थोर गांधीवादी, भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे यांची आज; ११ सप्टेंबर जयंती आहे. त्या निमित्ताने हा विशेष लेख.
आचार्य विनोबा भावे यांना विनम्र अभिवादन.
— संपादक.
आपल्याला चांगले म्हणावे, आपले कौतुक व्हावे,आपणास पुरस्कार मिळावेत असे वाटणे, तसेच, तसे झाले नाही तर दुःखी व्हावे, क्वचित आपणावर अन्याय झाला आहे असे वाटावे यात काही गैर नाही. मानवी स्वभावाला अनुसरूनच ते आहे. परंतु काही माणसे अती अती दुर्मिळ गटात मोडतात. अशाच एका माणसाची ही गोष्ट.
स्वातंत्रपूर्व काळ
विनोबा वर्ध्याच्या आश्रमात त्यांना आलेले टपाल पहात होते. त्यांच्या समोर कमलनयन बसला होता. कमलनयन जमनाल बजाज यांचा मुलगा. (पुढे प्रसिध्द उध्योगपती कमलनयन बजाज) जमलालजींनी आपली मुले ‘नई तालीम’ साठी वर्ध्याच्या आश्रमात ठेवली होती.
विनोबांनी टपालातील एक पाकीट उचलले. त्यात साबरमती आश्रमातून आलेले महात्मा गांधींचे पत्र होते. विनोबांनी पाकीट उघडून पत्र बाहेर काढले. पत्र वाचून होताच लगेचच फाडून कचर्याच्या टोपलीत टाकले. कमलनयला खुप आच्छर्य वाटले. त्याच्या मनात विचार आला “बापूनी चांगलेच झापलेले दिसतय”. त्याची बालसुलभ उत्सुकता जागी झाली. विनोबा जाताच त्याने कचर्याच्या टोपलीतील विनोबांनी फाडलेल्या पत्राचे तुकडे बाहेर काढले. तुकडे आकाराप्रमाणे जुळवले. पत्र वाचताच त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. ते स्तुतीपर पत्र होते.
गांधीजींनी विनोबांचे कौतुक करताना पत्रात लिहिले होते. “तुमसे बढकर उची आत्मा मैने आज तक देखी नही।” आपण असतो तर ते पत्र फ्रेम करून भिंतीवर लावले असते. उगाच नाही १९४० च्या वैयक्तिक सत्याग्रहात पहिला सत्याग्रही म्हणून गांधीजींनी विनोबांची निवड केली होती. दुसरे सत्याग्रही होते जवाहरलाल नेहरू. विनायकचे विनोबा गांधीजीनीच केले होते. विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा म्हणण्याची महाराष्टातील परंपरा त्यांना माहीत होती.
पंडीत जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, “मी जगभर फिरताना मोठमोठ्या माणसांना भेटलो आहे. परंतु आज मी तुम्हाला सांगू शकतो, आज जगात विनोबांच्या उंचीचा एकही माणूस नाही.”
विनोबा ज्ञानयोगी होते. त्यांना भारतीय व विदेशी अशा २२ भाषा अवगत होत्या. स्वातंत्र्य आंदोलनात विनोबा वेल्लोर तुरुंगात होते. तेथे त्यांनी तमिळ, तेलगु, कन्नड व मल्याळम अशा चार दक्षिण भारतीय भाषांचा अभ्यास केला. विनोबा पहाटे तीन वाजता उठायचे आणि अध्ययन करायचे. एकदा एक युरोपीय अभ्यासक विनोबांशी चर्चा करत होता. परंतु त्याला त्याच्या बेताच्या इंग्रजीमुळे नीट व्यक्त होता येत नव्हते. त्याच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे विनोबांनी त्याची मातृभाषा ओळखली. पुढील चर्चा स्पॅनिश भाषेत झाली !
