आज येळामावस्या आहे. या निमित्ताने वाचू या, एका येळामावस्या च्या आठवणी….
— संपादक
गुलाबी मस्त थंडीत ऊबदार मऊ अशा आजीच्या लुगड्याच्या शिवलेल्या गोधडीतून नाईलाजाने बाहेर आले आणि समोर माझ्या आवडीचा वाफाळता आल्याचा चहा! अरे वा.. आज काहीतरी विशेषच दिसतंय ? म्हणत हॉल मध्ये आले, तर समोर धोंडिबा, सारजा नेहमीप्रमाणेच दरवाज्यापाशी जमिनीवर बसलेले दिसले. आई, बाबा कित्ती म्हणत होते त्यांना, वर खुर्चीत बसा आरामात, प्रवासातून आला आहात.. पण त्यांना वरती बसायला अवघड वाटते, त्यापेक्षा जमिनीवरच्या गुळगुळीत फरशीवर मोकळे बसायला छान वाटते म्हणतात. मग सगळ्यांनीच पुढे त्यांना आग्रह केला नाही कधीच.
आता इतकी वर्ष झाली आम्ही लहानाचे मोठ्ठे झालो, धोंडिबा, सारजाही आता परिपक्व झाले होते पण अजूनही ते खरच ‘डाऊन टु अर्थ’ आहेत. हे दोघे म्हणजे आमच्या शेतातील वाटेकरी होते. आमच्या शेतात लागणार्या बी बियाणापासून ते पीक येण्यापर्यंत लागणारे सगळे खर्च.. ..औजारे, बैल , बाकीच्या गडी लोकांचा पगार वगैरे.. आमचे बाबा करत असत आणि तिथले सर्व काम म्हणजे नांगरणी पासून ते पीक येण्यापर्यंत ते दोघे जातीने व्यवस्थित पाहायचे. मग पीक आल्यानंतर त्यातला काही हिस्सा त्यांना देत असत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होते. त्यांचे गणू आणि गिरीजा दोघेही साधारण आमच्याच बरोबरीचे होते. आमचे छोटे झालेले कपडे, खेळणी, पुढे शाळेतील पुस्तके आई बाबा त्यांच्यासाठी द्यायचे. त्यांना ती दिली की खूप आनंद व्हायचा. त्याच बरोबर आई बाबा त्यांच्यासाठी त्यांना आवडणारी मिठाई, चॉकलेट्स, गणू, गिरीजाच्या शाळेचा अगदी वह्या, दप्तर ते फी, युनिफॉर्म याचा सगळा खर्च आई बाबा करायचे. याची त्यांना खूप जाणीव होती. म्हणून शेतातील सारे अगदी मनापासुन, प्रेमाने, काळजीने आणि कष्टासोबतच इमानदारीने करायचे. शेतीच्या बाबतीत हिच गोष्ट फार महत्वाची असते. मालकाचा विश्वास आणि त्यांची सचोटी, इमानदारी! इथे दोन्ही बाजू तितक्याच समर्थ होत्या म्हणूनच शेतीची कायम भरभराट होत होती. कष्ट करणारा बळीराजा तृप्त, समाधानी असला की पीकसुद्धा तितक्याच आनंदाने बहरून येतं.
शेतावर गेलो की गणु आणि गिरीजा आधी नेहमीच थोडे बुजायचे, पण नंतर मात्र आमची मस्त गट्टी जमायची. आम्ही त्यांना आमच्या शाळेतील, गावातील गमती सांगायचो आणि ते आख्खा वावर..गोठा, विहीर, मोटार सुरु केल्यावर विहिरीतील थंडगार पाणी मोठ्ठया पाईप मधून धबधब्यासारखे फेसाळत चौकोनी छोट्या सिमेंटच्या हौदात पडायचे ते दाखवायचे तेंव्हा तर खूपच मजा यायची.मग चिंचेच्या मोठ्ठया झाडावर पटपट खारुताई सारखे चढून भरपूर चिंचा काढून द्यायचे. आम्हाला खूप कौतुक वाटायचे त्यांचे.
दिवसभर आम्ही मुले मनसोक्त मजा करायचो शेतात त्यादिवशी. आता गणु आणि गिरीजा दोघेही शिकून शहरात नोकरी करत होते. गिरीजाचे लग्नही शिक्षण संपले की लगेंच केल्यामुळे लवकरच झाले. गणू त्यांना शहरात त्याच्याकडे राहण्याचा खूप आग्रह करत होता, पण येक दोघांना आयुष्यभर शेतीची कामे करण्याची सवय असल्यामुळे त्यांना शहरात करमणे शक्यच नव्हते. त्यामुळे ते अजूनही शेतावरच राहायचे.
धोंडिबा आणि सारजा आले की आम्हा मुलांना खूप आनंद व्हायचा. शिवाय येताना ते नेहमीच आमच्यासाठी काही ना काही रानमेवा म्हणजे सिझन प्रमाणे पेरू, चिंचा, बोरे, ऊस आवळे, ढाळा म्हणजेच हरभरा, तुरीच्या शेंगा, मक्याची कणसे भरभरून आणायचे मग आम्हा मुलांची खूप चंगळ असायची.
आता या थंडीच्या दिवसात ते आले म्हणजे नक्कीच इथे काहीतरी काम असणार आणि मग आम्हाला शेतावर येळामावस्येचं, हुरडा खाण्यासाठी या म्हणून सांगण्यासाठी आलेले असणार हे लक्षात आले आणि मग बालपणातील तो ‘खास’ दिवस लगेंच डोळ्यांसमोर आला. शेत, तो तिथला संपूर्ण दिवसभराचा आनंदोत्सव तरळायला लागला. ही जोडी म्हणजे खूपच उत्साही, आनंदी आणि अतिशय कष्टाळू! कितीही संकटं आली तरी नं डगमगता हसतमुखाने सामोरी जायची. एखादा दुसरा दिवस ट्रिपसाठी म्हणून शेतावर जातो तेंव्हा आनंद वाटतो,पण कायम तिथे थंडी,वारा, ऊन, पाऊस,वादळ यांच्याशी टक्कर देत छोट्याश्या कुठल्याच सोयी नसलेल्या झोपडीत राहणे, शेतात दिवसभर काबाडकष्ट करून रात्री पिकाची राखण करणे हे कित्ती कठीण असते हे फक्त हाडाच्या बळीराजालाच जमू शकते. याची जाणीव आत्ता खूप होते.आम्ही शेतावर येणार म्हटल्यावर त्यांना केवढा आनंद व्हायचा ! आणि फक्त आम्हालाच नाही, तर वाड्यातील आमच्या शेजाऱ्याना सुद्धा आमंत्रण देऊन जायचे.
भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. म्हणूनच ते अन्न आणि ते पिकवणाऱ्या सर्व घटकांप्रती विशेषतः झाडे आणि शेती घटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून खास एक दिवस आनंदात साजरा केला जातो. तोच हा दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या म्हणजेच वेळामावस्येचा दिवस ! या दिवशी आपल्या कामानिमित्त बाहेगावी असणारी माणसे वेळामावस्याला मात्र आपापल्या शेतावर आवर्जून सहकुटुंब येतात आणि आनंदाने हा उत्सव एकत्र साजरा करतात. आम्हीही पहाटेच सर्व लगबगीने आवरून शेतावर जायचो. खुळखुळ् वाजणाऱ्या घुंगराच्या बैल गाड्यात बसून जाताना अंगाचा अक्षरशः खुळखुळा व्हायचा, तरी केवढा आनंद वाटायचा तेंव्हा. दुतर्फा हिरव्यागार शेतातून असलेल्या काळ्या मातीतील पायवाट कित्ती सुंदर दिसायची !
मोत्याच्या कणीसांनी गच्च भरलेले ते सुंदर शेत, ओलसर सुगंध नाकात, मनात तसाच अजूनही दरवळतो.

शेतात गेल्यावर मोठे, लहान सारे मिळून एका झाडाखाली पाच पांडव मांडत. त्यांना चुन्याने रंगवत. त्यावर कडब्याच्या पाच पेंढ्या उभ्या करून एक सुंदर खोप करत. लाल शालीने ती घट्ट बांधत. नंतर डालग्यातून साहित्य काढुन पांडवासमोर हिरवे कापड ठेवून पुढे लक्ष्मीची पूजाही मांडत. नैवेद्य म्हणून भजी, वांग्याचे भरीत, ऊस, पेरू, बोरे, शेंगदाण्याचे लाडू, आंबील, आंबटभात, ज्वारी आणि बाजरीचे उंडे ठेवत. पांडवाची पूजा करुन शेवटी नारळ फोडत हा नैवेद्य एका माठात भरुन एका गोल आकाराच्या मडक्यावर चुना, कुंकू, काव यांचे बोटानी पट्टे ओढत आणि नंतर त्यात काठोकाठ आंबील भरत. बाजरीचे मुटके, ज्वारीचे मुटके, पुरणपोळी व शेतात पिकलेल्या पालेभाज्या शिजवून त्याची पळीवाढ भाजी बनवत. हि ‘भज्जी’ वाटाणे, दूध, तुर, मेथी, कोथिंबीर, गाजर, वांगे, आले, लसूण यांचे सुरेख मिश्रण असल्याने ती चविष्ट असायची. ती एका मडक्यात भरत.शेतात आल्यावर धोंडिबा डोक्यावर मडके घेऊन ते घोंगड्याने झाकत असे. तसे करून तो संपूर्ण शेताच्या बांधावरून “ओलगे ओलगे ..सालम पोलगे, पाची पांडव सहावी द्रौपदी.

