उर्मी
क्लब हाउस मधला छोटेखानी हॉल आज तुडुंब भरला होता. ‘उर्मी’ कट्ट्याचे संस्थापक भाऊसाहेब फाटक आज उत्सवमूर्ती होते. आज ते वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण करत आहेत. आता कट्ट्याची धुरा श्यामलाताईंकडे द्यायची आहे. गावात एक सुप्रसिद्ध कवी आहेत. नानांच्या नात्यात एक महान नट आहेत. हयापैकी एकाला पाहुणे बोलवावे असे काहींचे म्हणणे होते.
भाऊसाहेब निक्षून ‘नाही‘ म्हणाले. हा आपला घरगुती सोहळा आहे, परके कोणीही नकोत.
शाल ,श्रीफळ देऊन सत्कार झाला. भाऊसाहेब बोलायला उभे राहिले, “मंडळी, आज मी ह्या उर्मी कट्ट्याच्या स्थापनेबद्दल बोलणार आहे. जे मी आजपर्यंत कधी व्यक्त केले नाही. पंधरा एक वर्षे झाली. इथं आपण कला सादर करत असतो. ह्या मंडळाचा जन्म माझ्या गरजेमुळे झाला. रिटायर झालो आणि माझ्या काही कविता, किस्से शोधले. ज्या वयात प्रत्येकजण कवी असतो त्या वयात खरडलेले काहीबाही होते. ऑफिसमध्ये फंक्शन असेल तर, आवर्जून मी सादर करत असे मी रचलेले. कधी मनात आलेले कागदावर उतरवलेले. जमा केले सगळे कागद. अनावर उर्मी होती कवी होण्याची पहिल्यापासून. रिटायर झाल्यावर ती उर्मी बळावली.
प्रस्थापित कविकट्ट्यावर मात्र डाळ शिजत नव्हती. एका नामवंत कवीने ठणकावले, ‘ओळीखाली दुसरी ओळ म्हणजे कविता नव्हे.’ खूप दुखावलो. ते कमी म्हणून की काय पाहुणे आलेले कवी म्हणाले, ‘आडवी वाक्ये असतात, ते गद्य. तेच उभे करून लिहिले की पद्य. असे वाटते काहींना.’ खूप वाईट वाटले.
त्यांनी कितीही हिणवले तरी सुचायचेच मला काही बाही. आकाशातले चंद्र,तारे आणू शकत नव्हतो. पण अगदीच जमिनीवर गांडूळाप्रमाणे सरपटावे असे वाटेना.
अस्वस्थपणे आपल्या इथेच वेळ काढू लागलो, आपल्याच सोसायटीतल्या बाकांवर ! तिथे काय ? हळहळत काढायच्या भूतकाळातल्या आठवणी. नाहीतर वर्तमानातल्या समस्या !
मग मुलाचे लग्न झाले, खरेदी, पाहुणचार मजेत गेले काही दिवस. पण नंतर बायकोचे वेगळेच सुरू झाले. ‘ज्यात त्यात काय बाई ओला नारळ ! शेंगभाजीत दाण्याचे कूट हवे. कारल्याच्या भाजीत सुके खोबरे हवे.‘ ह्या बायका बाकावर जमून असलंच एकमेकींच्या कानात ओतायच्या.
मी तिला समजावले, ’आपण आता वानप्रस्थाश्रम स्वीकारायला हवा. इतके दिवस घर गृहस्थी झाली. आता पडेल पानात ते निमूट खायचे. असं बघ, तू गाण्याचा क्लास का नाही लावत ?’
‘आता काय सांगता ? सासूबाईंच्या धाकाने बंद करायला लावलात गाण्याचा क्लास ! ‘
अंगावर खेकसली ती केव्हढी.“ ह्यावर सगळे श्रोते मनमुराद हसले.
“पण आता बघताय ना, तीच गाणं शिकवते आहे ! परवा तर कॉलेज गोइंग मुली येऊन गाणं बसवून गेल्या तिच्याकडे. ती आमच्या गोतावळ्यात कायम गाणं म्हणत आली आहे. तिला प्रगती मात्र करता आलेली नाही. कशाकशाची खंत करावी, लोक हो ! सोडून देऊ खंत.
