणजे जबाबदारी, बंधने, मान सन्मान, आदर, सामाजिक भान, सर्वांच्या सम्मतीनेच, सर्वांच्या विचाराने निर्णय घेणे, अनेक त्याग व समर्पण करणे असे होय !
पण खरंच असे असते का ? आज सुनांनाही तेवढेच स्वातंत्र्य मिळते व घरातील सर्वांची साथ ही मिळत आहे. हे खरे तर मी माझ्या उदाहरणावरूनच सांगू ईच्छिते. माझी गोष्ट माझे अनुभव …..
माझे बालपण अगदी छान गेले. मी लाडात वाढले. पण घरात खूपच शिस्तीचे व कडक वातावरण होते. अगदी
‘सातच्या आत घरात’, असे काही.
शाळा, पुढे कॉलेज, क्लास व घर हेच माझे विश्व होते. मी मैत्रिणींच्या घरी कधीही जात नसे. त्याच आमच्या घरी येत. मला या सर्व वातावरणाची सवय झाली होती. घरातील सर्वांनी खूप प्रेम दिले मात्र स्वातंत्र्य कधीच मिळाले नाही. बाहेरचे जग कधीच पाहिले नाही. त्यामुळे खूप शांत व भित्रा स्वभाव झाला होता.
लग्न झाल्यावर मी सातारला आले. येथे सासू, सासरे, दिर, जावा व नणंद असे आमचे एकत्रित कुटुंब असून देखील सर्वांची विचारसरणी आधुनिक होती. टेप लावून नाच व गाणी असे अनेक कार्यक्रम होत. दंगा मस्ती करणे हे मी येथे आल्यावर अनुभवले. यात मोठया पासून लहानांपर्यंत सर्वांचा सहभाग असे. प्रचंड उत्साह, मजा, मस्ती दिलखुलास वातावरण, कोणाचेही दडपण नव्हते. मस्त, मोकळी जीवनशैली जिचा मी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता असे जीवन जगत होते.
पतीने नेहमीच साथ दिली. सासूबाई खूप हौशी, स्वतः सासऱ्यांनी माझ्याही नकळत क्लासची जाहिरात वृत्तपत्रात दिली.
सासरचे वातावरण अगदी विरुद्ध होते. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते. सर्वांनी खूप प्रोत्साहन दिले. सहकार्य केले. त्यामुळे गेली २६ वर्ष मी क्लासेस घेऊ शकले.
इतकेच नव्हे तर समाजात देखील माझा सहभाग वाढला. त्यामुळेच माझ्या कला गुणांना वाव मिळाला. त्याचे श्रेय जाते ते म्हणजे माझ्या घरच्यांना, माझ्या चुलत जाऊबाईं सविता हेडे त्यांच्यामुळे हे शक्य झाले. त्या अनेक वर्षे महिला अध्यक्ष म्हणून काम करत होत्या. त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.
आजपर्यंत मी कधीच घराबाहेर पडले नव्हते. हे सर्व नवीन होते. समाजात देखील सर्व बंधू व भगिनींची खूप छान साथ मिळाली व आजही देतात.
विशेष म्हणजे हेमंत कासार ह्यांनी वेळोवेळी मला सुत्रसंचालन करण्याची जबाबदारी सोपवली. मार्गदर्शन केले. त्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढला. माझी एक नवीन ओळख निर्माण झाली. समाजामुळे एक व्यासपीठ मिळाले. माझ्या लिखानालाही येथूनच सुरवात झाली.
नवरात्रीत विविध गुण दर्शन कार्यक्रमामध्ये आम्ही समाजातील सर्व मैत्रिणी मिळून देवीच्या विविध गाण्यावर नृत्य करीत असू. जवळपास आम्ही १५ वर्षे तरी नाच बसवले. देवीच्या गाण्यापासून, दांडिया, गरबा ते अगदी भांगडा देखील करण्याची संधी मिळाली. हे सर्व माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहेत.
अनेक वर्षे कालिका मंदिराच्या गाभाऱ्यात महारांगोळी देखील काढण्याची संधी मिळाली.
तसेच नवरात्रीत आयोजित केलेल्या केंजळयांचा ऑर्केस्ट्रा मला मनापासून आवडत होता. त्यावेळी मी त्यांच्यासाठी एक कविता दर वर्षी लिहून देई व ते सर्वांसमोर ती वाचून कौतुक करत. हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईन्ट होता.
कोजागिरीच्या दिवशी नवरात्रीच्या कार्यक्रमाच्या आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ असायचा. त्या वेळी उपस्थित ट्रस्ट चे सदस्य व मैत्रिणींवर फिश पौंड लिहीत होते. म्हणजे सहा ते सात ओळीत त्यांच्या स्वभावाचे वर्णन अगदी मिश्किल पणे करत असे. कोणाचे मन दुखावले जाऊ नये याची नेहमीच काळजी घेत होते. ही कल्पना सर्वांना भावली व सर्वच मंडळी खुश होत. त्यांचा स्वभाव त्यांचे कौतुक व थोडी चेष्टा मस्करी असे फिश पौंडचे स्वरूप असे. हसून सर्वांची मने जिंकली होती. मी ही थोडं फार लिहू शकते हे त्या वेळी लक्षात आले.
माझी स्व ची ओळख साताऱ्यात आल्यावर झाली. माहेरी पुण्यात राहून जे करू शकले नाही ते साताऱ्यात करू शकले. हे केवळ शक्य झाले माझ्या पतींच्या सहकार्यामुळे, विश्वासामुळे तसेच सर्व सासरच्या मंडळींनी म्हणजे माझे सासू, सासरे यांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे. जाऊ व दिर ह्यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रेरणेमुळे. सातारची सून असल्याचा मला खूप अभिमान वाटतो.
एकत्रित कुटुंबात असल्याने कामाचा खूप ताण होता पण…… मनावर कोणताही ताण नव्हता त्यामुळे कामाचा त्रास जाणवला नाही.
मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते की असे सासर मला लाभले.
सासर या शब्दाची व्याख्या आता बदलू लागली आहे. मी सर्वांची मनापासून ऋणी आहे. या पुढे ही कार्यरत रहाण्यासाठी अशी साथ व सर्वांची सोबत राहू दे हीच इच्छा.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
