मातीवरचा आक्रोश आता,
आकाशात पण नाही मावत !
बातमी केवढा आघात करते,
“आता नाहीत बिपिन रावत !”
नुसतंच शौर्य नव्हते रावत,
तिन्ही दलात समन्वय !
किती वीर रोज जातात,
तरी होत नाही सवय !
दर दिवशीच एकेक तारा,
उल्का होऊन पडत आहे !
खरंच गळ्यात हुंदका म्हणून,
एकेक घास अडत आहे !
शौर्य तिथेच घात असतो,
गांडुळं काय फिरतात कमी?
त्याना गाठू शकेन अशी,
यमालाही नसते हमी !
उंचावरती जाणंच सांगतं,
इंचा-इंचावरती धोके !
लोणी खावून जमिनीवरती,
खादीत निर्धोक,खादाड बोके !
चालती बोलती तटबंदीच ही,
भारतगड सुखरुप ठेवते !
हुतात्म्यांच्या माळेमधे,
आपल्या सर्वस्वालाच ओवते !
काळालाही हेवा वाटतो,
म्हणून दगा हवेत देतो !
साक्षात् देव आसन सोडून,
असे वीर कवेत घेतो !
असह्य नि असहाय म्हणजे,
काय याचा अनुभव क्रूर !
पापणी सोडून एकेक थेंब,
त्यांच्यासोबत चाललाय दूर.

– रचना : प्रमोद जोशी