गीतेत वेगवेगळ्या भाष्यकारांना वेगवेगळे योग दिसले. शंकराचार्याना ज्ञानयोग, ज्ञानेश्र्वरांना भक्तियोग, टिळकांना कर्मयोग, गांधीजींना अनासक्तियोग ; तसा विनोबांना साम्ययोग. आपल्या आईला गीता सहज समजू शकेल यासाठी मराठीत सुबोध भाषेत त्यांनी गीतेचा ‘गीताई’ नावाने समश्र्लोकी अनुवाद केला. महात्मा गांधी एका ठिकाणी म्हणतात, “जगातील एकच पुस्तक वाचायला मिळणार असेल, तर मी ईशावास्य उपनिषद निवडेन.” केवळ अठरा श्र्लोक. पण भारतीय तत्वज्ञानाचे सार या पुस्तकात आहे.
एकदा गांधीजी विनोबांना म्हणाले की, “सहज समजेल, असं एक टिपण तू संस्कृत ईशावास्य उपनिषदावर तयार कर.” विनोबांनी त्यावर ‘ईशावास्य वृत्ती’ हे अद्वितीय भाष्य लिहिले. १०८ ‘साम्यसूत्रे’ विनोबांनी सस्कृतमध्ये रचली आहेत. १८ निवडक उपनिषदांचा मराठी अनुवाद म्हणजे त्यांचे ‘अष्टादशी’ हे पुस्तक. तसेच त्यांच्या विचारांचे मर्म सांगणार ‘मधुकर’ अद्वितीय निबंध संग्रह.
विनोबांनी धुळ्याच्या कारागृहात १९३२ साली गीतेवर प्रवचने दिली. ती सानेगुरूजींनी टिपून ठेवली. पुढे पुस्तकरुपाने ती प्रसिध्द झाली. ‘गीताई’ ही विनोबांनी १९३२ मध्ये लिहिलेली भगवद्गीतेची समश्र्लोकी (भाषांतर) आवृत्ती आहे. जी त्यांनी आपल्या आईच्या सांगण्यावरून, गीतेचा अर्थ सोप्या मराठीत समजून समजून देण्यासाठी तयार केली. गीताईला प्रचंड लोकप्रियता लाभली.
आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली गावात विनोबांनी भूमिहीनांची दयनीय स्थिती पाहिली. त्यांनी ग्रामसभेत भूमिहीनांसाठी जमीन देण्याचे आवाहन करताच रामचंद्र रेड्डी यांनी स्वेच्छेने आपली १०० एकर जमीन दान केली. ‘सबभूमि गोपालकी, सब संपत्ती रघुपतिकी’ असा उद्घोष करत विनोबांनी भूदान यज्ञास प्रारंभ केला. दानात मिळालेली जमीन परत भूमिहीन व्यक्तींना आणि सामूदायीक उद्देशांसाठी वितरीत केली गेली.
विनोबाजीना १९५८ साली पहिला आंतरराष्ट्रीय ‘रॅमन मॅगसेस’ पुरस्कार प्राप्त झाला. तर १९८३ साली मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला.
पराग चोळकर आणि ‘एमकेसीएल’चे विवेक सावंत यांनी विनोबांचे व विनोबा बाबतचे संकलित केलेले सुमारे एक लक्ष पृष्टांचे सर्व साहित्य इंटरनेटवर www.vinoba.in या संकेत स्थळावर आज उपलब्ध होत आहे.
रायगड जिल्ह्यातील गागोदे येथे ११ सप्टेंबर १८९५ रोजी जन्मलेल्या विनोबाजींनी आपल्या जीवनाची इति कर्तव्यता झाली आहे, असे जाहीर करून प्रायोपवेषन सुरू केले आणि १५ सप्टेंबर १९८२ रोजी प्राण त्याग केला.
ज्ञानयोगी, कर्मयोगी अशा पुज्य विनोबांना त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.

— लेखन : श्या.गो.पाटील. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800