बदलत्या परिस्थितीत मुलं आईवडिलांपासून दूर राहू लागली अन आईवडील एकटे पडू लागले. काही वृद्धाश्रमाची वाट धरतात. या परिस्थितीवर उपाय म्हणून श्री श्रीपाद सप्रे यांनी, काही मित्रांनी एकत्र येऊन
“मित्राश्रम” काढण्याची कल्पना मांडली आहे. या निमित्ताने या प्रश्नाचा ऊहापोह करणारे हे प्रकट चिंतन....
नोकरी धंद्याच्या निमित्ताने गाव सोडून शहरवासी झालेली बरीच मंडळी आहे. आईबाबांची जबाबदारी गावात राहाणाऱ्या भावावर टाकून दोनाचे चार हात झाल्यावर “मी, माझी बायको माझी मुलं” एवढाच विचार करीत दहा बाय दहाच्या चौकटीत रममाण झालेली. आई बाबा कर्तेसवरते असे तोवर कायम घराचा ऊपभोग घेणारे आणि आईबाबांच्या अडचणीच्या वेळी थातूरमातूर कारणे दाखवून गावाकडे येण्याचे टाळणारे….
निवृत्त असूनही नातवंडे सांभाळण्याच्या नावाखाली पळ काढणारी मंडळी आईवडीलांकडे दुर्लक्ष करतात. मग याच संस्कारात वाढलेला एकुलता एक मुलगाही आपल्या आईबाबांना सोडून विभक्त संसार थाटतो. कारण वडीलांप्रमाणे त्यालाही ही जबाबदारी नकोशी वाटत असते. पण… पश्चात गावच्या प्राॕपर्टीच्या हक्कासाठी मात्र हजर होताना दिसतात.
खरं तर आज प्रत्येकाकडे पैसा आहे त्यामुळे कुणाला कुणाचीच गरज नाही असं समाजात हे चित्र दिसू लागलंय. मी सक्षम आहे. मला हट्टाकट्टा असे तोवर कुणाची मदत नको अशी धारणा साधारणतः आईवडीलांची असते. पण ऊतारवयात आपल्या मुलाचा, मुलीचा सहवास असावा हे प्रत्येक आई-बापास वाटणं स्वाभाविकच आहे. ही परंपरा, संस्कृती आहे आपली. यातून कुणीही सुटलेले नाहीत. त्यात वेगळं असं काही नाही…
तसं पाहिले तर आज प्रत्येकाला सर्रास एकेकच अपत्य आहे. सर्वांचीच मुले शिकली सवरलेली ऊच्चविद्याविभूषित आहेत. कुणी चांगल्या धंद्यात, कुणी चांगल्या नोकरीत ऊच्च पदस्थ आहेत. यावर किती आईवडील सुखी-समाधानी आहेत हे ज्याने त्याने ठरवायच आहे.
तरी पण मुलगा जवळच्याच शहरात आहे, म्हणजे अडचणीला तो येऊ शकतो याचं समाधान ईथल्या बापाला नक्कीच आहे. ज्यांची मुलं बाहेरदेशी आहेत त्यांना ती बाहेर देशात आहे याचा गर्व साहजीक आहेच पण सरत्या काळात ती सेवा देतील किंवा काय..? ही सल ते ऊरी बाळगून आहेत.
बाहेरच्या देशात करीयरच्या मागे धावताना आणि कामाचा विचार करता त्या बिचाऱ्या पोरांना आई-बापाचा विचार करावयास वेळही नसावा. बायको एका स्टेटमधे तर नवरा दुस-या स्टेटमधे. कधीतरी संडेला एकत्र येणं अशीही काहींची जीवनशैली आहे.
कधी भारतात आले तर “अरे काय हे पोल्यूशन… छ्या… कसे काय राहता तुम्ही…?” जसे काही यांचा जन्मच मूळी परदेशात झाला आहे अशा मिजाशीत वावरताना मी पाहिले आहेत.
गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात मजा, शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ सोपं आहे. देशात राहतात त्यांना वाटतं परदेशी जावं, परदेशात राहणाऱ्याना वाटतं आपण इथे खूप तडजोड करतो. दुसऱ्याच्या ताटातला लाडू मोठा वाटतो. अगदी तस्सच पाश्चात्य संस्कृती विषयी झालं आहे. त्याचच आकर्षण सर्वांना आहे..
भारतीय जीवनशैलीपेक्षा पाश्चात्त्य संस्कृती ऊच्च आहे आणि आपल्या देशापेक्षा पाश्चात्त्य देशात आपलं कसब दाखवायला स्कोप आहे या विचारसरणी पासून मुलांना अलीप्त करण्यास पालक अयशस्वी ठरलेले असतात. मग मुलं परदेशी गेल्यावर त्यांच्या दृष्टीने करियर आणि पैसा या पूढे बाकी सर्व व्यर्थ ठरतं.
खरं तर ही गुलामी आहे. मग ‘माझा गाव माझा देश‘ हा विचारच गळून पडतो. तिथल्या ऊच्च राहणीमानाची सवय होते. आपल्या इथलं जीवन, राहणीमान, कल्चर हे निरस वाटू लागतं आणि तो स्वतःच्यात रममाण होतो आणि बाकी सारं विसरुन जातो. मग गावाची, देशाची ओढ राहत नाही.
मुलं पाठवले परदेशात
आई संगे म्हातारा बाप कण्हतो…
अंत्यविधी उरकुन घ्या
पैसे पाठवतो असं पोटचा गोळा म्हणतो…
असे का…? आता ही पाश्चात्य देशात राहिलेली, तिथल्या राहणीमानास सरावलेली, त्या संस्कृतीत रममाण झालेली. तिथल्या सुखासीन वातावरणात शुन्यातून विश्व निर्माण करताना आपले आईवडील, आपला देश, गाव, परिवार, स्नेहीजन हे सर्व क्षुल्लक ठरतं त्यांच्यासाठी.. करीयरच्या नावाने फक्त पैसा कमावणं हेच ध्येय राहतं.. ही मंडळी परत येणार नाही हे गृहित आहे. त्यांच्या आई-वडीलांनी तशी मानसिक तयारीही केली असते. म्हणून ही मंडळी “वृद्धाश्रम” ही काळाची गरज आहे असं समर्थन करताना दिसतात.
मुलांनी भरपूर शिकावं, भली मोठी ऊडान मारावी हे सर्वच आईबापांचं स्वप्न असतं. पण सर्वात महत्वाचे आपले आईवडील, मग गाव, सगेसोयरे आणि सर्वात महत्वाचे आपला देश. वेगवान जीवन शैलीच्या प्रवाहात पैशाच्या लालसेपोटी पाल्यावर संस्कार करण्यात कमी पडतो आपण.
पैशाविणा कुठलंही नाटक होऊ शकत नाही हे वादातीत सत्य आहे. पण.. पैसा कमावणे हेच ध्येय समोर असू नये. तेच ध्येय समोर असलं की या मुलांच्या समोर आपली संस्कृतीसह सर्व कुचकामी ठरते हेच आपण विसरतो.
आज जगण्यासाठी कितीसा पैसा हवा… तुमची हौस, मौज, चैन, दोन टाईम नाश्ता भोजन आणि शांत झोप मिळाली की… बस्स…! प्रामाणिकपणे, कुणाला न लुबाडता कमावलेला पैसा असला की भरुन ऊरलं.
आपला भारतदेश शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी प्रयत्नशील आहे. आणि हवं तेवढं ऊच्च पातळीवरच शिक्षणही आपल्याकडे मिळतं असावं असं आपण म्हणू शकतो. कारण इथे घेतलेल्या शिक्षणावरच तर ही मुले पुढे प्रगती करताना दिसतात. चांगल्या नोकऱ्या मिळवतात, परदेशी शिक्षण घेण्यासाठी जातात हे तर मान्य करावेच लागेल.
आपला मुलगा परदेशस्थ आहे हे आईबाप छाती पुढे काढून सांगतात. हातपाय साथ देत असतात तोवर त्यांच्या जीवावर चार दिवस परदेशात हौसमौज करुन येतात. मग मावळतीच्या परिस्थितीत मुलाच्या नावाने का रडतात ? हे न ऊलगणारं कोडं आहे.
आपल्या जन्मभूमीत ऊच्च शिक्षण घ्यायचं आणि तेच बोट धरुन पाश्चात्य देशात ऊडान घ्यायची आणि आपली अक्कल, ज्ञान, बुध्दी आणि नीतीमत्ता पैशासाठी पाश्चात्य देशामधे गहाण टाकायची. अरे, कुठल्या शुन्यातनं आपण विश्व निर्माण करीत आहोत..?
असे किती पालक आहेत, त्यांनी त्यांच्या पाल्यांची तयारी केली आहे की, तिथं जा…ऊच्च शिक्षण घे… नोकरी कर.. रग्गड पैसा कमाव. पण .. पण तुझ्या ज्ञानाचा, अनुभवाचा ऊपयोग हा आपल्या जन्मभूमीसाठी कर… बाप म्हणून मी सक्षम आहे. मला तुझी सेवा नको. पण जे काही करशील ते देशासाठी आपल्या जन्मभूमीसाठी कर…
आज पाश्चात्य विद्यापीठे आपल्या मुलांना भरभरुन स्कॉलरशिप जाहिर करुन आपले टॕलेंट खेचू पाहतेय. आज हिच ताकद आपल्या भारत देशाच्या कामी आली तर भारत महासत्ता व्हायला कीतीसा वेळ लागेल ? पण नाही. गुलामगिरी ही आमच्या नसानसात भिनली आहे. आपल्याला त्यातच आनंद आहे.
तुम्ही विचार करुन सांगा. याच भूमीवर एक बाप असा आहे की, शिकलं सवरलं आपलं एकुलता एक पोर सैन्यात भरती करतो आणि देशसेवेसाठी देशाच्या सीमेवर ताठ मानेने पाठवतो. तर मग हा दुसरा बाप कुठल्या संकल्पनेत बसवावा..?
हे झालं परदेशी असलेल्या विषयी… इथं काय वेगळं चित्र आहे असं नाही. (सरसकट नाही म्हणता येणार पण) आई वडीलांची जबाबदारी नाकारणारी पोरं इथेही आहेत. बायकोचे आई-वडील जावयाकडे आनंदाने राहतात. पण जन्मदाते बेवारशासारखे जगताना दिसतात. सासू सासऱ्यांना घरचे जेवण आणि आईवडीलांना डब्याचे जेवण पुरवणारे अनेक वीर आपल्या आसपास आहेत.
आपणच आपल्या आईवडीलांशी कसे वागतो हे मुलांनी पाहिले असते. हे कुणाला शिकवाव लागत नाही. अजाणते पणे आपणच मुलांवर संस्कार करीत असतो. ही आपलीच देन असते. आपणच जर आईबाबांची जबाबदारी पार पाडली नसेल तर मुलांनी शेवटच्या क्षणी मला सोबत करावी ही अपेक्षा कितपत योग्य आहे..?
आईवडील खस्ता खाऊन मुलाला ऊच्च शिक्षण देतात. चांगल्या नोकरीतन चांगला पैसा हातात येतो. चांगली शिकलेली बायको मिळते. हौस मौज करता यावी, कुणाचं बंधन नसावं म्हणून तीलाही ब्लॉक हवा असतो. म्हणजे वेगळं झाल्याचं, सासूसासऱ्यांना अलग केल्याचं दुषणही मिळत नाही. मुलीला सासू सासऱ्याची जबाबदारी नको म्हणून पालघर पर्यत ब्लाॕक हवा म्हणून सांगणारे व्याही आहेतच… मग सूनेशी पटत नाही म्हणून जावयाकडे पेठ मारायला हे मोकळे.
हल्ली बहूतेकांची एकेक अपत्य आहेत. एकच मुलगी असलेले डॕडी आणि मम्मा, शेजारीच ब्लॉक घेऊन देऊन मुलाला त्याच्या आईवडीलापासून वेगळा करुन स्वतःची भविष्यातली सोय करुन घेताना दिसतात. हे समाजातलं विदारक चित्र आहे.
“मी, माझी बायको माझी मुलं” या चौकटितल्या या वडीलधारी मंडळींचे अनेक प्रश्न आज सामाजात भेडसावत आहेत हे खरं आहे. बाहेरदेशी काम करणाऱ्या मुलांच्या आईबापांकडे मुबलक पैसा आहे. पण गावात रहाणाऱ्या वडीलधारी मंडळींच्या खर्चाचा प्रश्न फार गहन आहे. मुंबईत ऊच्चवस्तीत तर जागोजागी ज्येष्ठतम नागरीक कट्यावर, नाक्यावर बसलेले दिसतात. आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं, की निर्माण केलेल्या विश्वातून शून्य… हा प्रश्न त्यांच्या समोर निश्चितच असणार…
ही अडचण असलेली मंडळी कुठेतरी वृद्धाश्रमात खीतपत पडण्यापेक्षा पाच- दहा मित्रांनी आपल्या सहचारणीसह एकत्र येऊन स्वखर्चाची संकल्पनेतील ‘मित्राश्रम’ प्रत्यक्ष साकारणे हा पर्याय असू शकतो. तुमचे आचार विचार, मन जुळल्या शिवाय मित्रत्व प्राप्त होत नाही. अनेक वर्षांची ही तपस्या असते. अशी मित्रमंडळी एकत्र येऊन आनंदमयी जीवन जगू शकतात. त्यामुळे त्यांनी साकारलेला हा “मित्राश्रम” हा वृद्धाश्रमापेक्षा कधीही आनंददायीच असेल…

– लेखन : विकास पाटील.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
आई वडिलांनी करायचे काय ॽ वाकास पाटिल यांनी वास्तववादी लिखान केले आहे.प्रत्येक वार्डावार्डात, गावागावात अशी परिस्थिती आहे. एक कुटूंब एक मुल हे धोरण आता सोडावे लागेल. किमान एकतरी अपत्य वृद्धापकाळात सोबत असावे. सर आपण उत्कृष्ट संपादन केले आहे.
