जशी प्रत्येक सणाची कहाणी आहे, तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. आज या विषयाच्या लेखाच्या निमित्ताने आपण ती कहाणी अभ्यासू या.
एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा आणि स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची सुद्धा घृणा करायचा, त्याला देवतांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरविण्याचा प्रयत्न करीत असे. जेणेकरून त्याचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रल्हाद कशालाच न घाबरता भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे.
या सगळ्या गोष्टींना कंटाळून राजाने एक योजना बनविली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की, ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही व्यक्ती तिला जाळू शकत नाही. राजाने होलीकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीत बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला. त्याचवेळी होलीकेला आठवलं तिला वरदानात असे सांगितले होते की, ज्यावेळी ती वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रल्हादला अग्नी काहीच करू शकला नाही मात्र होलीका त्यात जळून भस्मसात झाली. अशा प्रकारे त्या दिवशी होलिका उत्सव साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी लोकांनी रंगाने उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखू लागले.
आपल्या महाराष्ट्रात होळीच्या दिवशी काही लाकडं मंत्रात जाळण्यात येतात आणि पेटलेल्या होळीला प्रदक्षिणा घालीत लोक नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवितात.
महाराष्ट्रात होळीला नैवेद्य म्हणून पुरणपोळी दाखवण्याची रीत आहे. होळी वसंत ऋतूमध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा भारतीय सण आहे. हिंदू पंचांगानुसार हा फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी एकमेकांना रंगवून धुलीवंदन साजरे केले जाते.
होळी संपूर्ण भारतात साजरी केली जाते परंतु उत्तर भारतात जास्त उत्साहाने साजरी केली जाते. होळीचा हा सण पाहण्यासाठी लोक वृंदावन, गोकुळ, अशा ठिकाणी जातात. मथुरेला होळीच्या दिवशी पुरुष महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात. बऱ्याच ठिकाणी फुलांनी होळी साजरी केली जाते. हा सण गाण्यांसोबत एकमेकांना भेटून आनंदाने साजरा करतात.
मध्य भारत तसेच महाराष्ट्रात रंगपंचमीला अधिक महत्त्व आहे. इथे लोक टोळी बनवून एकमेकांच्या घरी जाऊन गुलालाने एकमेकांना रंगवतात आणि म्हणतात…..
“बुरा ना मानो होली है !”
उत्तर भारतातील इंदोर शहरात होळी अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते. इथे होळीची एक वेगळीच शान आहे. होळीच्या दिवशी शहरातील सगळे लोक एकत्र निघून राजवाडा या ठिकाणी जमतात आणि रंगीत पाण्याच्या टाक्या भरून या रंगीत पाण्याने होळी खेळली जाते, तसेच नाच गाण्यासोबत ही होळी आनंद आणि उत्साहात साजरी करतात. अशा या होळीची तयारी लोक महिनाभर अगोदर पासूनच करीत असतात.
काही ठिकाणी भांग पिणे हा देखील होळीचा एक भाग समजला जातो.भांग पिऊन नशेत मदमस्त होऊन एकमेकांची चूक-भूल माफ करून नाचत गाजत होळी खेळली जाते. होळीच्या दिवशी घरी बरेच पक्वान्न केले जातात. स्वादाने भरलेल्या या भारत देशात सणाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट जेवण केले जाते.
होळीला घ्यायची काही काळजी :
होळीच्या दिवशी सर्वांनी खालील प्रकारची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
१) होळी हा एक रंगाचा सण आहे परंतु सावधानता पाळणे अधिकच गरजेचे आहे, कारण आजकाल एकत्रित केलेल्या रंगांमुळे त्यातील अनेक रसायनांमुळे नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे गुलालाने होळी खेळणे हे जास्त सोयीस्कर आहे.
२) आजकाल रंगामध्ये देखील बरेच अन्य नसले पदार्थ मिसळलेले असू शकतात. त्यामुळे अशा पदार्थांपासून सावध राहणे खूपच गरजेचे आहे
३) चुकीच्या रंगांमुळे डोळ्यांना हानी पोहोचू शकते. त्यामुळे असे रसायन मिश्रित रंग कदापिही वापरू नये. घराबाहेर बनलेली कोणतीही वस्तू खाण्याअगोदर पूर्णतः विचार करा, कारण अशा खाद्यपदार्थांमध्ये मिलावट होण्याची आणि आपल्याला त्यापासून त्रास होण्याची दाट शक्यता असते.
४) सावधानतेने एकमेकांना रंग लावावेत, कोणाची इच्छा नसेल तर उगाच त्याला जबरदस्ती रंग लावू नये.
५) आजकाल होळीसारख्या सणांमधे भांडण होण्याचे प्रमाण खुप वाढलेले आहे.
आपण आतापर्यंत होळीचे पारंपारिक महत्त्व आणि त्या दृष्टिकोनातून घ्यावयाची काळजी याचा अभ्यास केला परंतु आजचा जो विषय आहे त्यानुसार आजच्या काळात होळीचे महत्त्व :
वैचारिक दृष्टिकोनातून अभ्यासावयाचे झाल्यास, आपण रोजच्या नैसर्गिक संकटांना तोंड देत आहोत याच मुख्य कारण जमिनीचा कस कमी होत आहे. निरनिराळ्या ठिकाणी झाडं, वृक्ष पाडून मोठ्या प्रमाणात सिमेंटचे जंगल उभे केले जात आहे. त्यामुळे पाणी पुराच्या स्वरूपामध्ये इमारतींमध्ये जाऊ लागलेलं आहे. त्यामुळे पावसाळ्यात सर्वत्र वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याचे चित्र आपण पाहतो आहोत. या सगळ्याला एकमेव कारण केवळ वृक्षतोड आहे. कारण जर का झाडं असतील तर झाडांची मुळे पाणी शोषून घेतात परंतु आता ते राहिलंच नाही. बऱ्याच ठिकाणी डोंगर पाडून तिथे घर बांधणं किंवा झाड तोडणं, मोठमोठे वृक्ष तोडणं या सगळ्या प्रकारामुळे, याशिवाय होळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावरती झाड, जंगलतोड होत आहे. आता या जुन्या रूढी थोड्याफार बदलून आपल्याला त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. येथे एवढेच सांगावेसे वाटते की, “होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे, तो तसाच कुठल्याच प्रकारचे नुकसान न होता साजरा व्हावा, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.”
— लेखन : डॉ. माया यावलकर. वरुड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
होळी व धुलीवंदनाची माहिती इत्यंभूत दिली आहे.
धन्यवाद
गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.