Tuesday, September 16, 2025
Homeलेखआंतरराष्ट्रीय युवादिन

आंतरराष्ट्रीय युवादिन

युवा कर्तव्य

आज आंतरराष्ट्रीय युवादिन आहे. त्यानिमित्ताने हा विचार प्रवर्तक लेख.आंतरराष्ट्रीय युवादिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

तरुण पिढी म्हटली की, देशाची सर्वात मोठी संपत्ती असे आपण नेहमी म्हणतो. जर खरोखरच तरुण पिढी ही आपली संपत्ती आहे, तर मग एक प्रश्न नकळतपणे डोळ्यासमोर उभा राहतो की, तारुण्य ही सर्वात मोठी संपत्ती प्रत्येक तरुणाकडे असताना आज आपल्या देशातील हजारो युवक इतके हताश आणि निराश का ?
प्रत्येक तरुण स्वतःच्या भविष्याबद्दल इतका उदासीन का ? हजारो तरुणांचे पाय व्यसनाच्या मार्गावर का ?
रोज कोठून आणि कुठून तरी तरुणांनी आत्महत्या केलेल्या बातम्या का ? छोट्या छोट्या कारणावरून एकमेकाच्या जीवावर उदार झालेले तरुण का ? एखाद्या व्यक्तीला पाठिंबा देणे वाईट गोष्ट नाही मात्र एखाद्या व्यक्तीच्या नावाने आपल्या नावाला प्रसिद्धी मिळावी म्हणून त्या व्यक्तीचा प्रचार करत फिरणाऱ्या तरुणांची संख्या इतकी जास्त प्रमाणात का ?

सर्वधर्मसमभाव हे वाक्य लहानपणापासून जरी कानावर पडत असली तरी झेंड्याच्या नावाखाली एकमेकांचा द्वेष करणारा तरुण वर्ग इतक्या जास्त प्रमाणात आजही प्रत्येक गावात का ? ह्या सर्वांमध्ये जर सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न केला तर शंभर पैकी एक दोन तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन काही वेगळे करायचे ठरवले तरी त्यांना देखील भ्रष्टाचाराला बळी पडावेच लागते. या सर्वात मग परत एक प्रश्न उभा राहतो आणि तो म्हणजे याला जबाबदार कोण ? या प्रश्नाचे उत्तर देताना एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी नक्की सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे, आपण आपल्या डोळ्यासमोर एखाद्या गरीब व्यक्तीला श्रीमंत होत असतांना पाहत असतो तर दुसरीकडे एखाद्या श्रीमंत व्यक्तीला गरीब होताना देखील आपण पाहिलेले असते. त्यांच्याबद्दल थोडासा विचार केला तर एक गोष्ट डोळ्यासमोर येते आणि ती म्हणजे जे श्रीमंत होतात ते आपल्या संपत्तीचा वापर योग्य पद्धतीने करत असतात आणि जे गरीब होतात त्यांना आपल्या संपत्तीचा वापर योग्य पद्धतीने करता येत नाही.

अगदी ह्या उदाहरणाप्रमाणे प्रत्येक देशाची परिस्थिती झाली आहे जो देश आपल्या देशातील युवाशक्तीचा योग्य वापर करत आहे तोच देश आज आपली वेगळी ओळख निर्माण करु शकत आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की, वाईट मार्गाकडे भरकटलेल्या युवकांना दोष देत बसण्यापेक्षा देशातील युवा शक्तीचा वापर योग्य दिशेने कसा करता येईल ? संपत्ती जरी किती असली तरी त्याचा वापर करणारा योग्य नसेल तर ती स्वतः काही करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्या देशातील युवाशक्ती देखील असून नसल्यासारखी झाली आहे.

युवाशक्तीला योग्य दिशा देण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याचा विचार करणे आजची खरी गरज आहे. युवा असणे म्हणजे एखाद्या ठराविक वयापर्यंत कधीच मर्यादित नसते.युवा असण्यासाठी आपली विचारशक्ती युवा असावी लागते. युवकांना त्यांचे कर्तव्य जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते स्वतः स्वतःला युवक जरी इतरांकडून म्हणून घेत असेल मात्र आपण खरेच युवक आहोत का…? एखाद्या अन्यायाविषयी आपले रक्त सळसळते का ?…. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपण काही करत आहोत का ?… आपल्याकडून समाजाला फायदा होईल असे कार्य आपल्या हातून घडत आहे का ?… आपण आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहोत का ?… असे प्रश्न प्रत्येक तरुणाने स्वतःला विचारून स्वतःची ओळख स्वतः बनवून समाजाला तसेच आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी आपल्या मधील युवा शक्तीचा वापर करणे गरजेचे आहे. युवा दिनाच्या निमित्ताने यावर नक्कीच विचार कराल.

आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

पूनम सुलाने

— लेखन : पुनम सुलाने सिंगल.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments