Thursday, February 6, 2025

आई

९ मे हा जागतिक मातृदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने लेखिका अर्चना शंभरकर यांनी त्यांच्या आई विषयी जागविलेल्या आठवणी…...

विमलताई गाडेकर म्हणजे आमची आई. जीवशास्त्रीय दृष्टीने आम्ही तिची चार अपत्य. मी अर्चना शंभरकर, बहिण डॉ. मोना पंकज, दादा डॉ. हेमंत आणि जयंत गाडेकर. पण आईने पालकत्व स्विकारलेले आणि त्यांना स्वःताचे पालकत्व बहाल केलेली अनेक लेकरं तिच्या जाण्यानं पोरकी झाली याची मला पुर्ण जाणीव आहे.
संपुर्ण आयुष्य जगतांना आईची कधीही कोणाबद्दल काही तक्रार नव्हती. असलीच तर केवळ करुणा आणि प्रेम. याच भावनेसोबत तिने प्रत्येकाला आपल्या हृदयात जागा दिली.

आई म्हणून तर प्रेमळ, प्रसंगी कठोर होऊन शिस्त लावणारीं, मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत म्हणून धडपडणारीं  होतीच. तशीच ती अनेकांची  माय होती. त्यांच्या जाण्याने मागे होणारा आक्रोश काळीज हेलावणारा होता.

आईचं व्यक्तीमत्व उत्तुंग होतं. अनेक पैलु होते तिच्या आयुष्याला. ती सामाजिक कार्यकर्ती होती. उत्तम कवयित्री होती. ती अनेकांची चांगली मैत्रीण होती. मार्गदर्शक होती. पालनकर्ती, प्रेरणास्थान होती. अभिजात आणि अष्टपैलू होती.

आयुष्याचा पट
आईची आई अनुसयाबाई सुरडकर स्वतः साहित्यिक होती. चौथा वर्ग शिकलेल्या असल्याने तिने अनेक कविता लिहुनही ठेवल्या होत्या. तिला अनेक लोकगितं तोंडपाठ होती. मुलांनी शिकावं, मोठं व्हावं आणि समाजाचे आपण देणे लागतो याची ती सतत जाणीव करुन द्यायची .

पोलीस खात्यातील वडील असल्यामुळे शिक्षणाची सोय होती. अभ्यासात हुशार असल्याने आपल्या विमलने डॉक्टर व्हावे असे नारायणराव सुरडकर यांना वाटायचं. दहावीत असतांनाच मोठ्या बहिणीच्या, सुमनताई गाडेकर यांच्या दिराचं स्थळ आलं आणि विमल सुरडकर अठराव्या वर्षीच विमल गाडेकर झाली.

मेकॅनिकल इंजिनियर असलेले भगवान गाडेकर यांनी पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि इंटर पासून ते एम.ए.- बी.एड., एम.एड. पर्यंतचं शिक्षण घर सांभाळत घेतलं. याच दरम्यान आम्हा चौघांचा जन्म झाला.
छोट्या मोनाच्या वेळेस तर ओली बाळांतीन असलेली आई  दवाखान्यातूनच पेपर द्यायला गेली होती . छोट्या मोठ्या नौकऱ्या आणि ट्युशन क्लासेस करत असतांना तिने सोबतच नाटकात काम केले. लहान मुलांसाठी नाटकं लिहीली, बसवली. नाट्यस्पर्धेत बक्षीसं मिळविली. एव्हढच नाही तर डॅडी देशमुख यांनी काढलेल्या, राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या नाना पाटेकर आणि मधु कांबिकर यांच्या ‘राघु मैना’ या चित्रपटात छोटीशी भुमिका देखील साकारली.