हर हर महादेव.. हर भगत राजोss हारभलंss..!!!’ च्या घोषात ‘काळ्या आईचं चांगभलं” असा पुकारा करीत, शेताला फेरी मारत असे. नंतर तो काला शेतात फेकायचा. एका झाडाखाली खड्डा करुन सगळे मिळून तेथे माठाची पूजा करत. मग सगळे जण माठातील भज्जी, आंबील, पुरणपोळी, बाजरीच्या भाकरी यांचे तुडुंब जेवण करायचो.. नन्तर तो रिकामा माठ पांढरे फडके गुंडाळून खड्यात पुरायचे. पाच खडे घेऊन त्यांचीही पूजा केली जात असे. हे सर्व झाल्यानंतर कोळसा पेटवून त्यावर एका छोट्याशा वाटीमध्ये दूध ठेवून ते उतू जाऊ देत असत. ते दूध ज्या दिशेने उत्त्तू जाईल त्या दिशेला उत्पन्न जास्त निघेल असे समजले जायचे.नंतर थोड्या वेळात पेंढ्या पेटवुन त्या पेटत्या पेंढ्या घेऊन इथले गावातील सगळे लोक पिकाच्या भोवती शेताला प्रदक्षिणा घालतात. यामुळे पिकांवर कसल्याही रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही असा समज असतो. काही ठिकाणी त्या पेंढ्या तशाच पेटत्या ठेवून गावात आणतात आणि मारुतीच्या देवळाला एक फेरी मारून मंदिरासमोर टाकतात. ज्यांची शेते दूर आहेत असे शेतकरी मंदिराजवळच पेंढ्या पेटवतात आणि मंदिराला प्रदक्षिणा घालून तिथेच मंदिरासमोर टाकतात. असा हा दिवसभर भरगच्च कार्यक्रम करून हा सण आनंदात साजरा करतात.

ही वेळामावस्येला बनवलेली ‘भज्जी’ म्हणजे भोगीची भाजीच असायची, पण शेतातील ताजी ताजी तोडून लगेंच तिथे चुलीवर बनवलेली असल्यामुळे काय अफलातून चवदार असायची ! अशी चव आयुष्यभर विसरणे केवळ अशक्यच! आता शहरात सुद्धा भोगीला अशीच भाजी सर्वजण बनवतात. अगदी भरपूर तेलाची तर्री, मसालेदारसुद्धा बनवतात पण तेंव्हा शेतात त्यात काहीच घातलेले नसायचे की भरपूर तेलाचा तडका पण नसायचा तरीही कशी काय इतकी टेस्टी लागायची याचे अजून नवलं वाटते. मधल्या वेळी झाडाला बांधलेल्या उंच झोक्यावरचे घेतलेले मनसोक्त झोके अजून मन हेलावतात.
अलीकडे मोठे होत गेलो तसे व्यापामुळे शेतावर जाणे जमतच नव्हते. फक्त आई, बाबा मात्र आवर्जून जायचे. अलिकडे ते सुद्धा थोडेसे थकले होते. यंदा पासुन दरवर्षी नक्की या वेळामावस्येच्या उत्सवाला तरी सर्व भावंडाना, बालमित्रांना एकत्र जमवून शेतावर जायचेच असे मनाशी पक्के ठरवले.त्यामुळे आई बाबांना तर आनंद वाटेलच पण बालपणीतील गोड स्मृतींना उजाळा मिळून, मातीशी पुन्हा जवळकीचे थोडे तरी नाते राहील असा विचार केला. दरवर्षी नं चुकता हे दोघे कष्टाळू धोंडिबा आणि सारजा शेतावर उत्सवाला बोलावण्यासाठी इतक्या प्रेमाने येतात घरी ,आणि आपण मात्र जायचे कसं टाळु? याचा विचार करतो याचे वाईट वाटले. खरच या दोघांमुळेच आज आपली मातीशी नाते थोडेतरी टिकून राहिले आहे याची जाणीव झाली. आणि हे नाते पुढील पिढीच्या मनात सुद्धा घट्ट रुजवायचे हे पक्के ठरवले.आणि आम्ही आधीसारखेच सर्व भरपूर लोक येणार, लागा तयारीला धोंडुतात्या ! म्हटले तेंव्हा केवढा आनंद झाला आणि उत्साह संचारला त्यांच्या अंगात ? याच दादा, हामी वाटच फातोय म्हणत जोशात गेले ते. आता मात्र जबाबदारी माझी होती. सर्वांना फोन करून काहीही करून सुट्टी घेऊन सर्वांनी या वर्षी वेळामावस्येला गावी जायचेच असे हक्काने आणि आग्रहाचे निमंत्रण देण्यासाठी फोन करण्यासाठी लगेंच सुरुवात केली. माझा लहान मुलासारखा उत्साहाचा नवीन अवतार सगळे आवासून मिश्किलपणे पाहत होते.

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
