खाद्य संस्कृतीत वाचन चळवळ रुजविण्याचे एक आगळे वेगळे काम सौ.भीमाबाई संपत जोंधळे या सत्तरी ओलांडलेल्या आजीने आपल्या हाँटेल रिलँक्स काँर्नर येथे सात वर्षापूर्वी सुरु केले.
हे हाँटेल मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक पासून ओझरकडे जाणार्या १६ कि.मी. अंतरावर आहे.
पोटाची भूक भागवतांना वाचनाची गोडी निर्माण होऊ शकते हे ओळखून हाँटेलच्या टेबलावर मेन्यु कार्डाऐवजी निरनिराळ्या विषयांवरच्या चार पाच पुस्तकांचा सेट ठेवलेले आहेत. पुढे हाँटेलच्या अर्ध्या हून अधिक दालनात विविध विषयांच्या साहित्य प्रकारांची हजाराहून अधिक पुस्तके दर्शनी स्वरुपात नीट ठेवली आहेत.
जेवणाची आँर्डर दिल्यानंतर जेवण येई पर्यंत आपणास आवडलेलं पुस्तक आपण कांही मिनिटे सहज वाचू शकता. किंवा प्रथम सर्व पुस्तके प्रत्यक्षात पाहू शकता.
हॉटेलच्या भिंती उत्तमोत्तम कवितांनी चितारल्या आहेत. त्या उत्तम कलात्मक अक्षरबंधनातून आणि आकर्षक सजावटींनी साकार केल्या आहेत. हे या पुस्तक दालनाचे सर्वांगसुंदर वैशिष्ट्य आहेत.
शिवाय ज्ञानपीठ पुस्कार प्राप्त मराठी साहित्यिक, महाराष्ट्रातील तसेच नासिक जिल्ह्यातील पुरस्कार विजेत्या साहित्यिकांचे फोटो सहित दर्शविणारे फलकही लावले आहेत.
आजी अतिशय तळमळीने दरवर्षी १५ आँक्टोबर रोजी ग्राहकास पुस्तक सप्रेम भेट देऊन ‘वाचक प्रेरणा दिन’ साजरा करतात. अर्थात वाचकांचा, ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद त्यांना प्रत्येक महत्वाच्या कार्यक्रमात मिळत असतो.
नासिक शहरातील विविध वास्तूंचे आकर्षक फोटो या दालनात “नासिक दर्शन” म्हणून लावले आहेत. सध्याच्या काळात ‘मोबाईल’च्या वाढत चाललेल्या
व्यसनावर आळा घालण्यासाठी लहानापासून थोरांपर्यंत वाचन संस्कृती जोपासली पाहिजे असे आजीचे सर्वांना कळकळीचे सांगणे असते.
हाँटेलच्या परसदारी झाडांच्या सावलीत व ग्राहकांना बसण्यासाठी उत्तम प्रकारचे फर्निचर ठेवून त्या झोपाळ्यावर बसून मधून मधून कौटुंबिक जिव्हाळ्यासह गप्पा गोष्टी, बातचीतही करतात. पुस्तकांचं महत्त्व पटवून देत असतात.
आजीच्या कामाची दखल सोशलमिडियाने घेतली असल्याने त्यांना अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.
अलीकडेच बीबीसीने देखील आजीच्या पुस्तक हाँटेलवर एक वृत्त पट निर्माण केला आहे. अनेक लेखकांनी, ग्राहकांनी वाचक चळवळीला पाठबळ मिळण्यासाठी आपली पुस्तके आवर्जून सादर केली आहेत.
हे हाँटेल राष्ट्रीय महामार्गावर असल्याने हाँटेल मध्ये अनेक प्रवाशी येऊन पुस्तकाच्या दालनाला भेट देऊन विविध शाकाहारी पदार्थांचा आस्वाद घेतांना दिसतात. आजीचे ‘पिठलं भाकरी, चटणी, खुडा लोंच्याच, खमंग ताट तर चांगलेच प्रसिद्ध पावले आहे. अर्थात इतर पदार्थांच्या, नास्टयांच्या डिशेसही असतात. आँर्डर दिल्यानंतर भोजन येईपर्यंत ग्राहक पुस्तके चाळत असतात, पुस्तकावर भरभरून बोलत असतात. आणि चोहोबाजूंनी प्रतिकात्मक अशा जुन्या, दुर्मिळ मराठमोळ्या वस्तू सुशोभित करत असतात. अगदी वरवंटापाट्या, खलबत्त्या मुसळीसह !
महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील अनेक वाचनप्रिय ग्राहकांनी आजीच्या या पुस्तकाच्या अनोख्या हाँटेलला भेट दिली आहे. वाचन चळवळीस एक चांगली चालना, प्रेरणा व उर्जा देण्याचं मोठं काम ग्रामीण भागातील मराठमोळ्या आजीच्या या पुस्तक हाँटेलनं केलं आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

– लेखन : सुधाकर तोरणे
निवृत्त माहिती संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान काम करत आहेत. आजीच्या पुस्तकी हॉटेलला मिळालेला सन्मान अभिमानास्पद आहे.
धन्यवाद तोरणे सर !
मस्तच की, सुधाकर साहेब…!
मनापासून धन्यवाद..!!
.. प्रशान्त थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007