भारतातील पेन्शनधारकांसाठी १७ डिसेंबर हा महत्त्वपूर्ण दिवस आहे. म्हणून हा दिवस “पेंशनर्स दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने हा विशेष लेख. सर्व पेन्शन धारकांना आपल्या पोर्टल तर्फे हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
भारतात १८७१ च्या पेन्शन कायद्याच्या अनुषंगाने ब्रिटिश सरकारच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ती चालू राहिली.
काही काळानंतर निम्न सरकारी व्यवस्थापनात जसे बॅंका, लाईफ इन्शुरन्स, कंपनी इ. वेगवेगळ्या स्वरूपात व मापदंड वापरून पेन्शन योजना सुरू झाली.
२००५ पासून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली. तिचे लाभ वा नुकसान काही काळानंतर म्हणजे २००५ नंतर सेवेत दाखल झालेले कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर लक्षात आले.
भारतातील पेन्शनधारकांसाठी १७ डिसेंबर हा महत्त्वपूर्ण दिवस आहे. कारण 1982 मध्ये याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त कर्मचाऱ्यांना आणि विशेष करून पेन्शनधारकांना सन्मान आणि सुखशांतीची हमी देणारा ऐतिहासिक निर्णय दिला होता. 17.12.1982 च्या निकालाद्वारे निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठा आणि कृपा मिळवून देण्यासाठी वर्षानुवर्षे लढा देणारे दिवंगत डी.एस. नाकारा यांचे कृतज्ञतेने स्मरण करण्यासाठी आपल्या देशात ‘पेन्शनर्स डे’ साजरा केला जातो.
निवृत्तीवेतन ही मेहरबानी वा दान किंवा मालकाच्या गोड इच्छेवर अवलंबून असलेली कृपेची बाब किंवा भिक्षा नाही. हे प्रदान केलेल्या मागील सेवांचे देयक आहे. हा सामाजिक-आर्थिक न्याय प्रदान करणारा एक सामाजिक कल्याणकारी उपाय आहे. ज्यांनी त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात, त्यांच्या म्हातारपणात त्यांना कुचकामी सोडले जाणार नाही या आश्वासनावर मालकासाठी अखंड कष्ट केलेलें आहे.
वरील महत्त्वपूर्ण निर्णयाच्या तीन दशकां नंतरही सर्वसाधारणपणे पेन्शनधारकांची आणि विशेषतः ईपीएफ ९५ पेन्शनधारकांची दुर्दशा आपल्याला चांगलीच माहीत आहे. अजून ही बराच मोठा कर्मचारी वर्ग ह्या पासून वंचित आहे.
आज ह्या सर्व निवृत्त पेन्शन धारकांना शुभेच्छा देतांना इतर वंचित कर्मचाऱ्यांना हा लाभ लवकरच मिळो,
ही सदिच्छा.

– लेखन : ॐप्रकाश शर्मा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800