भद्रावती, पुणे, ब्रम्हपुरी, अकोला असा बाबांच्या नौकरी निमित्ताने प्रवास होत होता. प्रत्येक ठिकाणी काहीतरी नविन करुन तिथल्या स्थानिक लोकांना प्रेरित करण्याचे काम आई करित असे. भद्रावतीला ॲड राम खोब्रागडे, नेताजी करमरकर, वसंत कांबळे,  मधुकर चव्हाण  या आपल्या मित्रांच्या सोबतीने फ्रेंड्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मागास आणि गरिब समाजातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यास सुरुवात केली. आजही जवळपास पंचेचाळीस वर्ष जुनी आणि शंभर टक्के निकाल देणारी ही शाळा गोरगरिब आणि मागासवर्गीय मुलांसाठी सुरु आहे.

महिलांसाठी समाजकार्य
चंद्रपूरला आल्यानंतर जनता महाविद्यालयात समाजशास्त्र या विषयाची प्राध्यापक म्हणून आईने नौकरी केली. तेव्हा रिक्षावाला, दूधवाला यासारखे असणारे तिचे विद्यार्थी आज समाजात मान्यवर म्हणून ओळखले जातात. मृदु आवाजात शिकविणाऱ्या गाडेकर मॅडम पुस्तकाच्या बाहेरची उदाहरणं देऊन शिकवितात म्हणून तिच्या वर्गात  विद्यार्थ्यांची कायम शंभर टक्के उपस्थिती असायची. पुस्तकी अभ्यासाबरोबरच प्रत्यक्ष संस्कार शाळाच ती घेत असे.

माझ्या बाबांना त्यांच्या नौकरीत समस्या आल्यानंतर योग्य मार्गदर्शन मिळू शकले नाही. याच कारणामुळे त्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला होता. सुशिक्षीत लोकांना जर मार्ग सापडत नाही तर अशिक्षीत लोकं काय करत असतील? या प्रेरणेतुन आईने समाजकार्यात पुर्णतः झोकुन दिले. सुरवातीला कौटुंबिक कलह असलेले लोक तिच्याकडे समुपदेशनासाठी येत. हळू हळु हा व्याप वाढत गेला. मग चंद्रपुरातल्या तत्कालीन सर्व  छोट्या मोठ्या महिला मंडळांना एकत्रित करुन ‘संयुक्त महिला मंच’ स्थापन केले. हिराबाई टंडन, जया द्वादशीवार, इंदुमती लहाने, इंदुमती पाटील, ज्योती जीवने, तारा मेश्राम, ललिता बेहरम, प्रतिभा पोटदुखे, प्रतिभा वाघमारे, शकुंतला वरभे, यशोधरा कवाडे, अश्विनी खोब्रागडे अशा अनेक महिला कार्यकर्त्यांना तयार करणारी संयुक्त महिला मंच एक प्रकारे शाळाच ठरली. आज चंद्रपूरमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या जडण घडणीत त्यांचा वाटा आहे.

वेगवेगळ्या विचारधारेच्या असल्या तरी एका उद्देशाने काम करतांना सर्वांना एकत्रित बांधुन ठेवण्याचे काम आईच्या अद्‍भूत व्यक्तीमत्वालाच शक्य झाले.
शोभाताई फडणवीस, डॉ. रजनी हजारे, शोभाताई पोटदुखे यांच्या सोबत ‘मर्दानी महिला’ मंडळात तिने काम केले. चंद्रपुरात दारुबंदी व्हावी यासाठी स्वःता दारु विकणाऱ्या  बाईसारखे कपडे घालून तिने निदर्शनात भाग घेतला होता.

कचरा वेचणाऱ्या मुला मुलींना घरोघरी जाऊन घेऊन यायचं, त्यांना आंघोळ घालायची आणि संध्याकाळी मंदिराच्या पारावर त्यांना अक्षर ओळख करुन द्यायची हा उपक्रम तिने चालविला. यशोधरा कवाडे यांच्यावर या शाळेची तिने जबाबदारी दिली होती. झिपऱ्या, नाक पुसत रस्त्यावरुन जाणाऱ्या या मुली आज शिकून सवरुन स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. अनेक मुलं जी व्यसनांच्या आहारी जाऊन आयुष्य उद्ध्वस्त करुन बसली असती, ती आज स्वयंपुर्ण झाली आहेत.

