बाल कविता
आई बाबा आई बाबा लौकर घरी याना |
कंटाळूनीया मी गेलोना, माझ्याशी खेळाना ||धृ||
सकाळी माझ्या उठण्याआधी कोठे तुम्ही जाता |
आजी सांगते कामावरती खरे काय सांगाना ||
मी ही येईन सोबत तुमच्या घेऊन मजला जाना |
आई बाबा आई बाबा लौकर घरी याना ||१||
गंगा करतो आनंदाने, डुबक डुबक पाण्याने |
फेस पांढरा अंगावरती आजी लावी प्रेमाने ||
टबात येते कित्ती मज्जा पहावयाला याना |
आई बाबा आई बाबा लौकर घरी याना ||२||
कार्टुन चाले टिव्हीवरती त्यातच मी रमतो |
बालगीते मोबाईल वरती रोजच मी ऐकतो |
मोरासंगे थुई थुई थुई नाचायाला याना |
आई बाबा आई बाबा लौकर घरी याना ||३||
वेफर देते मजला आजी कुडुम कुडुम खायाला |
नारळपाणी गोड गोड ते देते मज प्यायाला ||
वरण तुपाच्या मऊ भाताची मंमं कराला याना |
आई बाबा आई बाबा लौकर घरी याना ||४||
टण टण घंटा देवळातली वाजवायला जातो |
आजोबांसह बाप्पा जय जय रोज करूनी येतो ||
प्रसाद मिळतो पेढे बर्फी तुम्ही घ्यायला याना |
आई बाबा आई बाबा लौकर घरी याना ||५||
खेळ खेळूनी माझ्यासंगे आजी आजोबा दमले |
जवळी घेवून मजला स्वतःच झोपून गेले ||
खेळपसारा मांडून भवती एकटाच बसलो ना |
आई बाबा आई बाबा लौकर घरी याना ||६||

– रचना : प्रवीण देशमुख. कल्याण
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800