श्री. पाटील यांनी मांडलेली संकल्पना खरंच सुंदर आहे. “मित्राश्रम ” हया शब्दातच आपुलकीचा जिव्हाळा जाणवतो. प्रत्येक जेष्ठ व्यक्तीची व्यथा तुम्ही शब्दात मांडलीत. भारतात शिकून परदेशात मुलांनी स्वतः ची हुशारी वापरायची! ही अगदी माझ्या मनातील खदखद,तुमच्या लेखातून वाचनात आणलीत, धन्यवाद! साहेब. भुजबळ सरांनी तो प्रकाशात आणला, खूप धन्यवाद! सर.
नमस्कार, जाधव साहेब.आपण सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. दुर्दैवाने पूर्वी शहरी भागापूर्ती मर्यादित असलेली ही समस्या ग्रामीण भागात ही पसरत आहे. समाजापुढे हे एक मोठेच आव्हान आहे.
प्रिय श्री भुजबळ साहेब,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष असे की, आपल्या दैनंदिन कार्यक्रमानुसार आणि व्यस्त वेळेतून * Newsstorytoday” च्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांवर सर्वंकष विचार आपल्या सकस लेखीनीद्वारे मांडत असता, ते वाचत असताना आपल्या समाजातील विविध समस्या – प्रश्नांवर केलेले भाष्य प्रेरणादायी वाटतात.
आजच्या ” Newsstorytoday ” मधून सन्मा. विकास पाटील यांच्या आजच्या सामाजिक प्रश्नांवर – कौटुंबिक प्रश्नांवर “आई – वडिलांनी करायचं काय ” या सदरातून एक विदारक सत्याची मांडणी केली आहे. त्यांच्या संकल्पनेतून “वृध्दाश्रामा ऐवजी मित्रांश्रमाची ” जर व्यवस्था निर्माण करता आली, तर समाजातील सुशिक्षित एकल पाल्यांचे ( परदेशस्थ झालेल्या पाल्यांचे ) पालक तथा जेष्ठ नागरिक आई वडीलांना कसे त्यांच्या मनासारखे जगता येईल. ही मौल्यवान विचारधारा मांडल्याबद्दल मनापासून अभिनंदन !!
आपला स्नेहांकित, ,
राजाराम जाधव,
उलवे, नवी मुंबई
मला वाटते संस्कार मुलांना घडवतात हेच संस्कार मुले त्यांच्या मुलांकडे देतात त्यामुळे मूळ पक्के असेल तर घराचा वटवृक्ष सुंदर बहरेल
खरं आहे. मी स्वातंत्र्य सेनानी जन्मदात्ांची (आई-वडील दोघेही) स्वातंत्र्य मिळाल्यावर देशभक्तीचं भांडवल न करता ते संसाराला लागले. आम्हालाही देशाची ओढ असल्यानं पन्नाशी उलटेतो समाजकार्य करत आम्ही संसार करत होतो. अर्थातच बँकबॅलेन्स प्रचंड नव्हता. पण मराठी समाजाचे कैवारी म्हणवणारे शासन करत असताना मुख्यमंत्री सदनिका प्रकल्पात अर्ज केलेल्या मला ९ वर्षांनी अशुद्ध मराठी भाषेत पत्र आलं.
कर्ज काढून मंत्रालयात चेकनं पेमेंट केलं. त्यासाठी कोणतीही ऑफर नसताना फंड मिळवायला निवृत्त झालो. आणि मंत्रालया्त केलेला व्यवहार इंटिलिजंट फ्रॉड ठरून आम्ही ना नोकरी ना छप्पर अशा अवस्थेत रस्त्यावर आलो. माझे वडील नखात रोग नसलेले. तरी अशा स्वातंत्र्यासाठी आम्ही लाठ्या नव्हत्या खाल्या असं म्हणत त्यांनी झुरून देह ठेवला. त्याचं ना शिवसेनेला सुतक की पश्चात्ताप. अतिशीत देशात येऊन आम्ही विसावलो. कारण प्रामाणिक व्यवहार हा आमच्या सवयीचा प्रांत नि इथे संस्कृतीचे ढोल पिटत कुणाचा कैवार घेण्याचा आव आणून स्वकीयांना लुटणारं सरकार नाही. आमची भाकरी कुणी हिसकावणार नाही. मग वेळीच परदेशी जाणारे तरुण दोषी कसे, याचा विचार व्हावा.