महिलांसाठी उद्योग उभारणी, शिवण क्लास, कागदी पिशव्या तयार करणे यासारखे अनेक उपक्रम महिला मंचच्या माध्यमातून होत आहेत. आज ही संस्था  तीस वर्ष कोणत्याही अनियमिततेशिवाय  कार्यरत आहे. याचे श्रेय आईच्या संघटन आणि नेतृत्व कौशल्यालाच आहे .
परितक्ता महिलांची परिषद घेतली जाऊ शकते हा विचार आईच करु शकली . सितेला देखील परित्यक्ता म्हणून मानहानी सोसावी लागली होती. विमलताईंनी या सगळ्या महिलांना त्यांच्या ताकदीची जाणीव करुन दिली. यासाठी स्मिता पाटील स्मृती पुरस्काराने तिला सन्मानित केले गेले . ही पुरस्काराची रक्कम तिने तिथेच देणगी म्हणून देऊन टाकली होती. त्यापुढे कोणत्याही पुरस्कारासाठी आपले नाव सुचविले जाऊ नये यावर आई कटाक्षानं लक्ष देत असे.

अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयातून शासकीय पुरस्कारासाठी तिच्या नावाची शिफारस होण्याबद्दल विचारणा झाली .अनेक संस्थांनी तिला पुरस्कार देऊ केले. पण तिच्या जवळ समस्या घेऊन आलेल्या व्यक्तीची समस्या सोडवून देणे आणि एका जीवाला समाधान मिळवून देणे हाच तिने पुरस्कार मानला.

आईने परितक्त्या महिलांसोबतच फसवल्या गेलेल्या कुमारी मातांच्या पुनर्वसनासाठी कार्य केले. आमच्या घरातील मागची खोली ही कायम अशा एखाद्या निराश्रीत मुलीसाठी राखीव असल्या सारखीच होती. अनेक कुमारी मातांचे या खोलीत तिने बाळंतपण केले. त्यांच्या मुलांना नावं दिली. कधी प्रसंगी ते मुल दत्तक दिले, बाळाच्या आईचे लग्न लावून तिला समाजात पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली.

‘राजी खुशी’ विवाह मंडळात अनेक आंतरजातीय विवाह लावून दिले. घरच्याचा विरोध असेल तेव्हा ही मुलं इथे आधाराला यायची. त्यांना संसारासाठी उपयोगी सामान  घेऊन द्यायचे. एवढच नव्हे जिथे कडक भूमिका घ्यायची तिथे  प्रसंगी  शकुंतला वरभे, शालीनी भगत यासारख्या कार्यकर्त्या तिच्या एका आवाजावर रस्त्यावर उतरत .

पोटातील कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर वर्षभरातच पुन्हा उभारी घेणारीं आई सतत चंद्रपूरच्या आपल्या मित्र मैत्रीणींच्या संपर्कात होती . संयुक्त महिला मंचच्या स्थापनेचे पंचविसावे वर्ष तिने चंद्रपूरला जाऊन साजरे केले. यानिमित्ताने चंद्रपूरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व महिलांची एकत्रित माहिती असलेला ‘चंद्रपूरच्या हिरकणी’ ही स्मरणिका काढली. चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रत्येक अभ्यासकांनी संग्रही ठेवावा असा हा अंक आहे. वर्षा अविनाश, अश्विनी खोब्रागडे, प्रतिभा खोब्रागडे, मृणाल कांबळे, मनिषा वरभे, मंदा पडवेकर, आरती टाके, वनश्री मेश्रा, अल्का मोटघरे, शायदा बानो  या तरुण पिढीतील शिलेदार तिचे कार्य पुढ़े नेतील यात शंका नाही.

आंबेडकरीं चळवळ
प्रत्येकाला आशिर्वाद देतांना आईचे सतत एकच सांगणे असायचे ते म्हणजे ‘धम्म मार्गाने चला’. स्वतः पंचशिलाचे पालन करित जगत असतांना इतरांकडून तिची एवढीच अपेक्षा होती. भारतीय बौद्ध महासभेत तिने सक्रीय काम केले. चंद्रपूरच्या दिक्षा भूमीवरील कार्यक्रमात तिचा सहभाग असायचा. कोणत्याही राजकारणात न पडता प्रत्येकासाठी तेवढ्याच पोटतिडकीने तिने काम केले. हा अमुक गटातला, हा वेगळ्या पक्षाचा असा भेदभाव तिने केला नाही . म्हणूनच ज्योती जीवने, ताराताई मेश्राम, या तिच्या मैत्रिणी तिला ‘अजात शत्रू’ म्हणत असत. प्रकाश आंबेडकरांच्या तत्कालिन भारिप बहुजन महासंघ या  पक्षाने त्यांना चंद्रपूरच्या नगराध्यक्ष पदासाठी तिकीट दिले होते. चंद्रपूरसाठी खूप काही करण्याची मनिषा असलेली आई जनतेच्या मनातील नेता होती . निवडणूकीची गणितं तिला जमली नाहीत. शाम वानखेडे, सुधीर मुनगंटीवार, शांताराम पोटदुखे, नरेश पुगलीया, अशा सर्व विदर्भातील नेत्यांनी तिचे मोठेपण मान्य केले होते.

तिने बाबासाहेबांवर लिहीलेली कविता चंद्रपूरचे सुप्रसिद्ध कलावंत हेमंत शेंडे, राहूल सुर्यवंशी यांनी आपल्या गायनातून अजरामर केली. ‘प्रकाश पर्वा सुर्यफुला तू भारत भू नंदना भीमा तूज शतकांची वंदना’ हे गीत आजही बुद्धा टिव्ही, आवाज टिव्ही यावर लागत असतं. भिमराव आंबेडकरांची खंबीर सावली, जी चंदनाप्रमाणे झिजली ती रमाई हिच्या जीवनावर तिने दीर्घ काव्य लिहीले. ‘चंदनी दरवळ’ हा तिचा काव्य संग्रह. या कवितेचे सादरीकरण ती स्वतः करें . आजही अनेक ठिकाणी कलावंत या कवितेचे सादरीकरण करित असतात .

साहित्यिक प्रवास
लहानपणी घरात काम करतांना देखील पाना फुलांशी बोलणारी हळव्या मनाची छोटी विमल मोठे पणी कवियत्री होईल हे तिचे मोठे बंधु सुधाकर सुरडकर यांनी ओळखले होते. त्यांच्या सामाजिक कामाच्या अनुभवावर आधारित ‘बांगडी बिल्लोर’ हे सदर तरुण भारत मध्ये प्रकाशित झाले होते. जेल मधल्या बंदी असलेल्या महिलांच्या कथा लोकसत्ताने ‘भींती आड’ या सदराखाली छापल्या. त्यांचे लोकमत मध्ये छापून आलेले ललित लेख त्यांच्या काही चाहत्यांनी आजही जपून ठेवलेले आहेत. त्यांचा सर्वात पहिला कविता संग्रह १९९३ मधे  आलेला  ‘ऋतुबंध’ या कविता संग्रहाने संपुर्ण महाराष्ट्रात तिचा चाहता वर्ग तयार झाला . कवी ग्रेस, प्रा. सुरेश द्वादशीवार, व.पु काळे , सुरेश भट, प्रतिमा इंगोले यांच्यासारख्या मोठ्या साहित्यिकांसोबत तिची विशेष मैत्री होती. छोट्या शब्दांच्या कविता महाविद्यालयातील तरुण तरूणी तोंडपाठ म्हणायच्या, तिच्या संग्रहातील या काही ओळी –
‘चाऊन फेकलेला
चोथा जुनाच आहे
अनुभव तरी जगण्याचा
हरेकास नवाच आहे’

तिची कविता प्रत्येकाला आपली वाटते. आणि म्हणून ती अधिक हृदयाला भिडते. त्या नंतर दुसरा कविता संग्रह काढायला तिने अनेक वर्ष जाऊ दिली. आजही मराठी भाषेत नेट ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या कवितासंग्रहावर परिक्षेत प्रश्न विचारले जातात. त्यानंतर काही प्रातिनिधीक कविता संग्रह आले. गुलमोहर, चांदन चुरा. सन २००९ मध्ये ‘दरवेळी’ हा कविता संग्रह आला. ‘पार्टी’ हा कथासंग्रह आणि रमाईच्या जीवनावर आधारित ‘चंदनी दरवळ’ हा कविता संग्रह अलिकडे २०१७-१८ मध्ये आला आहे. दलित कवियत्रींवर पीएचडी करणाऱ्या दोन विद्यार्थीनींनी त्यांच्या साहित्याचा यापुर्वी समावेश केला आहे.

गोंडवाना विद्यापिठातील दोन विद्यार्थी तिच्या साहित्यावर संशोधन करणार आहे. त्यांच्यासाठी विमलताईंचे अप्रकाशित साहित्य संकलीत करून ते वेबसाईटवर टाकण्याचं काम तिचा नातू रिची शंभरकर याने हाती घेतले आहे. हे काम पुर्ण होण्या अगोदरच विमलताईंनी या  २६ मार्च २०२१ रोजी या जगाचा निरोप घेतला. असे असले तरी, ती तिच्या कामातून, विचारातून आणि तिने जीव लावलेल्या अनेक लेकरांच्या मनामनातून ती कायम जीवंत राहणार आहे एवढं मात्र निश्चित.
शेवटी आईची आवडती कविता इथे देते.
झाड
बहरल्या झाडाला
बस “देणं” एक माहीत असतं
आल्या-गेल्या पाखराला
बहार आपला लुटवीत बसतं

उडती पाखरं ही
असंच झाड नेमकं हेरतात
चोचीपुरता गुंजारव करीत
त्याला घेरतात

बदलत्या मोसमात
रंग हजार बदलते
हजार हातांनी याचं
देणं मात्र कायम असते

पानगळीमध्ये
झाड आपलं उघडं पडलं
वाळल्या झाडाला
वळवांनी पार पोखरलं

आठवणीच्या पक्ष्यांना
झाड सारखं पुसतं
गाणं म्हणत येणारी
ती पाखरं कुठं गेली

मी तर इथचं उभा
पाखरं कशी रस्ता चुकली ?
उरे उडत्या पाखरांनो
असलं गाणं बंद करा

तुम्ही मला लुटलेलं नाही !
मीच तुमच्यासाठी बहरलो होतो
आणि असं म्हणा –
एकेकाळचं तुमचं चिवचिवणं
प्रेम होतं
माझ्यावरलं प्रेम होतं
म्हणा- निव्वळ प्रेम होतं.
पण
उन्मत त्या पाखरांनी
गाणं आपलं बदललं नाही
अन् आठवणीच्या पक्ष्यांनी
झाडाला टोचणं सोडलं नाही
मग पोखरलेल्या झाडाला
उन्मळून पडायला
काही वेळ लागला नाही

रचना : – विमल गाडेकर.

– लेखन : अर्चना शंभरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. आईची महती अन् तिची थोरवी याची उत्तम मांडणी केली असल्यामुळे आपण आईचा जीवनपट समर्पक पणे मांडला आहे.

  2. शंभरकर अर्चना शंभरकर यांनी आपल्या मातेबद्दल लिहिलेले विचारामुळे माझ्या आईची आठवण प्रकर्षाने जाणवली आहे. आईचं थोरपण खूप चांगल्या शब्दात मांडणी करून सादर केले आहे. आपल्या आई चे कार्य वाचून मनाला खूप मोठे समाधान लाभले आहे.. आई चे कार्य खरोखरीच महान असेच होते… आजच्या मातृदिन विनम्र अभिवादन…

  3. लेख वाचला फार छान लिहिलेला आहे
    इतकं सविस्तर आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कोणीच लिहु शकत नाही ते आपण लिहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा.
    आजच्या तरुण पिढीने ते वाचायला पाहिजे आणि आपल्या जीवनात अवगत करायला पाहिजे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी