आजचा दिवस विशेष आहे, कारण आजचा दिवस परत कधी उगवणार नाही आणि आपण भाग्यवान आहोत की हा आजचा दिवस पाहू शकतोय, इथे येऊ शकतोय, म्हणजेच आपले जीवन हे निसर्गाशी पूर्णपणे संबंधित आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच आपले दैनंदिन जीवन हे निसर्गानुसार असले पाहिजे, असे प्रतिपादन उरळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमाचे प्रमुख डॉ अभिषेक देविकार यांनी केले. ते आश्रमातील व्याख्यानात मार्गदर्शन करताना बोलत होते.
डॉ अभिषेक देविकार पुढे म्हणाले की, महात्मा गांधी यांनी स्वतः पोटदुखीसाठी निसर्गोपचार घेतले आणि ते बरे झाले. त्यामुळे त्यांनी भारतात निसर्गोपचाराचा प्रचार, प्रसार करण्याचे ठरविले. म्हणून त्यांना “भारतातील निसर्गोपचाराचे पितामह” असे समजले जाते.
प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी असते. म्हणून प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे निसर्गाशी जुळवून घेणे अत्यावश्यक आहे. एकाच गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. त्यानुसार त्या त्या व्यक्तीचे जीवन घडत असते. आमचे एक डॉक्टर नुकतेच २८ व्या वर्षी हृदय विकाराने निधन झाले. ते कशामुळे, याचा आम्ही डॉक्टर मंडळीही विचार करत आहोत.
खरं म्हणजे वैद्यकीय संशोधन खूप झाले असल्याने जगात ८५ वय हे सरासरी वय ठरविण्यात आले आहे. औषधोपचार तुम्हाला वाचवतील, तरीही आजकाल असे अपमृत्यू का होतात ? हा खूप गंभीर प्रश्न आहे.
निसर्गोपचार आश्रमाविषयी माहिती देताना डॉ अभिषेक यांनी सांगितले की आश्रमात भर असतो, तो म्हणजे आजाराला प्रतिबंध करण्यावर. निसर्गोपचारातही जग भर संशोधन सुरू आहे. त्यामुळे उपचार पद्धतीत सुधारणा होत आहे.आजकाल प्रत्येक वस्तू ही प्लास्टिक पिशव्या मध्ये येत आहे. त्याचा परिणाम त्या त्या पदार्थावर होतो. आता कच्च्या भाज्या खाऊ नयेत कारण त्याच्यावर खूप औषधे फवारली जातात आणि त्या भाज्या न शिजवता, न उकडता खाल्ल्यास त्याचा आपला आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणून आता कच्च्या भाज्या खाऊ नयेत. तर त्या उकडून, शिजवूनच खाल्या पाहिजेत. एखाद्या व्यक्तीला नीट पचत नसेल तर त्याने सॅलड खाऊ नये. ते आपल्या पचन व्यवस्थेला मानवत नाही, हे आपण समजले पाहिजे.
संतुलित आहाराबरोबर महत्व आहे, ते व्यायामाचे असे सांगून डॉ अभिषेक म्हणाले, काही ना काही कारणांनी आपण व्यायाम करण्याचे टाळत असतो. यासाठी आपली इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे.
वृध्द, लहान मुलांमध्ये विविध प्रकारचे आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे कारण त्यांची प्रतिकार शक्ती कमी पडत आहे. एकच आजार दोन व्यक्तींना झाला तरी त्यांच्यावर केले जाणारे उपचार सारखे असतील, असे नाही. कोरोनानंतर मधुमेह आणि इतर आजारांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले आहे. लक्षणे बघून उपचार न करता, मूळ कारणे शोधून उपचार केले जातात. एक आजार बरा होत असताना, दुसरा आजार होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. जसजसे वय वाढत जाते, तसतसे शरीर आतून कमजोर होत जाते, असे सांगून त्यांनी इथून घरी जाताना आपल्याला आहार काय घ्यावा, योग, व्यायाम काय करावा, हे लिहून दिल्या जाते. त्याचे घरी गेल्यावर काटेकोरपणे पालन केले पाहिजे. आपली जीवनशैली अशी असली पाहिजे की मुळात आपण आजारीच पडायला नको, असे आग्रहाने सांगितले. यानंतर डॉ अभिषेक यांनी उपस्थितांचे शंका समाधान केले.
प्रारंभी गप्पागोष्टीफेम जयंत ओक यांच्या हस्ते डॉ अभिषेक यांचा न्यूज स्टोरी टुडे चा मग (mug) भेट देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अलका भुजबळ यांनी केले.या व्याख्यानास आश्रमवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
डाॅक्टर अभिषेक देविकर यांचे भाषण खुप महत्वपूर्ण आणि आरोग्याबरोबर मनोरंजनही महत्वाचे आहे हे खुप छान सांगितले.
त्यांचे प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य महत्वाचे होते ते ऐकून आपल्याला निसर्गाबरोबर राहणं किती महत्वपूर्ण आहे ते खुप छान समजावून सांगितले.
धन्यवाद डाॅक्टर अभिषेक देविकर.
त्या बरोबरच सौ.अलका भूजबळ व श्री.देवेंद्र भूजबळ यांचे ही खुप आभार कार्यक्रमाचे आयोजन छान केल्याबद्दल.
खूप छान माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख आहे. हार्दिक अभिनंदन 🙏💐