गाणी आता ती बसवते, शिकवते. कराओकेमुळे किती सोपे झाले आहे हे जाणता तुम्ही.
पण हे नंतर झाले सगळे. मी विषय काढला. नाना नाटकात काम करत असत. तुटपुंज्या बिदागीवर परवडेना. पुनः ते नाटक -बिटक नोकरी सांभाळून. म्हणून सोडलेच त्यांनी नाटक. पण उर्मी होती अजून. विषय काढल्यावर समजले, प्रत्येकाला काहीतरी करायची उर्मी आहे. इतके दिवस बंद पडलेले छंद आहेत !
म्हणून हा उर्मी कट्टा स्थापन झाला. महिन्याला पन्नास रुपये फी. ती घोटभर चहासाठी केवळ. कोणाला हसायचे नाही. निंदा नालस्ती नाही. कोणतीही तक्रार करायची नाही. वत्सलाताई म्हणाल्या मला काही येत नाही. मी गणेश स्तुती म्हणेन. ती रोज आधी म्हणत जाऊ, असे ठरले.
काही येत नाही म्हणून काय झाले ? प्रेक्षक होता येते. टाळ्या वाजवता येतात. दाद देता येते. आठवड्यातून एकदा उर्मी कट्टा ! पण आठवड्यातले उरलेले दिवस काय सादर करायचे ह्याची चर्चा ! किती उत्साह वाढला बघा. हिचे गाणे नियमित सुरू झाले. पळणीटकर उत्तम नकला करतात हे समजले. साहित्यवाचन, थोर कवितांचे रसग्रहण काय काय सुचत गेले.
अहो बायका तर रंग ठरवून त्याप्रमाणे वेषभूषा करू लागल्या. त्यामुळे पुरुष सभासद मोठ्या संख्येने वाढले बघा.“ श्रोत्यांमध्ये पुनः खसखस पिकली. “त्यामुळे झालं काय ? जुने रडगाणे नाही की ओला नारळ- सुका नारळ चर्चा नाही.
मित्र हो, माझ्या मते आताच्या काळातला हा वानप्रस्थाश्रम. आपल्याला प्रस्थापित कलावंतांच्या दिंडीत प्रवेश वर्ज्य. कुरकुरे आणि भुणभूणे म्हातारे हा शिक्का आपल्याला नकोय. असे आपण एकत्र आलो. मुलांच्या संसारात आहोत, पण नाहीयोत देखील ! मुलांच्या संसारात आधार असावा. लुडबूड नसावी. असा हा एक आपला कळप झाला.
एकेक रिटायर होत गेला, आपली संख्या वाढत राहिली. क्लब हाऊस मिळाले. दीर्घायुष्य असे व्यतीत करावे अशी उर्मी ज्यांना ज्यांना वाटली ते सामील झाले.
मला कविवर्य म्हणत आलात तुम्ही. किती छान वाटते हो ते मला ! आज अंगावर शाल पांघरलीत. पण आवडली शाल ती, कवीपणाची. धोनी, विराट कोहली होता येत नाही म्हणून गल्लीतली मुले क्रिकेट खेळण्याचे थांबवतात का ? नयेच थांबवू. आपल्या परीने आपण आनंद घ्यावा.
वानप्रस्थाश्रम म्हणतोय मी, तर खुर्चीचा मोह कसा ठेवू ? श्यामला सतार वाजवते. तिला साहित्याची जाण आहे. नुकतीच रिटायर झाली आहे. आपल्यातली सर्वात तरुण आहे. ती आता जबाबदारी घेईल.“
श्यामलाताईंकडे वळून बघत ते म्हणाले, ”हिशोब काही नाही, बरं का ! दोन पाच रुपये उरले तर, महिना अखेरीस चहावाल्या पोराला देऊन टाकायचे.”
नमस्कार करत ते म्हणाले, “तर आता मी तिच्याकडे सूत्रं सोपवतो. जय हो !”
क्रमशः
— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
