‘‘सध्याच्या राजकीय, सामाजिक वातावरणात अनेक बदल घडून येत आहेत. ते चांगले की वाईट, हे प्रत्येकाने ठरवावे. त्यासाठी आज अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे,’’ असे मत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी मंगळवारी बोलताना व्यक्त केले. ज्येष्ठ दिग्दर्शक, पटकथालेखक प्रदीप दीक्षित यांनी रचलेल्या ‘टेक ३’ या मुक्तछंद आणि कवितांच्या संग्रहाचे प्रकाशन पुणे येथील “बॉक्स टु” थिएटरमध्ये सतीश आळेकर, ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले, संपादक देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

‘‘उदारमतवादाचा संकोच होत असून त्याचा सामाजिक जीवनावर परिणाम होत आहे. आजूबाजूला दिसणारी अस्वस्थता ही वैश्विक आहे. त्यामुळे आपल्यातील न्यूनगंडाची ढाल करून सृजनशील होणे आवश्यक आहे. या अस्वस्थेत अडकून न पडता ‘टेक ऑफ’ घेण्याची वेळ आता आली आहे. तो ‘टेक ऑफ’ कसा घ्यायचा, हे ज्याने त्याने ठरवावे,’ असे मत आळेकर यांनी व्यक्त केले.
मंगला गोडबोले यांनी कवितासंग्रहाचे कौतुक करताना स्वातंत्र्यानंतर देशाच्या राजकीय-सामाजिक स्थितीत झालेले बदल चांगल्या पद्धतीने टिपल्याचे सांगितले. ‘न्यूज स्टोरी टुडे’ने या कवितासंग्रहाचे प्रकाशन केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका भुजबळ यांनी केले.
प्रकाशनानंतर या संग्रहातील काही मुक्तछंदांचे सादरीकरण करण्यात आले, त्याला उपस्थितांची दाद मिळाली.
या अनोख्या पद्धतीने करण्यात आलेल्या प्रकाशन सोहोळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, रसिक उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800